

युवराज इंगवले
मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स यासारखे मंच उपलब्ध करून महिलांना सौंदर्यासोबतच बुद्धिमत्तेची चुणूक दाखवण्याची संधी प्राप्त करून दिली जाते. अशातच मिस वर्ल्ड-२०२६ चा किताब डोमिनिकन रिपब्लिकच्या जोहेरी मोला हिने पटकावला. सौंदर्य स्पर्धेच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त झालेला भव्य अंतिम सोहळा व्हिएतनाममधील न्हा ट्रांग येथे पार पडला. जगभरातील विविध देशांमधून आलेल्या १११ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
जोहेरी ही पेशाने शिक्षिका, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ती, कम्युनिकेटर आणि व्यावसायिक मॉडेल आहे. तिने इबेरो-अमेरिकन विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापन आणि प्रशासन विषयातील पदवी प्राप्त केली आहे. ती व्हाईस ऑफ टुमारो या संस्थेची संस्थापक आणि अध्यक्ष आहे. ही संस्था वंचित आणि असुरक्षित समुदायांतील मुले व तरुणांना इंग्रजी भाषेचे शिक्षण देण्यासाठी काम करते.
जोहेरी स्वतः इंग्रजी माध्यमातून साहित्य आणि सामाजिक शास्त्रांचे अध्यापन करते. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारसरणी विकसित करणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, हे तिच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. इतकेच नाही तर ती युनिव्हिजन न्यूयॉर्कच्या क्विस्केया या कार्यक्रमासाठी पत्रकार म्हणून कार्यरत आहे. या माध्यमातून जोहेरी डोमिनिकन संस्कृती, सामाजिक प्रश्न आणि समुदायाशी संबंधित विविध कथा लोकांसमोर मांडते. मानवी नातेसंबंध, सहानुभूती आणि तिच्या एकजुटीच्या कुटुंबाने दिलेली मूल्यांपासून जोहेरीला प्रेरणा मिळते. ‘तुम्ही स्वतःच्या आयुष्यात ज्या संधीची गरज अनुभवली होती, तीच दुसऱ्याला देणे ही तुम्ही देऊ शकणारी सर्वात मोठी भेट आहे. त्या संधीमुळे एखाद्या व्यक्तीला वाढण्याची, पुढे जाण्याची आणि आपले जीवन बदलण्याची संधी मिळते’ असे जोहेरीच्या जीवनाचे ब्रीद आहे.
मिस वर्ल्ड स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोहेरीला तिच्या देशात तिने पाठिंबा दिलेल्या ब्युटी विथ ए पर्पज या प्रकल्पासह ती मिस वर्ल्ड बनल्यास त्या प्रकल्पात कोणत्या प्रकारे सुधारणा करेल, असेही विचारण्यात आले. तिने भाषेचा संबंध केवळ शिक्षणाशीच नाही, तर भावना व्यक्त करण्याची, इतरांशी संवाद साधण्याची आणि आपल्या जीवनाचा उद्देश स्पष्टपणे मांडण्याची क्षमता यांच्याशीही जोडला. तिच्या मते, एखाद्या व्यक्तीला योग्य भाषा आणि शिक्षणाची संधी मिळाल्यास ती व्यक्ती आत्मविश्वासाने स्वतःचे विचार मांडू शकते, पुढे जाण्यासाठी आवश्यक संधी मिळवू शकते आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवू शकते. म्हणूनच जोहेरीला शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नसून संधी, आत्मविश्वास, संवाद आणि जीवन बदलण्याची ताकद देणारे प्रभावी माध्यम आहे, हे विशेष! जोहेरी मोला हिचा प्रवास पारंपरिक सौंदर्याच्या पलीकडे असलेल्या विचारांची, शिक्षणाची आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणादायी गाथा ठरतो. मिस वर्ल्डचा मुकुट तिच्या डोक्यावर विराजमान झाला असला, तरी तिच्या कार्याची खरी ओळख तिच्या सामाजिक जाणिवेत आणि इतरांच्या आयुष्यात संधी निर्माण करण्याच्या ध्येयात आहे. सौंदर्याला बुद्धिमत्ता, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची जोड मिळाली, तर त्या सौंदर्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो, हेच जोहेरीच्या यशाने अधोरेखित केले आहे. तिचे विचार आणि इतरांसाठी काहीतरी करण्याची तळमळ तिच्या मुकुटाची खरी शोभा ठरली आहे.