

भारताने 6,000 मीटर खोलीवर जगातील सर्वांत खोल मानवी निवासक्षम पाणबुडी संशोधन प्रयोगशाळा उभारण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा केली आहे. हे पाऊल ‘व्हिजन 2047’च्या व्यापक आराखड्याचा एक महत्त्वाचा भाग असेल.
शहाजी शिंदे, संगणक अभियंता
भारताने अलीकडील काळात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घेतलेली भरारी जगासाठी आश्चर्यकारक ठरली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदा प्रकाश टाकणार्या भारताने समुद्र संशोधनातही लक्षणीय प्रगती केली आहे. अलीकडेच भारताने 6,000 मीटर खोलीवर जगातील सर्वांत खोल मानवी निवासक्षम पाणबुडी संशोधन प्रयोगशाळा उभारण्याची महत्त्वाकांक्षी घोषणा केली आहे. ही अंडरवॉटर लॅब समुद्रातील इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मानली जाते. सुरुवातीला 500 मीटर खोलीवर एक डेमो मॉड्यूल तैनात केले जाईल, ज्यात तीन वैज्ञानिक सलग 24 तासांहून अधिक काळ समुद्राखाली वास्तव्य करू शकतील. यामधून जीवन-समर्थन प्रणाली, दाब सहन क्षमता, ऊर्जा पुरवठा आणि इतर तांत्रिक बाबींची चाचणी केली जाईल. हा टप्पा यशस्वी झाला की, 6 हजार मीटर खोलीवरील पूर्ण प्रमाणातील स्थायी संशोधन केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा होईल. महासागराच्या इतिहासात इतक्या खोलीवर मानवी निवासक्षम रचना आजवर कधीच उभारली गेली नाही.
या प्रयोगामुळे मानवजातीचे भवितव्य मंगळावर वस्ती बांधण्यात आहे की, आपल्या पृथ्वीवरील महासागरांच्या गर्भात, हा प्रश्न नव्याने चर्चेत आला आहे. अमेरिका आणि इतर अनेक देश मंगळावर मानवी वसाहत वसवण्याच्या तयारीत व्यस्त असताना भारत खोल समुद्रात वास्तव्य करता येईल का, याची चाचपणी करत आहे. यासाठी हिंद महासागरात जगातील सर्वाधिक खोलवर असलेली वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारण्याचे मिशन भारताने हाती घेतले आहे. या माध्यमातून समुद्री जीवसृष्टीच्या निरीक्षणाबरोबर भविष्यात समुद्राच्या गर्भातही मानवी वस्ती उभारण्याची शक्यता तपासली जाणार आहे.
चेन्नईस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी या भव्य प्रकल्पाला आकार देण्याच्या प्रक्रियेत आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात सुमारे 500 मीटर खोल समुद्रात एक अंडरवॉटर स्टेशन उभारले जाणार आहे. येथे तीन वैज्ञानिक सलग एक दिवस किंवा त्याहून अधिक काळ राहू शकतील. या स्टेशनमध्ये लाईफ सपोर्ट सिस्टीम, ऑक्सिजन पुरवठा, तापमान नियंत्रण आणि डॉकिंग यंत्रणा असेल. पारदर्शक भिंतींमुळे वैज्ञानिकांना समुद्री प्राणीजगताचे निरीक्षण प्रत्यक्ष करता येईल. त्यामुेळ या संपूर्ण व्यवस्थेची तुलना अवकाशातील इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसोबत केली जात आहे.
गेल्या काही महिन्यांत भारतीय वैज्ञानिकांनी फ्रान्समधील रॉसकॉफ मरीन बायोलॉजिकल स्टेशनला भेट देऊन त्यांची तांत्रिक रचना, प्रणाली आणि पद्धतींचा अभ्यास केला आहे. भारतीय स्टेशन जगातील सर्वात खोल समुद्री संशोधन केंद्र ठरू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील 25 ते 30 वर्षांत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे. अर्थातच ही मोहीम प्रचंड जोखमीची असेल.
तज्ज्ञांचे मत आहे की, समुद्राकडे जाणे हे अवकाशापेक्षा अनेक पटींनी धोकादायक आहे. चंद्रावर एक डझनहून अधिक अंतराळवीरांनी जवळपास 300 तास घालवले आहेत. पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर असूनही अवकाशातील मोहिमा तुलनेने अधिक यशस्वी ठरल्या. दुसरीकडे पृथ्वीवरच असलेल्या महासागराच्या अतिगर्भात मोजक्याच मानव मोहिमा गेल्या आहेत आणि त्या काही तासांहून पुढे गेलेल्या नाहीत. 2022 पर्यंत जगात केवळ 20 टक्के समुद्री तळाचा प्रत्यक्ष अभ्यास झालेला होता. 2023 मध्ये टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेले टायटन सबमर्सिबल अटलांटिक महासागरात दुर्घटनाग्रस्त झाले आणि त्यातील सर्व पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. अवकाशातही अपघात झाले आहेत; परंतु त्यांची तीव्रता एवढी भीषण नाही. सध्याचा स्टील स्फिअर सागरातील प्रचंड दाब सहन करण्यासाठी पुरेसा नसल्याने 6,000 मीटरच्या मोहिमेसाठी ‘इस्रो’च्या बेंगळुरू येथील लिक्विड प्रपल्शन सिस्टीम्स सेंटरमध्ये 80 मि.मी. जाडीच्या टायटॅनियम प्लेटस्पासून एक नवा टायटॅनियम स्फिअर तयार केला जात आहे. या प्लेटस्ना जोडण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचे ‘इलेक्ट्रॉन-बीम वेल्डिंग’ विकसित केले गेले असून ते 6 कि.मी. खोलीवरील 600 बार दाब सहन करण्यास समर्थ आहे.
समुद्र आणि अवकाश यामध्ये तंत्रज्ञानाच्या पातळीवर काही साम्ये आहेत. दोन्हीकडे मानवयुक्त कॅप्सूल हे प्रेशर वेसलच असते; पण समुद्राच्या तळाशी बाहेरील दबाव एवढा प्रचंड वाढतो की, काही हजार मीटरखाली उतरताना मानवी शरीर काही सेकंदांतच चिरडले जाऊ शकते. सहा किलोमीटर खोलीवरचा दबाव अंतराळातील दाबापेक्षा अनेक पटींनी जास्त असतो. समुद्राच्या गर्भात सूर्यप्रकाश पोहोचत नाही. त्यामुळे ऊर्जा, अन्न उत्पादन, व्हिटॅमिन्सची कमतरता या सगळ्यांच्या द़ृष्टीने हा भाग अत्यंत प्रतिकूल ठरतो.
समुद्रातील अनेक जीव अत्यंत विशाल आणि आक्रमक असतात, ज्यांच्यामुळे मानवनिर्मित संरचनांना धोका निर्माण होण्याची शक्यता असते. समुद्रात कोणती दुर्घटना घडली, तर बचाव पथके त्या खोलीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. पाणबुड्यांची क्षमता मर्यादित असते. त्यामुळे अतिखोल भागात बचाव मोहीम राबवणे जवळजवळ अशक्य ठरते. अवकाशातील रेस्क्यू मोहिमा तुलनेने अधिक सुसंगत आणि शक्य मानल्या जातात.
अनंत अडचणी असूनही भारताचा नियोजित अंडरवॉटर प्रयोगशाळा प्रकल्प हे महासागर संशोधनातील सर्वाधिक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. मानव महासागराच्या जड, दाबयुक्त, प्रकाशरहित आणि अत्यंत अवघड वातावरणात तग धरू शकला, तर भविष्यातील मानवी वसाहतींसाठी समुद्र हे एक मोठे, जवळचे आणि स्वस्त आश्रयस्थान ठरू शकते. पृथ्वीबाहेरच्या ग्रहांवर वस्ती करण्याच्या प्रयत्नांइतकेच महत्त्वाचे; पण अधिक वास्तववादी असे हे समुद्री जगतातील मानवाचे पहिले भव्य पाऊल ठरू शकते.
या मिशनसाठी सरकारने सुमारे 4077 कोटी रुपयांचा एकत्रित खर्च मंजूर केला असून हा खर्च 2021 ते 2026 या कालावधीत विविध टप्प्यांत वापरला जात आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अशा प्रयोगशाळांची किंमत साधारणपणे काही शेकडो कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. भारतीय प्रकल्पाचा खर्च यापेक्षा कमी किंवा अधिक असू शकतो. कारण, भारत स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहे आणि या संशोधन सुविधा भारतीय महासागरातील तुलनेने स्थिर पर्यावरणीय झोनमध्ये उभारल्या जाणार आहेत.