

डॉ. नगिना माळी
शिक्षण हे केवळ ज्ञान मिळविण्याचे साधन नसून व्यक्ती आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया आहे.
शिक्षण का आले? शिक्षणपद्धती कशासाठी निर्माण करण्यात आली? अनुभवातून गरज, महत्त्व आणि शिकण्याशिवाय पर्यायच नाही, अशा परिस्थितीतून ‘शिक्षण’ घेणे-देणे पुढे आले, असे आपणास म्हणता येईल, पण यामागे काहीतरी ध्येय असले पाहिजे, म्हणून शिक्षण का घ्यावे, यासंदर्भात ध्येय निर्माण झाली. देश-काल परिस्थितीनुसार शिक्षणाचे ध्येय शिक्षणाची व्याख्यानुसार, अर्थानुसार बदलत गेली. विचारवंतांनुसारही बदलत गेली. पाश्चात्त्य विचारवंतांनी दिलेली शिक्षणाची ध्येये पाहता रूसो, पेस्टॉलॉझी, हरबार्ट, फ्रॉबेल, माँटेसरी, जॉन ड्युई, प्लेटो, रसेल अशा तज्ज्ञांचा, विचारवंतांचा आवर्जून विचार करावा लागेल.
शिक्षणाच्या ध्येयासंबंधीचे जॉन जॅक्वीन रूसो (१७१२ ते १७७८) म्हणतात की, बदल वा परिस्थितीशी मिळतेजुळते घेण्याची, समन्वयात्मक भूमिका माणसाच्या मनात तयार करण्याचे कार्य शिक्षणाचे आहे. समाज परिवर्तनशील असल्याने मानवी मनदेखील परिवर्तनशील बनले आहे. भावी जीवनात उभ्या राहणाऱ्या सर्व समस्यांवर समतोलपणे विचार करण्याची, निर्णय घेण्याची कुवत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे, हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे. रुसोनी दिलेल्या या ध्येयाचा मतितार्थ असा की, परिस्थिती एकसारखी राहणार नाही. ती बदलत राहणार आहे. विद्यार्थ्यांला अशा बदलत्या वातावरणात निर्णय घेण्याइतपत शिक्षणाने प्रयत्न करावेत. समाजाभिमुख समाजसेवेसाठी त्याला तत्पर करावे. समाजासाठी स्वार्थत्याग करण्याची भावना असावी. असे समग्र शिक्षण रूसोंना हवे होते.
जॉन हेन्रीच पेस्टॉलॉझी (१७४६ ते १८२७) यांच्या मते शिक्षणाने समाजसुधारणा झाली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे. व्यक्तिविकास हा पोकळीत होणार नाही त्यासाठी योग्य प्रकारच्या वातावरणाची गरज असते. असे वातावरण निर्माण करणे, हे शिक्षणाचे काम आहे. व्यक्तीचा सर्वांगीण विकास म्हणजेच सामाजिक, नैतिक आणि धार्मिक विकास होय. प्रत्येक बालकात त्याच्या विकासाची बीजे दडलेली आहेत; परंतु ही ताकद व्यक्तींमध्ये अदृश्य स्वरूपात असते. तिला बाहेर आणण्याचे काम हे एकमेव शिक्षण हेच करू शकते. जॉन हरबार्ट (१७७६ ते १८३४) यांचे शिक्षणविषयक मत आणि त्यांनी दिलेली शिक्षणाची ध्येये पाहता, नीतिमती या एका शब्दात ती दिसतात. ते म्हणतात की, चारित्र्यसंपन्न व नीतिमान नागरिक तयार करणे, हेच शिक्षणाचे मुख्य ध्येय असले पाहिजे. शिक्षणातून केवळ बुद्धीचाच विकास साधावयाचा नसून भावनांचेही उदात्तीकरण केले पाहिजे. भावनांच्या उदात्तीकरणातून मनुष्य सद्गुणी बनला पाहिजे. कारण सद्गुणी नीतिमत्तापूर्ण मानवांची समाजास गरज असते.
नीतिमत्तेमुळे मानवी जीवनास सर्वांग परिपूर्ण बनविणाऱ्या सत्य, शिव आणि सुंदर या त्रिसूत्रीची कल्पना येते. असा माणूस निर्माण करण्याचे ध्येय शिक्षणाचे हवे. फ्रेडरिक फ्रीगेल (१७८२ ते १८५२) म्हणतात की, बालकाच्या समतोल विकासासाठी शाळा आणि घर यामध्ये समानता हवी. ती समानता निर्माण झाली पाहिजे. याचे कारण हे की, ही दोन्ही ठिकाणे बालकाच्या विकासावर परिणाम करत असतात. म्हणून घर आणि शाळा यामध्ये कोणत्याही प्रकारची दरी असता कामा नये. बालकाला विकासापर्यंत नेण्यास शिक्षण मदत करते. शिक्षणाने बालकाला ‘आपण कोण आहोत, आपले समाजात अस्तित्व काय आहे’ हे समजण्याइतपत सुजाण करून, त्या भूमिका पार पाडण्यास पात्र किंवा योग्य करणे, ही ध्येये शिक्षणाची असायला हवीत. मेरिया माँटेसरी (१८७० ते १९५२) यांनी शिक्षणाबाबत म्हटले आहे की, शिक्षण म्हणजे बालकांच्या जीवनाचा सामान्य विकास घडविण्यासाठी दक्षतेने केलेले सहाय्य होय. बालकाला कोणत्याही गोष्टीचे प्रात्यक्षिक शिक्षण, इंद्रिय शिक्षण आणि उपदेशात्मक साहित्य याद्वारे शिक्षण देऊन, मुलांनी जे स्वत: प्रयत्न करून मिळवले, तेच खरे शिक्षण. शिक्षण म्हणजे, स्नायूवरील ताबा, स्नायूंचे परस्पर सहकार्य, बालकाचा मानसिक विकास होय.
या पाश्चात्त्य शिक्षणातील विचारवंतांच्या विचारांचा थोडक्यात शिक्षणाच्या ध्येयाविषयी मागोवा घेतला असता असे दिसते की, शिक्षणाचे ध्येय व्यक्ती घडविणे आणि तिच्याद्वारे समाजाचा विकास हेच आहे. केवळ व्यक्ती किंवा केवळ समाज असे कोठेही असू शकत नाही. एखादी व्यक्ती समाजात जन्मते, समाज तिला नाव, घर, कुटुंब, मान-सन्मान देतो. विकासास संधी देतो. म्हणूनच ‘व्यक्तीद्वारे समाज आणि समाजाद्वारे व्यक्ती विकास’ हेच शिक्षणाचे ध्येय मान्य होते. हेच ध्येय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणही अधोखित करते.