

शशिकांत सावंत
सह्याद्रीच्या निसर्गवैभवाची आणि जैवविविधतेची नवी ओळख परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. आंबोलीच्या पायथ्याशी फुलपाखरांचे गाव म्हणून नावारूपाला आलेले पारपोली हे त्याचे सुंदर उदाहरण.
महाराष्ट्राला आणि विशेषत: कोकणला परदेशी पर्यटकांची पसंती मिळत असताना सावंतवाडी तालुक्यातील वैविध्यपूर्णतेने नटलेल्या आंबोली घाटाच्या पायथ्याशी एक गाव, ज्याला महाराष्ट्र सरकारने फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित केले आहे. त्याचे नाव आहे पारपोली. पारपोली हे समृद्ध जैवविविधतेचे गाव. या गावाची ख्याती आता सर्वंदूर पोहोचली आहे. फ्रान्सहून आलेले पर्यटक सेबॅस्टीयन यांनी पारपोलीला भेट देऊन येथील जैवविविधतेच्या गुणांकनांना मोठी पावती दिली. हे गाव म्हणजे निसर्गातील एक जिवंत प्रयोगशाळाच आहे. इथे १८० हून अधिक प्रजातीची रंगबिरंगी फुलपाखरे आढळतात. निसर्गाच्या या दालनात २०० हून अधिक दुर्मीळ अशा प्राणी व पक्ष्यांचे वास्तव्य आहे.
फुलपाखरांसाठी अनुकूल वातावरण असल्याने या हंगामातही फुलपाखरांचे रंगबिरंगी थवे सर्वांनाच मोहित करणारे आहेत. खरं तर आंबोली हे बेडकाच्या विविध जातींसाठी प्रसिद्ध आहे. येथे दुर्मीळ सर्पांच्या जाती आढळतात. त्यापुढे सोनवडे भागात आल्यानंतर मधमाश्यांच्या विविध जाती दृष्टीपथास येतात. त्याहीपुढे दाजीपूर अभयारण्यापर्यंत गव्याबरोबरच शेकरूचेही दर्शन होते. या प्रत्येक भागातील निसर्ग, स्थानिक संस्कृती परंपरा, लोकांची जीवनशैली या सर्वांचाच परदेशी पर्यटक अभ्यास करत आहेत. पारपोली येथील परंपरा, राहणीमानाचा अभ्यास फ्रान्सच्या पर्यटकांनी केला. इथला जिव्हाळा अनुभवला. कोकणी पदार्थ, उकड्या तांदळाचा भात, आमटी सोलकढी, घावण आंबोळी आणि अस्सल मालवणी पदार्थांचा आस्वाद घेतला. इथल्या माणसांचा साधेपणा, आदरातिथ्याचे मनापासून कौतुक केले. इथल्या निसर्गाने आपल्याला अक्षरश: भुरळ घातली. इथली फुलपाखरे पाहणे म्हणजे एक अविस्मरणीय आनंद देणारा आहे. येथील आपुलकी, शांतता आणि लोकांचे भावविश्व आपलेसे करणारे आहे, अशी त्यांनी पोचपावतीही दिली.
अशाच प्रकारे मधाचे गाव असलेले फोंडाघाट, राधानगरीवरील घाटमाथा, त्याचबरोबर किल्ले रायगड, शिवथळ घळ अशी रम्य ठिकाणे परदेशी पर्यटकांना खुणावू लागली आहेत. खरं तर पश्चिम घाट हा वनौषधींचा खजिना आहे. अनेक वनौषधी येथे आहेत. पूर्वींच्या वैद्यांकडे याची इत्थंभूत माहिती होती. कालांतराने ही माहिती पडद्याआड गेली. पण याचे संशोधन करण्यासाठी आता संशोधकांच्या नजरा या भागाकडे वळल्या आहेत. सावंतवाडीत एक फुलपाखरांचे गाव जसे घोषित झाले, त्याच धर्तीवर सह्याद्री पट्ट्यातील वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या गावांना नवी ओळख करून दिली तर निश्चितच हे निसर्ग पर्यटन आणखी बहरू शकेल. यासाठी पूर्वी वन विभागाने वन पर्यटनाची एक योजना कार्यान्वित केली होती. स्थानिक लोकांच्या समित्या करून त्यांच्या माध्यमातून वन संवर्धन आणि वन पर्यटन यांना चालना दिली जात होती. परंतु कालांतराने हा विषय मागे पडत गेला. जे आवश्यक आहे, त्यावर लक्ष देणे बंद केले गेले आणि काळाच्या ओघात योजना मागे पडत गेल्या.
कोकणात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या निमित्ताने हा विषय पुन्हा समोर आला आहे. भारंगीसारखी औषधी भाजी सापडणाऱ्या गावाला भारंगीचे गाव म्हणून ओळख देणे शक्य आहे. यातून त्या त्या वैशिष्टयपूर्ण वनस्पती, प्राणी, पक्षी या सर्वांचे संवर्धन होईल. फोंडाघाटच्या उगवाईच्या परिसरात सापडणारे शेकरू, हेही त्या भागाचे वैशिष्ट्य आहे. कवी वसंत सावंत यांची कविता आजही त्या भागाचे वैशिष्ट्य सांगते...
आई उगवाई तुला कुठे सूर्यबिंब,
तेणे माझ्या घरादारा मला अमृताचे कोंब,
अशा कवितेबरोबरच...
अशा लाल मातीत जन्मास यावे,
जिचा रंग रक्तास दे चेतना
तिथे नांदते संस्कृती भारताची
घरातून दारात वृंदावना...
अशा कवितांपर्यंत सह्याद्रीच्या या वैशिष्ट्यांची ओळख त्या काळच्या ख्यातनाम कवींनी करून दिली होती. कोकणच्या कृषी आणि वैविध्यपूर्ण जंगलांशी समरसता दाखवणारे प्रयोग त्या काळात साहित्याच्या प्रांगणात झाले. अशाच पद्धतीने सह्याद्रीचा शोध आणि त्यातून मिळणारा बोध आपण वेळीच घेतला तर पर्यटनाला आणि इथल्या प्रदेशाला नवे चैतन्य लाभेल हे नक्की.