

संपूर्ण जीवन ज्यांनी जंगलातच वेचले, त्या साहित्यिक मारुती चितमपल्ली यांनाही बदलत्या जीवनातील विसंगती जाणवतच होत्या. ‘जंगलातून जाताना मला दोन वाटा दिसत होत्या. त्यात जी अगदी की रुळलेली होती, ती मी निवडली आणि हा जो सगळा चमत्कार झाला, तो त्या वाटेने गेल्यामुळे झाला’ असे जगद्विख्यात कवी रॉबर्ट फ्रॉस्टने म्हटले आहे. चितमपल्ली अशा वाटा शोधणारे, निसर्गचमत्काराचे दर्शन घडवणारे. चितमपल्ली यांचा जन्म सोलापुरातला. या शहरातच त्यांचे बालपण गेले आणि माध्यमिक शिक्षणही तिथलेच; पण वन खात्यात 36 वर्षे वनाधिकारी म्हणून काम करत असताना ते वन्यजीव आणि पर्यावरणाच्या प्रेमातच पडले. कोईमतूरच्या फॉरेस्ट कॉलेजात तसेच बंगळूर, दिल्ली, डेहराडून आणि कान्हा राष्ट्रीय उद्यान येथील वने आणि वन्यजीव विषयक संस्थांमधून त्यांनी या क्षेत्राचे रीतसर अध्ययन केले. शिवाय नांदेडच्या विघ्नेश्वरशास्त्री कस्तुरे यांच्या संस्कृत पाठशाळेत तसेच पुण्यातील देवळेशास्त्री, पनवेलमधील पं. गजाननशास्त्री जोशी, परशुरामशास्त्री भातखंडे प्रभृतींकडे परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन केले. पारंपरिक ज्ञान मिळवण्यासाठी या अभ्यासाचा त्यांना खूप उपयोग झाला. ते साहित्यिक म्हणून थोर होतेच, शिवाय कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, मेळघाट व्याघ— प्रकल्प तसेच नागझिरा अभयारण्य यांच्या विकासात त्यांचे योगदान मोठे. जगद्विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली वन्यप्राणी संस्थेचे सचिव म्हणूनही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली.
महाराष्ट्र राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समितीवर काम करताना भरीव योगदान दिले. भारतातील विविध ठिकाणी वनाधिकारी म्हणून काम करताना आलेले अनुभव त्यांच्यात दडलेल्या जंगलवेडाला नित्य नवी दिशा देत राहिले. ‘तुम्ही जेव्हा वर्षानुवर्षे जंगलात राहता, तिथल्या नादब—ह्माशी सम साधता, तेव्हा जंगल म्हणजे नुसतीच झाडे वा रानटी जनावरे नाही, तर ते त्यापेक्षा काहीतरी अधिक आहे, असा अनुभव येतो’ असे त्यांनी एकदा म्हटले होते. ‘चकवाचांदण-एक वनोपनिषद’ या त्यांच्या पुस्तकात या ‘अधिक काहीतरी’चा अनुभव येतो. चकवाचांदणच्या वनोपनिषदातून गो. नी. दांडेकर, सलीम अली, व्यंकटेश माडगूळकर, निरगू गोंड, चित्रकार आलमेलकर प्रभृतींशी लेखकाचे जुळलेले नाते आणि आठवणींबद्दल वाचायला मिळते. नवेगाव बांधचे माधवराव पाटील हे चितमपल्लींचे ज्येष्ठ मित्र. शिकारीचा छंद एककेकाळी जोपासणारे पाटील उत्तम शेतकरी आणि जंगल अभ्यासक. वन्यप्राणी, वनौषधी याबद्दलची माहिती तसेच बोली भाषांमधील प्राण्यांची व झाडाफुलांची नावे ही अशा मित्रांच्या सहवासातूनही चितमपल्ली यांना ज्ञात झाली. ‘आपल्या भारतातील साप’, ‘आनंददायी बगळे’, ‘निळावंती’, ‘चैत्र पालवी’, ‘केशराचा पाऊस’, ‘जंगलाची दुनिया’, ‘नवेगाव बांधचे दिवस’ अशी अनेक पुस्तके चितमपल्लींनी लिहिली. याशिवाय ‘वन्य पशुकोश अथवा मृगकोश’, ‘पक्षिकोश’, ‘हंसदेवाचे मृगपक्षीशास्त्र’, ‘श्येनिकशास्त्र-रुद्रदेव’, ‘वृक्षकोश’, ‘मत्स्यकोश’, ‘वृक्षायुर्वेद-उपवन विनोद’ अशा ग्रंथसंपदेवर त्यांनी काम केले. नवेगावच्या तलावात सारस क्रौंचांच्या विहारात, चिंचेच्या झाडांवरच्या सारंगागारांमध्ये, अस्वलांनी अर्जुनाच्या झाडांवर काढलेल्या ओरखड्यांमध्ये ते रमून जात.
जंगलांविषयी लिहिणारे लेखक म्हणून व्यंकटेश माडगूळकर यांचेही नाव होते. त्यांनीही ‘मारुतीराव, तुमचे लिहिणे प्रौढ आणि निखळ मराठी असते. वन्यप्राणी हा विषय मराठीला आजवर पारखाच राहिलेला आहे; पण तुम्ही त्यावर छान लिहिता. पशुपक्ष्यांची कटाक्षाने संस्कृत नावे वापरता’ असे त्यांचे कौतुकही केले होते. जंगलातील अनेक अनाकलनीय गोष्टींचा शोध घेताना चितमपल्लींच्या हाती प्राण्यांची अनोखी माहिती लागत असे. मोरनाची या ठिकाणी मोराचा अपूर्व नाच पहिल्यावर त्यांनी लिहिलेला अनुभव विलक्षण असा आहे.
मंगरू या नवेगावच्या परिसरातील माणसासोबत केलेली पोखरडोंगरीची सैर अशीच थरारून टाकणारी आहे. पोखरडोंगरी म्हणजे प्रचंड अशा शिळांचा बनलेला प्रदेश. तिथल्या शिलाखंडावर चढून बिबट्या, वाघाचे, अस्वलाचे व तरसाचे घेतलेले दर्शन आणि ऐकलेले जंगलाचे संगीत यावरचे त्यांचे लेखन जबरदस्त आहे. ते आपल्याला अनोख्या शब्दांचे भांडारही खुले करतात. चांदी आणि कवडी हे एका रानकबूतराच्या जातीच्या पक्ष्याचे सुंदरसे नाव. चकवाचांदण, आम—वर्षा असे लोभस, अर्थपूर्ण शब्द लेखनातून समजतात. वनाधिकारी म्हणून कराव्या लागणार्या कामांची एक चौकट होतीच; पण त्यापलीकडे जाऊन चितमपल्लींचे वनांशी एक अतूट नाते निर्माण झाले. एखाद्या पक्ष्याविषयी वा झाडाबद्दल जाणून घेण्यासाठी कितीही भटकंती करण्याची आणि जंगल पायी तुडवण्याची त्यांची तयारी असे. जंगलातच ज्यांच्या पिढ्यान् पिढ्या गेल्या, अशा वनचर आदिवासींकडून जंगलाचे गूज जाणून घेण्याचाही मार्ग त्यांनी अवलंबला. खूपदा ही मंडळी माहिती सांगायला नाखूश असत. अशावेळी त्यांच्याशी दोस्ती वाढवून, त्यांच्या मनात आपुलकी निर्माण करून रहस्ये काढून घ्यावी लागत. कोईमतूरमध्ये शिकत असतानाच भारतात जंगलांची होणारी नासाडी आणि दुर्दशा यांचे भान त्यांना आले होते.
वास्तविक त्यांच्या घरात व आसपास तेलुगू आणि मराठी भाषेचा वावर होता; पण बालपणाच्या एका टप्प्यानंतर तेलुगू भाषेशी असलेला संपर्क तुटला, याबद्दलची चुटपूट त्यांनी ‘चकवाचांदण’मध्ये व्यक्त केली आहे. पत्नीच्या अकाली निधनानंतर आयुष्यात पोकळी निर्माण झाली, तरीही त्यांनी नागपूरमध्येच मुक्काम ठेवला होता; पण आयुष्याच्या उत्तरकाळात तेथे काळजी घेणारे जवळचे कोणीच नसल्यामुळे त्यांना स्थलांतर करावे लागले, तरीही जिद्दीने पुन्हा वर्ध्यात राहून त्यांनी प्राणिकोश व वृक्षकोशाचे काम केले. मनोवस्थेपेक्षा व अंतरीच्या दुःखापेक्षा भवतालाची त्याहून अधिक काळजी घेणारा हा अरण्यऋषी! आज विकासाच्या नावाखाली निसर्गाला ओरबाडण्याची वृत्ती बळावली असून, जंगलांपेक्षा काँक्रीटच्या जंगलांवर अधिक भर राहिलेला आहे. अशा काळात जंगलांचे महत्त्व आणि मोल जाणून घेणार्या चितमपल्लींची पोकळी जाणवतच राहील.