

सचिन पाटील
समुद्रातील प्लास्टिक कचरा ही आज सर्वात मोठी समस्या बनली आहे. जगातील आकाराने सर्वात मोठ्या प्रशांत महासागरात तर प्लास्टिकचा एक प्रचंड मोठा तरंगणारा ढीग तयार झाला आहे, ज्याला 'द ग्रेट पॅसिफिक गारबेज पॅच' म्हटले जाते. हा ढीग आकाराने भारताच्या क्षेत्रफळापेक्षाही मोठा आहे. या समुद्री कचऱ्याचे काय करायचे, या प्रश्नाने जगातील मोठे वैज्ञानिक आणि सरकारे हतबल झाली होती. त्या समस्येला आव्हान दिले आहे बोयान स्लाट या तरुणाने!
नेदरलँडस्मध्ये राहणारा बोयान स्लाट हा एक सामान्य मुलगा होता. वयाच्या १६ व्या वर्षी (२०१० मध्ये) तो ग्रीसमध्ये समुद्रकिनारी सुट्ट्या घालवण्यासाठी गेला होता. तिथे समुद्रात डायव्हिंग करताना त्याला एक धक्कादायक गोष्ट दिसली. पाण्याखाली माशांपेक्षा जास्त प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा तरंगत होता. हा अनुभव बोयानच्या मनाला लागला. त्याने शिक्षकांकडे, मित्रांकडे विचारणा केली की, ‘आपण हा कचरा साफ का करत नाही?’ त्यावर सर्वांनी एकच उत्तर दिले, ‘समुद्र खूप मोठा आहे, तिथून कचरा साफ करणे अशक्य आहे. त्यासाठी हजारो वर्षे आणि अब्जावधी डॉलर्स लागतील.’ पण, बोयानने हे 'अशक्य' शब्द स्वीकारले नाहीत. त्याने एरोस्पेस इंजिनिअरिंगचे आपले उच्च शिक्षण अर्धवट सोडले आणि समुद्राच्या स्वच्छतेसाठी स्वतःला वाहून घेतले.
वयाच्या १८ व्या वर्षी (२०१३ मध्ये) बोयानने 'द ओशन क्लीनअप' नावाच्या संस्थेची स्थापना केली. त्याने एक अभिनव विचार मांडला : ‘समुद्रातील कचरा शोधण्यासाठी आपण स्वतः फिरण्यापेक्षा समुद्राच्या नैसर्गिक प्रवाहांचा वापर करून कचरा आपल्याकडे कसा येईल?’ त्याने एक 'पॅसिव्ह क्लीनअप सिस्टीम' तयार केली. यात समुद्राच्या पाण्यावर तरंगणारे मैलोन् मैल लांब तरंगणारे पाईप्स बसवले जातात. समुद्राच्या लाटांसोबत वाहून येणारा प्लास्टिक कचरा या पाईप्समध्ये अडकतो आणि एका ठिकाणी जमा होतो. तिथून मोठ्या जहाजांच्या मदतीने हा कचरा बाहेर काढून त्याचा पुनर्वापर केला जातो. त्याने लोकांकडून पैसे जमा करून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून निधी उभारला.
२०१८ मध्ये त्याने उभारलेली यंत्रणा महासागरात यशस्वीपणे तैनात करण्यात आली. या सिस्टीमने समुद्रातील टनभर प्लास्टिक गोळा करण्यास सुरुवात केली. समुद्र स्वच्छ करताना बोयानच्या लक्षात आले की, महासागरात जाणारा ८० टक्के प्लास्टिक कचरा हा जगातील केवळ १,००० नद्यांमधून येतो. आपण नद्यांमध्येच प्लास्टिक अडवले, तर ते समुद्रात पोहोचणारच नाही.
यासाठी त्याने 'द इंटरसेप्टर' नावाचे एक सौरऊर्जेवर चालणारे स्वयंचलित जहाज तयार केले. हे जहाज नदीच्या प्रवाहात उभे राहते आणि वाहत येणारा सर्व कचरा एका कन्व्हेयर बेल्टच्या मदतीने स्वतःमध्ये खेचून घेते. आज जगातील अनेक प्रदूषित नद्यांमध्ये (अगदी भारतातील काही नद्यांमध्येही) ही सिस्टीम वापरली जात आहे. मासेमारी व्यवसायातूनदेखील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. बोयानच्या टीमने आतापर्यंत १०० हून अधिक वैज्ञानिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. नुकतेच त्यांनी हवाई बेटांवरून जप्त केलेल्या २०,००० हून अधिक ईल ट्रॅप्सचा (सापळ्यांचा) अभ्यास केला. या संशोधनाचा वापर आता जगभरातील देशांना मासेमारीचे कडक कायदे बनवण्यासाठी केला जाणार आहे. २०४० पर्यंत महासागरांमधील ९० टक्के तरंगणारे प्लास्टिक नष्ट करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. बोयानच्या संस्थेत जगभरातील शेकडो वैज्ञानिक आणि इंजिनिअर्स काम करत आहेत. त्याला संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ'देखील मिळाला आहे.