

पाटील, समद्या वाड्यात शोधलं, पर दांडकं गावाय तयार न्हाई. बघील तिकडं टाक टोक, फाऊंटन पेन, बॉल पेन, कागदाच्या रिमाच्या रिमा बघाय मिळतात, रामानं कावदारून सांगितलं. तवा पाटील आराडलं, लेका कुलकर्ण्यांस्नी ईच्यार त्येंच्याकडं तरी दांडकं हाय का ते? कुलकर्ण्यांच्याकडं कुठलं आलंय दांडकं? पर, म्या म्हंतो इतक्या दिसानी मालक तुमास्नी दांडकं कश्यापायी पायजेल, रामानं इच्यारलं. तुमी जवापास्नं पुस्तक लिवाय लागलायसा तवापास्न घरात दांडक बघाय मिळंना. काय सांगू तुमास्नी, रामा म्हणाला.
रामा ईच्यार करीत बसला. पाटलास्नी दांडकं कश्यापायी पायजे. तवा त्येला त्येंचं सातारचं भाषण आठीवलं. पाटील म्हणालेते, झेंडा कंचा बी आसूं दे. पर दांडा मराठीचा पायजे. आता झेंड्याला दांडा कवापास्नं लावाल्यात ते रामाला समजेना. झेंड्याला काय लागतंय? एकांदी चिवकाटी किंवा काठी लावली, तरी रग्गड हुतीया. दांडा मिळत नाही म्हनल्याव पाटलांनी वैतागून टीव्हीचं चॅनेल लावलं, तर त्यावर चार-पाच पोरी आन् पाच-सहा पोरं नाचाय लागलीती. अन् गाणं चाललं हुतं... ‘पोरी जरा जपून दांडा धर!’ समोर प्रेक्षक सगळे अभिजात वर्गातले अगदी सहकुटुंब! नाचणारी पोरं-पोरीसुद्धा अभिजात वर्गातली!
मराठीला अजूनपर्यंत अभिजात भाषेचा दर्जा का मिळत नव्हता, ते पाटलास्नी आता समजले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेची थोरवी गायिली होती. प्रत्येक अध्यक्षाचे ते धर्म कर्तव्य असते म्हणून.
पाटील विचार करू लागले. ‘पोरी जरा जपून दांडा धर’ आणि ‘तुझी चिमणी उडाली भुर्र’ या गाण्यांना मराठी पाठ्यपुस्तकात स्थान दिले तर? इंग्रजी शाळांकडे पोरं कशाला जातील? त्यासाठी पाटील आणि कुलकर्ण्यांची युती झाली तरी बेहत्तर! एवढ्यात रामानं कुठनं तरी दांडकं हुडकून आणलं. पाटील म्हनालं, आता ह्या दांडक्याचं काय करायचं? दांडकं मिळालं पर झेंडा गायब! टांग्याचं घोडं पळालं अन् टांगा पलटी झाला. पाटील म्हणाले, रामा आता ह्या दांडक्याच्या टिपर्या करा. मराठी पोरास्नी गरबा नि दांडिया खेळायला उपेगी पडतील. आता लाठी-काठी नि फरीगदगा राहिलाय कुठे? जी गोष्ट मराठी शाळांची, तीच मर्दानी खेळांची, तरीबी मराठी भाषा ही जिवंत राहिलीच पाहिजे!