

हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याच्या निर्णयाचा जीआर अखेर शासनाने मागे घेतला आहे. यामुळे कुणी असो की नसो; परंतु पालकांनी मात्र नि:श्वास सोडला आहे. आपली मुले शाळेतून परत आल्यानंतर आपल्याशी मराठीत बोलणार, इंग्रजीत बोलणार की हिंदीत बोलणार, हा मोठाच प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. तूर्त या निर्णयावर पडदा पडला आहे आणि शिवाय पुढे काही होईल, असे काही सांगता येत नाही.
कधीकाळी पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन जाणार्या विद्यार्थ्यांना, तीन वर्गांना एकत्र शिकवणार्या एकशिक्षकी शाळा होत्या. त्या काळात कुठल्याही प्रकारची उपकरणे, जसे की द़ृकश्राव्य माध्यम अथवा स्क्रीन नव्हते. एक गुरुजी असायचे आणि ते तिन्ही वर्गांना एकाच वेळी शिकवायचे. चौथीला बोर्ड असल्यामुळे ज्या गावात तिसरीपर्यंत शाळा आहे, तेथील विद्यार्थ्यांना चौथीसाठी शेजारच्या गावात पायी जावे लागत असे. इथून सुरुवात केलेल्या शिक्षण क्षेत्राचा प्रवास कार्पोरेट क्षेत्रापर्यंत झाला आणि त्यानंतर पंचतारांकित शाळाही उभ्या राहिल्या.
अतिरिक्त भाषा शिकवणारे शिक्षक शासन कुठून आणणार होते, याचा काही शोध लागू शकलेला नाही. आहे तोच अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शिक्षक पुरेसे नाहीत, तेथे आणखी एक नवा विषय शिकवण्यासाठी शिक्षक कुठून येणार माहीत नव्हते. राजकारण आल्याशिवाय आपल्या राज्यामध्ये कुठलाही प्रश्न मार्गी लागत नाही. या हिंदी भाषेच्या प्रकरणामुळे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली. मराठी माणसांची वज्रमूठ किंवा मराठी भाषिकांची गर्जना अशा स्वरूपात घोषणा देत दोन्ही बंधूंनी मिळून एक मोर्चा नव्हे, महामोर्चा काढण्याचे ठरवले. याचे पुढे काय होईल माहीत नाही; परंतु तूर्त शाळकरी विद्यार्थ्यांना मात्र दिलासा मिळालेला आहे. जेमतेम सहा वर्षे पूर्ण केलेले मूल शाळेत जायला लागल्याबरोबर त्याच्यावर अनेक भाषिक संस्कार होत असतात. प्रत्येक विभागातील भाषेचा बाज वेगळा असतो. याचा अर्थ कोल्हापुरात वेगळी मराठी बोलली जाते आणि परभणीत वेगळी मराठी बोलली जाते.
खानदेशातील मराठीचा वेगळाच बाज आहे, तर कोकणातील मराठीचा आणखीच वेगळा असतो. या सगळ्या भाषिक आक्रमणाच्या बरोबर आणखी इतर भाषाही त्यांना शिकाव्या लागतातच. इंग्लिश ही जगाची भाषा असल्यामुळे आज ज्ञानभाषा समजली जाते. मानसशास्त्रीय द़ृष्टिकोनातून अभ्यास करणार्या लोकांनी असे निष्कर्ष काढले आहेत की, मुलांचे चांगले आकलन मातृभाषेतूनच होत असते. मराठी लोकांची मातृभाषा मराठीच आहे, जी घराघरांत सहजतेने बोलले जाते. कधीकाळी सर्व शिक्षण केवळ मराठीत होत असे. त्यासोबत पाचवीला पहिल्यांदा हिंदी आणि इंग्रजी हे विषय येत असत. हळूहळू त्यात चांगली पकड घेत मुले सर्व भाषांवर प्रभुत्व मिळवत असत. मराठी माध्यमातून पूर्ण शिक्षण घेऊन आयएएस, आयपीएस आणि वैज्ञानिक झालेले असंख्य लोक आजही पाहायला मिळतात.