Mind Reading Machine | मनातले विचार ऐका..!

आता काय मनातले पण ओळखायची मशिन काढायची की काय?
Mind Reading Machine
Tadaka Article | मनातले विचार ऐका..!Pudhari File Photo
Published on
Updated on

मित्रा, तू भेटलास की फार बरे वाटते. दिवस नुसता वैतागात जातो. कधी कधी आयुष्यात काय चालले आहे, काही कळत नाही. आता आजच बघ ना, साहेब ऑफिसमध्ये दिवसभर कावलेला होता. सारखा चिडचिड करत होता. बहुतेक त्याच्या घरी काही प्रॉब्लेम झाला असेल, असा अंदाज आम्ही कर्मचारी लावत असतो.

माझे पण असेच होते. ऑफिसमध्ये साहेबांनी किरकिर केली आणि तिथून नंतर घरी गेलो की, बायकोची किरकिर सुरू होते. त्यांच्या मनात काय आहे, हे समजले तर किती चांगले होईल? आता काय मनातले पण ओळखायची मशिन काढायची की काय? आधीच कृत्रिम बुद्धिमत्तेने सर्व जगाला व्यापून टाकलेय. सोशल मीडियावर काय शोधत आहात, हे एकदा समजले की तुम्हाला त्याच त्याच जाहिराती समोर यायला लागतात. परवा मी सहज हेलिकॉप्टरची किंमत किती असते, हे टाकून पाहिले. थोड्याच वेळात मला जगभरात कोणत्या देशात हेलिकॉप्टरच्या किमती किती आहेत, कोणते ब्रँड आहेत, त्याचा इंधन खर्च किती असतो, दुरुस्तीसाठी काय खर्च येतो याच्या जाहिराती येण्यास सुरुवात झाली. काही करता या जाहिराती थांबेनात म्हणून मी शेवटी लिंबाच्या लोणच्याची चौकशी केली आणि मग हेलिकॉप्टर थांबून लिंबाच्या लोणच्याच्या वेगवेगळ्या जाहिराती समोर यायला लागल्या.

तू शोध काय घेतोस, यावर हे झाले; पण तुझ्या मनात काय आहे, हे ओळखण्याची सुविधा पण लवकरच येऊ घातलेली आहे. शास्त्रज्ञांनी थेट मेंदूशी संपर्क करून ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस नावाचे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे व्यक्तीच्या मनात चाललेले विचार ओळखून त्याला शब्दरूप सुद्धा मिळू शकते. अरे, काय सांगतोस काय? चक्क मनातील विचार ओळखणारे यंत्र आले, तर बरेच प्रॉब्लेम निर्माण होतील. समोरच्याच्या मनात काय चालले आहे, याचा आपण फक्त अंदाज लावू शकतो; परंतु खरेच त्याच्या मनात काय आहे, हे समजले तर जागोजागी संबंध खराब होण्याची पण शक्यता आहे.

हो, तसे तर होईलच. कारण, लोक पोटात एक आणि ओठात एक, असे बोलत असतात. समजा, कोणी पाहुणे अचानक आले, तर कपाळावर आठ्या येतात; पण आपण लगेच सावरतो आणि सुहास्य वदनाने त्यांचे स्वागत करतो. उद्या जर पाहुण्यांना मनातील विचार समजले, तर ते आल्यापावली परत जाण्याची पण शक्यता आहे.

हे जे संशोधन सुरू आहे, हे खरेतर ज्या लोकांची बोलण्याची क्षमता गेलेली आहे त्यांच्यासाठी झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे ते इतरांशी अधिक सहजपणे आणि नैसर्गिकरीत्या संवाद साधू शकतील, यासाठी हा शोध लावण्यात आला आहे. ज्या लोकांना चेहर्‍याचा पॅरालिसिस झाल्यामुळे बोलता येत नाही, अशा लोकांसाठी असे संशोधन होत असते; पण उद्या हे संशोधन सरसकट उपलब्ध झाले, तर मानवी संबंधांसाठी तो एक धोका असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news