

मयुरेश वाटवे
गोव्यातील मांडवी काठचे कॅसिनो स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. वाहतूक कोंडीपासून मांडवी नदीच्या प्रदूषणापर्यंत अनेक विषय आहेत. आता उच्च न्यायालयानेच वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत.
निळा समुद्र, सोनेरी वाळू, पोर्तुगीज वास्तुकला यासाठी प्रसिद्ध गोवा आणखी एका कारणासाठी विख्यात झाला आहे, मांडवीकाठच्या कॅसिनोंसाठी. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत त्याची एक वेगळीच क्रेझ आहे. पूर्वी गोव्यात उतरल्यावर कळंगुट, हरमल किनाऱ्यासंबंधी विचारणारे पर्यटक आता कॅसिनोचा पत्ता विचारतात. मांडवीच्या पात्रात उभ्या त्या चमकदार, भव्य कॅसिनो नौका पर्यटनाच्या पोस्टरवर आकर्षक दिसतात; पण या कॅसिनोंमुळे पणजीत राहणाऱ्या आणि रोज कामानिमित्त शहरात येणाऱ्या सामान्य माणसाचे आयुष्य कठीण होत चालले आहे. दयानंद बांदोडकर मार्ग हा पणजीचा मुख्य रस्ता. १५ ऑगस्टचा मुख्य कार्यक्रम, जुने सचिवालय, पणजी मार्केट, कला अकादमी, आयनॉक्स कोर्टयार्ड, मिरामार, दोनापावलाकडे याच मार्गावरून जावे लागते. कार्निव्हलचे चित्ररथ याच मार्गावरून जातात. संध्याकाळ झाली की या रस्त्याचे रूपच बदलते. संध्याकाळी सात ते दहाच्या दरम्यान इथे पाय ठेवायला जागा नसते.
कॅसिनोवर जाणाऱ्या गाड्या, टॅक्सी, खासगी वाहनांमुळे दोन लेनचा रस्ता एका लेनचा होतो. वाहतूक पोलिस बघ्याची भूमिका घेतात, असा स्थानिकांचा थेट आरोप आहे. याहून गंभीर बाब म्हणजे सुरक्षिततेसाठी लावलेल्या लोखंडी ग्रील्सची तोडफोड. वाहतूक सुरळीत राहावी, पादचाऱ्यांनी कुठेही रस्ता ओलांडू नये म्हणून सरकारने लाखो रुपये खर्च करून हा दुभाजक आणि ग्रील्स बसवले; पण प्रत्यक्षात काय घडले? कॅसिनोच्या प्रवेशद्वारासमोर नेमके जिथे ग्राहकांना सोयीचे आहे, तिथेच या ग्रील्स कापून थेट एन्ट्री केली आहे. सरकारी मालमत्तेची नासधूस करून धंद्यासाठी रस्ता बनवायचा, हा प्रकार एक-दोन ठिकाणी नाही, तर मांडवी किनाऱ्यावरील जवळजवळ प्रत्येक मोठ्या कॅसिनो ऑफिससमोर दिसतो. सामान्य माणसाने आपल्या घरासमोरचा फुटपाथ अडवला, तरी महापालिका कारवाई करते; पण इथे भर रस्त्यात लोखंडी ग्रील्स कापले जातात आणि कोणी काहीच बोलत नाही. अखेर या सगळ्या प्रकाराची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला स्वतःहून घ्यावी लागली. खंडपीठाने या परिसरात पार्किंगवर कडक निर्बंध लागू केले असून, त्यासंबंधीचा अंमलबजावणी अहवाल चार आठवड्यांत देण्याचे निर्देशही दिले आहेत.
वाहतूक हा एक भाग झाला; पण दुसरा आणि अधिक गंभीर मुद्दा आहे, तो मांडवी नदीच्या प्रदूषणाचा. मांडवी ही गोव्याची जीवनवाहिनी आहे; पण गेल्या काही वर्षांपासून तिच्या पाण्याची गुणवत्ता खालावल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कॅसिनो नौकांवर दररोज हजारो लोक येतात, जेवणावळी होतात, शौचालये वापरली जातात. मग या नौकांचे सांडपाणी जाते कुठे? कॅसिनो कंपन्यांचा दावा आहे की त्या सांडपाणी नदीत सोडत नाहीत. त्यांच्या नौकांवर सांडपाणी साठवण्यासाठी टाक्या आहेत आणि ते गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचाऱ्यांच्या आणि बंदर कप्तानाच्या देखरेखीखाली सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात पाठवले जाते, याची लॉगबुकमध्ये नोंद असते. प्रदूषण मंडळाने नुकत्याच उच्च न्यायालयात सादर केलेल्या अंतरिम अहवालातही म्हटले आहे की, २४ ऑगस्ट २०२६ रोजी मांडवीच्या २२ ठिकाणी भरती-ओहोटीच्या वेळी घेतलेल्या ४४ पैकी सर्व ४४ नमुन्यांमध्ये मलातील जिवाणूंचे, फिकल कॉलिफॉर्मचे प्रमाण १०० एमपीएनच्या मर्यादेपेक्षा जास्त आढळले; पण त्यासाठी कॅसिनो जबाबदार नाहीत, तर सांत इनेज नाल्यासारख्या शहरी नाल्यांमधून येणारे प्रक्रिया न केलेले घरगुती सांडपाणी जबाबदार आहे. सांडपाणी किनाऱ्यावर आणले जाते, तर ते नेणारा टँकर कधीही कॅसिनोच्या जेटीसमोर का दिसत नाही? सरकारने या टँकरच्या फेऱ्या, त्यांचे जीपीएस रेकॉर्ड, याचे पुरावे द्यावेत, केवळ लॉगबुकवर विश्वास ठेवणे कठीण आहे, असे लोकांचे म्हणणे आहे. कॅसिनोंमधून गोवा सरकारला दरवर्षी शेकडो कोटींचा महसूल मिळतो, हे खरे आहे; पण गोव्याची संस्कृती ही जुगाराची नाही. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कॅसिनो हवेत, पण स्थानिकांचे जगणे वेठीस धरून नव्हे; अन्यथा पर्यटकांचे आकर्षण असलेले हे दिवे एक दिवस मांडवीची आणि पणजीची ओळखच पुसून टाकतील.