

मराठी भाषेला अभिजात दर्जा देणारा निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाकडे दिला आहे. मराठी भाषेच्या आजवरच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, पण नुसता अभिजात दर्जा मिळाला म्हणून अभिमान बाळगून चालणार नाही; तर मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी काय करायला हवं या द़ृष्टीनं येणार्या काळात पावले टाकली गेली पाहिजेत. एक भाषा म्हणून ती ताकद, ते व्याकरण, ती शब्दसंख्या आणि नवेनवे शब्द, नव्या संज्ञा, नव्या संकल्पना स्वीकारण्याएवढी लवचिकता हे सर्व काही मराठी भाषेकडेही आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला होता आणि आता याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा अभिमान बाळगताना मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारीही आपणा सर्वांची आहे, याचा विसर पडता कामा नये. आज इंग्रजीच्या प्रभावाखाली मायमराठीची अवस्था काय झाली आहे, हे आपण पहात आहोत. भाषा म्हणून इंग्रजी शिकणं आणि ‘इंग्रजाळलेलं’ होणं या वेगळ्या गोष्टी आहेत. भाषा शिकायची आहे, त्या भाषेवर प्रभुत्व मिळवायचं आहे, यासाठी इंग्रजीचा अभ्यास करण्यात गैर काही नाही; पण सर्व वृत्ती, भावना आणि मनामधील विविध मोजमापं हे सगळं इंग्रजाळलेलंच होणं हे चुकीचं आहे. मराठी शब्द उपलब्ध असूनही कारण नसताना फुकटचं इंग्रजी फाडणं, याचा सन्मान वाटणं ही खरी सांस्कृतिक समस्या आहे. आज एखादा आकडा, उदाहरणार्थ एकोणसत्तर असं कुणी उच्चारलं तर घरातील मूल विचारतं की एकोणसत्तर म्हणजे किती? मग त्याला सिक्स्टी नाईन म्हटल्यावर कळतं. आपला भाषिक आणि सांस्कृतिक प्रवास इथपर्यंत येऊन ठेपलाय. आज रस्त्यावरून जाताना सहज नजर टाकली तर लक्षात येईल की, दहापैकी नऊ दुकानांच्या पाट्यांवर नावंही इंग्रजीतून लिहिलेली दिसतात.
मूळचं नाव जरी समजा भारतीय किंवा मराठीतलं असलं तरी लिहिताना रोमन लिपीत लिहिलेलं दिसतं. मोबाईलवरून निरोप पाठवताना अक्षरं जरी मराठीमध्ये उमटण्याची सुविधा उपलब्ध झाली असली तरी त्याचं टायपिंग इंग्रजीमध्ये म्हणजेच रोमन स्क्रिप्टवर होतं. भाषाशास्त्राच्या द़ृष्टीनं अभ्यास करायचा झाल्यास देवनागरी ही जगातील सर्वांत शास्त्रशुद्ध लिपी आहे. भाषा म्हणजे मुख्यतः ध्वनी. विविध ध्वनी लिपीच्या माध्यमातून व्यक्त होतात. हे ध्वनी व्यक्त करण्यासाठी सर्वांत विकसित लिपी कोणती असेल तर ती देवनागरी आहे. पण, तीही आपण सोडून दिल्यात जमा आहे. मला जाणवू लागलंय, इंग्रजी भाषा, शब्द, संज्ञा, संकल्पना आणि लिपीचा महाप्रचंड स्फोट संस्कृतीवर चाल करून आला आहे आणि त्यामध्ये आपलं आधीच असलेलं मिळमिळीत सांस्कृतिक आत्मभान आणखी विसर्जनाच्या दिशेनं जात चाललेलं आहे. पाश्चात्य संस्कृतीचा विकास, त्या विकासानं त्यांना जी साधनं दिली त्यामुळं ते जगभर पसरले आणि त्यांनी आपलं साम्राज्यं जगभर निर्माण केली. जपाननं हा धोका वेळच्या वेळी ओळखला. आपली आंतरिक क्रांती घडवून आणली, जिचं नाव आहे मेजी पुनःस्थापना. युरोपिय, अमेरिकन पाश्चात्य जगामध्ये एवढे पुढे कशामुळं गेले आहेत, हे सर्व जाणून घेऊन ते आत्मसात करण्यासाठी जपानने 1869 नंतर निवडून निवडून तरुण बुद्धिमान मुलं पाश्चात्य राष्ट्रांमध्ये विशेषतः अमेरिकेमध्ये शिकायला पाठवली. त्यांच्यावर सोपवलेलं प्रमुख काम होतं, ते सर्व ज्ञान आत्मसात करायचं आणि परत येऊन ते जपानी भाषेमध्ये मांडायचंय आणि आपल्याला इथल्या शिक्षणपद्धतीमध्ये सर्व शिक्षण जपानी भाषेत देता आलं पाहिजे. तेव्हा प्राथमिक शाळा, बालवाडीपासून ते मेडिकल, इंजिनिअरिंग आणि पीच.डी.सह सर्व शिक्षण तेव्हापासून आजपर्यंत जपानमध्ये जपानी भाषेत होऊ शकतं. आपल्या डोक्यात मात्र हे खूप वर्षांपासून घुसवलं गेलंय की, विज्ञान, आयुर्विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी सर्वांबाबतचं ज्ञान हे इंग्रजीमध्ये आहे आणि आपल्याला ते जसंच्या तसं स्वीकारावंच लागेल. हा समजच मुळातून चुकीचा आहे.
मराठी भाषा, आहे ती भारतीय संस्कृतीच, पण मराठीतून व्यक्त होते ते ती भारतीय संस्कृती. ही मराठी भाषा ज्ञानभाषा बनणे आवश्यक आहे. ती नुसती गप्पांची भाषा नाही, नुसती घरामध्ये बोलण्याची नाही; तर नव्या ज्ञानाची निर्मितीसुद्धा ज्या भाषेत होते अशी ज्ञानभाषा बनणे गरजेचे आहे. सुदैवाने अलीकडील काळात महाराष्ट्र सरकारने दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. महाराष्ट्राचे पाठ्यक्रम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळीला सीबीएसईप्रमाणे करणे आणि प्राथमिक शिक्षणात मराठी अनिवार्य करणे. हे एक योग्य दिशेनं टाकलेलं ‘दीड पाऊल’ आहे असं मी म्हणेन. दिशा असायला हवी ती मराठी ज्ञानभाषा बनणे. मराठीतून केजीपासून पीएच.डी. आणि वैद्यकीय शिक्षणापासून सगळं मराठीत उपलब्ध झालं पाहिजे. 12 कोटी लोकसंख्या असणार्या जपानला जपानी लिपी आणि जपानी भाषेविषयी कमीपणा वाटत नाही, न्यूनगंड वाटत नाही; आहे तो जबरदस्त आत्मविश्वासच आहे आणि जापनीजमध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग करता येतं. विज्ञानाचंही अगदी अद्ययावत संशोधन जापनीज भाषेतून होतं, मग 13 कोटींच्या महाराष्ट्राला हे का शक्य होत नाही? याचं कारण मराठी ही ज्ञानभाषा असायला हवी, नवं ज्ञान, नवं संशोधन मराठीतून व्हायला हवं हा विचार कुठं तरी कमी पडतोय. यासाठी भाषा सतत विकसित होत राहायला हवी, तिनं नवे नवे प्रवाह सामीलही करून घ्यायला हवेत आणि नवे नवे प्रवाह निर्माणही करायला हवेत.
(शब्दांकन : हेमचंद्र पडके)