

उमेश कुमार
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या मजबूत किल्ल्याला आता तडा जात असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपचा वाढता प्रभाव, मतदार यादीतील बदल आणि बदलती सामाजिक समीकरणे निवडणुकीला नवे वळण देत आहेत. बंगालमधील लढत केवळ सत्तेसाठी नाही, तर अस्मिता आणि राजकीय भविष्यासाठीची आहे.
पश्चिम बंगालचे राजकारण पुन्हा तापले आहे. सत्ताकारणातील हालचाल वाढली असून, पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक लक्ष पश्चिम बंगालकडे लागले आहे. येथे लढाई केवळ जागांची नसून सत्ता, अस्मिता आणि भविष्यातील राजकीय अस्तित्वाची बनली आहे. एका बाजूला ममता बॅनर्जी यांचा मजबूत वाटणारा किल्ला आहे, तर दुसर्या बाजूला भाजपचा झपाट्याने वाढणारा प्रभाव. यामध्ये काँग्रेस कमकुवत असली, तरी ‘गेमचेंजर’ ठरू शकते.
पश्चिम बंगाल दीर्घकाळ डाव्या पक्षांचा बालेकिल्ला होता. 1977 ते 2011 या काळात डाव्या आघाडीने सलग सत्ता राखली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ‘माँ, माटी, मानुष’ या घोषणेवरून सत्ता मिळवली; मात्र 15 वर्षांनंतर आता त्यांच्या सत्तेविरोधात नाराजी वाढताना दिसते. भाजपाचा उदय हा या बदलाचा मुख्य घटक आहे. 2016 मध्ये केवळ 10 टक्के मतांवर असलेला भाजप 2021 मध्ये 38 टक्क्यांपर्यंत पोहोचला. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसनेही आपला मतशेअर वाढवला; पण काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा मोठा र्हास झाला. याच रिकाम्या जागेत भाजपने आपली ताकद निर्माण केली. या निवडणुकीत सर्वात चर्चेचा विषय ठरली आहे, मतदार यादीचे विशेष पुनरावलोकन (एसआयआर) मोहीम. सुमारे 90 लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळली गेल्याची चर्चा आहे, जी एकूण मतदारांच्या जवळपास 12 टक्के आहे. याचा थेट परिणाम निवडणूक निकालांवर होणार आहे. विशेषतः शहरी भागात, जिथे पूर्वी तृणमूलचा मजबूत प्रभाव होता, तिथे मतदारांची भूमिका बदलताना दिसते. ‘भद्रलोक’ वर्गातील मतदारांमध्ये भाजपविषयीचा संकोच कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
बंगालमधील धार्मिक आणि सामाजिक रचना निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावते. हिंदू बहुल आणि मुस्लीमबहुल मतदारसंघांमध्ये वेगवेगळे मतदान पॅटर्न दिसतात. तृणमूलचा मुस्लीम मतदारांवर मजबूत प्रभाव आहे, तर भाजपचा आधार काही विशिष्ट हिंदू समुदायांमध्ये आहे; मात्र एसआयआर प्रक्रियेमुळे दोन्ही पक्षांच्या मतदारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.
या निवडणुकीला आता अस्मितेचा रंग चढला आहे. ममता बॅनर्जी या मुद्द्याला बंगालच्या ओळखीशी जोडत आहेत, तर भाजप याला पारदर्शकता आणि शुद्धीकरणाचा भाग मानत आहे. बेरोजगारी, उद्योगांची कमतरता, भ-ष्टाचार आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न मागे पडताना दिसतात. त्यामुळे मतदार कोणत्या मुद्द्यावर मतदान करतो, यावर निकाल अवलंबून असेल. तृणमूल सरकारच्या ‘लक्ष्मी भंडार’ आणि ‘कन्याश्री’सारख्या योजनांमुळे महिला मतदारांमध्ये ममतांचा मोठा प्रभाव आहे. या योजनांमुळे महिलांना थेट आर्थिक मदत मिळते. याला उत्तर म्हणून भाजप महिला आरक्षणासारख्या मुद्द्यांवर भर देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे महिला मतदारांचा कल निर्णायक ठरू शकतो.
भाजप शहरी भागात आपली पकड मजबूत करत आहे आणि नवीन सामाजिक गटांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तृणमूल मात्र ग्रामीण भागातील आपला पारंपरिक आधार मजबूत ठेवण्यावर भर देत आहे; मात्र शहरी असंतोष वाढत असल्याने तृणमूलसाठी ही चिंतेची बाब आहे. काँग्रेसची स्थिती कमकुवत असली, तरी ती पूर्णपणे अप्रासंगिक नाही. अनेक ठिकाणी ती ‘कटिंग फॅक्टर’ ठरू शकते. काही मतदारसंघांमध्ये त्रिकोणी लढतीमुळे निकालावर परिणाम होऊ शकतो. भाजप आणि तृणमूल दोघांनाही काँग्रेसच्या भूमिकेचा फायदा किंवा तोटा होऊ शकतो.