यंदा हवे प्रतीकात्मक विसर्जन!

Drought conditions
Drought conditions
Published on
Updated on

उमेश काळे

मराठवाड्यातील दुष्‍काळी स्‍थिती पाहता पारंपरिक पद्धतीने विसर्जन न करता प्रतीकात्‍मक विसर्जन व अन्‍य पर्यायांचे आवाहन विभागीय आयुक्‍तांनी केले आहे. त्‍यास प्रतिसाद दिला पाहिजे, अशीच स्‍थिती आहे.

मराठवाड्यात पावसाची परिस्‍थिती पाहता तलाव, धरणे, नद्यांमध्ये पाण्याचा साठा पुरेसा नाही. त्‍यामुळे जेथे टंचाईची तीव्रता आहे, तेथे गणरायाचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने न करता प्रतीकात्‍मक विसर्जन करावे, मूर्ती दान करावी, उंच मूर्ती पुढील वर्षापर्यंत जपून ठेवावी, असे आवाहन विभागीय आयुक्‍त जी. श्रीकांत यांनी केले आहे. या आवाहनास मराठवाड्यातील गणेश मंडळांनी प्रतिसाद देण्यास हरकत नसावी. गावागावात स्‍थापन झालेली विविध गणेश मंडळे, घरगुती गणपती यांची संख्या पाहता विसर्जनासाठी पुरेसे पाणी यंदा या भागात नाही. मोजका भाग सोडला, तर मराठवाड्यात पाण्याचा ठणठणाट आहे. बहुतांश तलाव कोरडे असून, जायकवाडी धरण क्षेत्राखालील नद्यांना फक्‍त पाणी आहे. काही धरणांत फूटभरसुद्धा पाणी नाही. ज्या धरणात गतवर्षी शंभर टक्‍के पाणी होते, त्‍या धरणांतील पाणीसाठा तीन ते चार टक्‍क्‍यांवर आला आहे. या कारणामुळे मूर्ती विसर्जित कुठे आणि कशा कराव्‍यात ही समस्‍या ग्रामीण, तालुका पातळीवर भेडसावू शकते. उंच मूर्तींचे विसर्जन कसे करणार, हा प्रश्नच आहे. तलाव, नद्यांमधील कमी पाण्यात विसर्जनाचा आग्रह राहिल्‍यास मूर्ती पूर्णपणे बुडणारही नाहीत. त्‍यातून पुन्‍हा पीओपीच्या मूर्ती असल्‍याने भावना दुखावल्‍याचा प्रसंग येणारच. त्‍यापेक्षा आयुक्‍तांनी सांगितलेला मार्ग हा सोयीस्‍कर आणि पर्यावरणीयदृष्ट्या कालसुसंगत आहे, हे मान्‍यच करावे लागेल. कारण, मूर्तींचे विसर्जन केले, तर गाळ होणार. परिणामी, आहे ते पाणीसुद्धा उपयोगी येणार नाही.

महाभारत, वेद, चाणक्‍य सूत्रात पाण्याविषयी चांगले श्‍लोक आहेत. महाभारतातील एक श्‍लोक अथवा सुभाषित असे : पानीयं परमं दानं, पानीयं परमं सुखम्। पानीयं जीवनं लोके, पानीयं जीवनौषधम्॥ (अर्थ : पाणी हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि पाणी हेच परमसुख आहे. या जगातील सर्व जीवांचे जीवन पाण्यावर अवलंबून आहे. पाणी हे जीवनदायी औषधासमान आहे. म्हणून पाण्याचे संवर्धन व जतन करणे हे आपले कर्तव्य आहे.). एवढेच काय गणरायाची मूर्ती बसविताना पाण्याच्या होणार्‍या वापरामागे जलदेवतांना आमंत्रित केले जाते. प्राचीन ग्रंथांमध्ये पाणी संवर्धनाचा संदेश दिला आहे. त्‍यामुळे मूर्ती विसर्जनाचा विचार आधुनिक पद्धतीने मंडळांनी करण्यास हरकत नाही.

विसर्जन करणे म्‍हणजे मूर्ती पाण्यात बुडवणे एवढाच अर्थ नसून, धार्मिक संकल्‍पनेनुसार सन्मानपूर्वक निरोप अभिप्रेत आहे. कृत्रिम जलकुंडाला गेल्‍या काही वर्षांपासून गणेशभक्‍त प्राधान्‍य देत आहेत. विसर्जनाबरोबर निर्माल्‍यही नदीत फेकून दिले जात असे. निर्माल्‍य एका कुंडात संकलन करण्याचे प्रयोग होत आहेत. 'एक गाव एक गणपती'चा आग्रहही मध्यंतरी झाला. त्‍यामुळे यंत्रणेवरील ताण कमी झाला. शाडूच्या मूर्तीकडे कल वाढत असून, या मूर्तीचे घरातील बादलीत विसर्जन करून पाणी बागेत किंवा झाडांनाही टाकले जाते. शाडूची मूर्ती वा अन्‍य बदल भक्‍तांनी सहजपणे स्‍वीकारले. पाण्याची कमतरता पाहता मूर्ती विसर्जनाबाबत नव्‍या कल्‍पनेचा विचार करण्यास हरकत नाही.

वरुणराजाच्या वक्रदृष्टीमुळे मध्यम आणि लघू प्रकल्‍पांतील स्‍थिती गंभीर आहे. ८०४ लघू प्रकल्‍पात १७ टक्‍के पाणी असून, गतवर्षी हे प्रमाण ५४ टक्‍क्‍यांवर होते. मध्यम प्रकल्‍पांची संख्या ८१ असून, त्‍यात २३ टक्‍के साठा आहे. मागील वर्षी त्‍याचे प्रमाण ७० टक्‍क्‍यांवर होते. मराठवाड्यात जी प्रमुख मोठी धरणे आहेत, त्‍यात जायकवाडी, विष्‍णपुरीतील साठा समाधानकारक असला, तरी लातूर, बीड, धाराशिव या तीन जिल्‍ह्यांत विदारक चित्र आहे. लातूर शहर, बीड, धाराशिवच्या काही भागाला पाणी पुरविणार्‍या मांजरा धरणात पाणी पातळी दहा टक्‍क्‍यांवर आहे. सीना कोळेगाव हे धाराशिव जिल्‍ह्यातील मोठे धरण. धाराशिवमधील परंडा, सोलापूर ग्रामीणला या धरणातून पाणीपुरवठा होतो; पण हे धरण कोरडेठाक आहे. जालना जिल्‍ह्यातील जीवरेखा, कामाई तलावांना पावसाची प्रतीक्षा आहे. परळीत दरवर्षी विसर्जन वैद्यनाथ मंदिराजवळील कुंडावर केले जात असे; पण हे कुंड आटल्‍याने चांदापूर तलावात 'श्री'ला निरोप दिला जाईल. तेथेही पाण्याची स्‍थिती समाधानाची नाही. पाणी बचत, सुरक्षितता हे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत, असे प्रशासनाला वाटते. सध्या असणारे पाणी हे केवळ पिण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश निघाले आहेत. एकंदरीत पुढील पावसाळा येईपर्यंत पाण्याकरिता कसरत करावी लागणार आहे. त्‍या अनुषंगाने होणार्‍या प्रयत्‍नांना साथ देणे हे सगळ्यांचेच कर्तव्‍य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news