Mahavir Jayanti 2025 | कल्याणमित्र भगवान महावीर

भगवान महावीरांनी प्रत्येक जीवाकडे सम्यकद़ृष्टीने पाहण्याची शिकवण दिली
Mahavir Jayanti 2025
कल्याणमित्र भगवान महावीरpudhari photo
Published on
Updated on
प्रा. डॉ. विजय ककडे

‘अहिंसा’ ही जीवनपद्धती, विचारपद्धती व कृतीतून जगण्याची जीवनशैली असून जैन परंपरेचा तो एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. भगवान महावीरांनी प्रत्येक जीवाकडे सम्यकद़ृष्टीने पाहण्याची शिकवण दिली. इच्छा आणि गरजा यांचा समतोल साधण्यासाठी अपरिग्रह हे जीवनसूत्र महत्त्वाचे ठरते.

तंत्र प्रगतीसोबत मानवी जीवन अधिक सुलभ, संपन्न होत असले, तरी समाधानी, आनंदी होण्याचे ध्येय अद्याप दूरच राहिले आहे. काही मोजक्या ठिकाणी दिसणारी संपन्नता व व्यापक ठिकाणी दिसणारी विषमता याच्या सोबत सातत्याने चालणारी युद्धे, संघर्ष, इतरांचे हिरावून घेण्याची वृत्ती, निसर्गाची अतोनात लूट हेही आजचे वास्तव आहे. कोणत्या तत्त्व प्रणालीचा स्वीकार केल्याने सर्व मानवजात सहिष्णू, संपन्न, परस्परहित समजून घेऊन वैयक्तिक स्तरावर आनंद व सामाजिक स्तरावर विश्वास व शांती संपादन करू शकेल, यासाठी कल्याण मार्ग दर्शवणार्‍या भगवान महावीरांनी दिलेली जीवनमूल्ये आदर्शवत ठरतात. नवतंत्रज्ञानाचा सम्यक वापर हा महाविनाशाच्या टोकावरून परत फिरण्याचा मूलतंत्र ठरेल. ‘जगा व जगू द्या’ या शाश्वत विश्वकल्याणाचे तत्त्वज्ञान आचरणात आणण्याचा आग्रह धरणारे जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर हे प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेतील परीस ठरतात.

प्रयत्नवाद हा दैववाद व देववाद यापेक्षा श्रेष्ठ असून त्याग, निग्रह, सातत्य या सोपानाचा वापर करीत 2,500 वर्षांपूर्वीपासून शाश्वत मानवी मूल्ये केंद्रस्थानी ठेवणार्‍या भगवान महावीरांच्या मार्गावर वाटचाल करणे ही आता अपरिहार्य आवश्यकता आहे. ही मूलतत्त्वे समजून घेणे वैयक्तिक व सामाजिक कल्याणास उपयुक्त ठरते. ‘अहिंसा’ ही जीवनपद्धती, विचारपद्धती व कृतीतून जगण्याची जीवनशैली असून जैन परंपरेचा तो एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. भगवान महावीरांनी प्रत्येक जीवाकडे सम्यकद़ृष्टीने पाहण्याची शिकवण दिली. केवळ पशूंचा बळी न देणे अथवा मांसाहार न करणे एवढा मर्यादित अर्थ अहिंसेचा नाही. शारीरिक हिंसेपेक्षादेखील अधिक खोलवर परिणाम करणारी भावनिक हिंसा असते.

दुसर्‍याच्या मनास, त्याच्या भावनांनादेखील आपण शब्दातून अथवा कृतीतून दुःख न देता आपण आपल्या जीवन पद्धतीत हे आचरण मूल्य आणणे ही भावअहिंसा तेवढीच महत्त्वाची ठरते. दैनंदिन व्यवहारात अनेकवेळा अकारण केवळ अधिकार आहे म्हणून आपल्यापेक्षा कनिष्ठ असणार्‍यांवर तोंडसुख घेणारे आपण पाहतो. त्याची भूमिका, कृती बरोबर असू शकेल, हा विचारही भावहिंसा टाळू शकतो. केवळ अल्पशा कारणाने टोकाची कृती करणारे भावहिंसक तणावाचे, संघर्षाचे कारण बनवतात. कृती ‘प्रतिक्रिया’ न बनता ‘प्रतिसाद’ बनवण्याचा प्रयत्न आपणास व इतरासही फायद्याचा ठरतो. दुसर्‍याच्या विचाराला, विरोधकास केवळ म्हणणे पटत नाही म्हणून मान्यता देत नाही, ही विचार हिंसा आज प्रबळ होताना दिसते.

आपल्या इच्छा आणि गरजा यांचा समतोल साधण्यासाठी अपरिग्रह हे जीवनसूत्र महत्त्वाचे ठरते. प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करता येतील; पण कुणा एकाच्या सर्व इच्छा पूर्ण करणे शक्य नाही, हे गरजा व अत्यंतिक हाव यातील भेद स्पष्ट करते. एका बाजूला जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यास असमर्थ असलेला मोठा समुदाय व दुसर्‍या बाजूला अब्जाधीशांच्या वाढती संख्या ही विषमता एकूण मानवी जीवनातील विसंगती दर्शविते. केवळ आर्थिक प्रगती हीच आपली यशस्वीता मानणारी धोरणे एका मोठ्या आरिष्टाकडे नेत आहे. अपरिग्रहाचा स्वीकार हाच त्यावर उपाय आहे. जैन मुनी संन्यासी या तत्त्वाचा अत्यंतिक वापर करून एक वेगळा आदर्श देत असले, तरी प्रत्येकाने अंशतः याचा स्वीकार केल्याने समृद्ध व समाधानी जीवनशैली निर्माण होऊ शकते. अपरिग्रह तत्त्वाचा वापर करून केलेला प्रवास हा आनंददायी असतो, हे किमान सामान घेऊन प्रवास करणार्‍यास चांगलेच माहीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news