
महाराष्ट्रातील शहरे भरभरून वाहत आहेत. ग्रामीण भागात चरितार्थ होत नाही म्हणून उपजीविकेसाठी लोक शहराकडे धाव घेतात. पुण्याचे उदाहरण घेतले तर विदर्भ, खानदेश, मराठवाडा, कोकण या सर्व भागातून लोक पुण्याकडे येत असतात. महाराष्ट्र राज्यापुरते बोलायचे झाले तर परप्रांतीय कामाला नाहीत, असे कोणतेही मोठे शहर महाराष्ट्रात राहिलेले नाही. आपल्या भागातील सधन शेतकरी आपल्या शेतीवरील कामासाठी चक्क नेपाळमधून माणसे घेऊन येतात. कोकणातील आंबा उद्योग पूर्णतः नेपाळी लोकांवर अवलंबून आहे. कोणत्या का कारणाने होईना, पण शहरात लोकसंख्या वाढली की, साहजिकच येथील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडतो. महाराष्ट्रातील कोणतेही मोठे शहर घ्या, तिथे वाहतूक कोंडी आहेच आहे. पुणे शहरालगत असलेले हिंजवडी नावाचे गाव आयटी क्षेत्रामध्ये जगाच्या नकाशावर आपले स्थान राखून आहे.
आपल्या देशात आयटी क्षेत्रामध्ये पुणे, हैदराबाद आणि बंगळूर यांच्यामध्ये स्पर्धा आहे. पुणे आणि बंगळूर या दोन्ही शहरांमध्ये साम्य एकच आहे की, दोन्हीकडे वाहतूक कोंडीची समस्या आहे. हिंजवडीमध्ये मोठ्या आयटी कंपन्या आल्या असल्या तरी साधे रस्ते धड नाहीत हे विशेष आहे. नुकतेच आयटीमधील कर्मचारी आणि गावकरी या सर्वांनी मिळून रास्ता रोको केला आणि आंतरराष्ट्रीय नकाशावर असलेल्या हिंजवडी गावातील रस्त्यांची दुर्दशा समोर आली. एखादा संगणक अभियंता आठ तास कंपनीत जाऊन काम करत असेल तर त्याला जाण्यासाठी अडीच तास आणि येण्यासाठी अडीच तास लागत असतील तर त्याने नोकरी कशी करायची, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
आपल्या ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना विदेशी नागरिक आणि तंत्रज्ञ भेट देतात, किमान तेथील रस्ते तरी व्यवस्थित आणि वाहतुकीची कोंडी न होणारे असावेत ही अपेक्षा करण्यात काही गैर नाही. वारीमध्ये जसे रिंगण असते तसेच हिंजवडी परिसरामध्ये प्रत्येक चौकात दररोजचे रिंगण होत असते. फरक एवढा आहे की, हे रिंगण वाहनांचे असते. बर्याच कंपन्या शहरातून आपल्या तंत्रज्ञ आणि कर्मचार्यांना स्वतःच्या बसेसमध्ये घेऊन कंपनीत आणून सोडत असतात आणि नेऊन सोडत असतात. या प्रकारातून कर्मचार्याला गाडी चालवण्याचा त्रास होत नाही. पण तासन्तास काही न करता गाडीमध्ये बसण्याचा आणि वेळ जाण्याचा मात्र मोठा त्रास आहे. या सगळ्या कंपन्या परदेशी कंपन्यांकडून पैसे कमवून आपल्या देशात आणत असतात तेव्हा त्यांना प्राधान्याने सर्व सुख-सुविधा पुरवणे हे आपले कर्तव्य निश्चितच आहे.
याबाबतीत तेलंगणाने म्हणजे हैदराबादने आघाडी घेतली आहे असे लक्षात येईल. आयटी कंपन्यांसाठी त्यांनी सायबराबाद नावाचे वेगळे शहरच बसवले आहे जिथे सर्वात उत्तम सुविधा,रस्ते, पाणी पुरवले गेले आहे. तशा प्रकारची कुठलीही सोय पुणे, बंगळूर येथे होऊ शकली नाही याचे वैषम्य वाटते.