महायुती म्हणून एकत्र, तरीही स्वतंत्र!

Mahayuti Alliance
महायुती म्हणून एकत्र, तरीही स्वतंत्र!
Published on
Updated on

शशिकांत सावंत, कोकण वार्तापत्र

ठाणे आणि पालघर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला आठ व बहुजन विकास आघाडीला आठ अशा समान जागा मिळाल्या. शिवसेनेला पाच जागा मिळाल्याने ती किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे. निवडणुका आणि ताकदीचे राजकारण याची गणिते उलगडणारा ऊहापोह.

कोकणात महायुती म्हणून भाजप-शिवसेना पक्ष सत्तेत एकत्र असले तरी स्वताकदीचा प्रवास मात्र स्वतंत्रच आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि आत्ताच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही याचीच प्रचिती आली. कोकण म्हटलं की, शिवसेना असा गेल्या २० वर्षांचा इतिहास आहे. मात्र शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर हे गणित बिघडू लागले आहे आणि एकेकाळचा शिवसेनेचा बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात जाणार का, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि यातूनच शिंदेंच्या शिवसेनेने स्वतंत्र ताकद निर्माण करण्‍यासाठी अलीकडच्या काळात अनेक पावले उचलली. त्यातीलच बहुजन विकास आघाडीशी युती करण्‍याचा त्यांनी घेतलेला निर्णय हा याच मोहिमेचा भाग होता.

ठाणे आणि पालघर जिल्हा मध्‍यवर्ती बँकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीबरोबर युती करून भाजपच्या परिवर्तन पॅनेलला रोखण्‍याची किमया शिवसेनेने केली. मात्र, निवडणूक झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष रवींद्र चव्‍हाण यांनी जिल्हा बँकेवर सेना-भाजप सत्ता स्थापन करेल, असे सांगितल्याने शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढविणाऱ्या बहुजन विकास आघाडीचे काय होणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना-बहुजन विकास आघाडी पुढेही एकत्र राहतील, असा नवा ट्विस्ट समोर आला आहे. त्यामुळे त्या निवडणुकीतील कवित्व सुरूच आहे. अशाच पद्धतीची प्रचिती यापूर्वीही झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत आली होती. त्या निवडणुकीनंतर ठाणे, कल्याण, उल्हासनगर महापालिका शिवसेनेने तर मीरा-भाईंदर, भिवंडी, नवी मुंबई महापालिकेत भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले; तर वसई-विरारला बहुजन विकास आघाडीने आपले वर्चस्व राखले. सिंधुदुर्गात नगरपालिकांमध्‍ये शिवसेना विरुद्ध भाजप सामना रंगला आणि तेथेही सेना-भाजपने समान ताकदीवर आपले यश मिळवले. पण सिंधुदुर्गात नारायण राणे यांचे दोन पुत्र नगरपालिकांत आमने-सामने असल्याने निवडणुकीनंतर सर्व शांत झाले. जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती म्हणून लढत झाली आणि दोन पक्षांमधला निखळणारा सांधा जोडला गेला.

सिंधुदुर्गात भाजपचे नीतेश राणे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याच पक्षाचा बोलबाला आहे; तर रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या पक्षाचे वर्चस्व कायम ठेवले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्‍यक्षपद भाजपकडे आहे, तर रत्नागिरीचे अध्‍यक्षपद शिवसेनेकडे आहे. नगरपालिका, पंचायत समित्यांच्या राजकीय गणितात सिंधुदुर्गात भाजप तर रत्नागिरीत शिवसेना पुढे आहे. रायगड जिल्हा परिषदांमध्‍ये शिवसेना-भाजप आमने-सामने उभे होते. यामध्‍ये अजित पवारांची राष्‍ट्रवादी भाजपबरोबर होती. त्यामुळे शिवसेनेने १८ एवढ्या सर्वाधिक जागा जिंकूनही राष्‍ट्रवादी-भाजपचे बहुमत जिल्हा परिषदेवर आल्याने शिवसेनेला सत्तेत येण्‍यासाठी नमते घ्‍यावे लागले. आता विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक मते असतानाही विधान परिषदेला राष्‍ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंना शिवसेनेने पाठिंबा दिला आणि ही निवडणूक बिनविरोध झाली. यामध्‍ये रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेला देण्‍याचा वायदा झाल्याचे भरत गोगावले यांनी जाहीर केले आहे. मात्र हा वायदा राष्‍ट्रवादी काँग्रेस पाळणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

रायगडचे पालकमंत्रिपद शिवसेनेकडे आल्यास शिवसेना या जिल्ह्यावर आपले वर्चस्व निर्माण करेल असे सांगितले जात आहे. सध्‍या या जिल्ह्यामध्‍ये शिवसेनेकडे तीन आमदार तर भाजपकडे तीन आमदार आहेत. रायगडचे खासदार आणि एक आमदारपद राष्‍ट्रवादीकडे आहे. मात्र आता शिवसेनेने या जिल्ह्यात पालकमंत्रिपदाच्या रूपाने आपली ताकद वाढविण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा बँक ते विधान परिषद आणि महापालिका ते नगरपालिका या सर्वच निवडणुकांमध्‍ये दोन्ही पक्षांनी स्वतंत्र ताकदीचा अजेंडा समोर आणला. पण सत्ता स्थापन करताना महायुती म्हणून दोन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे सत्तेसाठी एकत्र आलेले हे दोन पक्ष स्वबळाच्या ताकदीसाठी कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्‍ये आग्रही आहेत. त्यामुळे स्वताकदीचा बाणा एका बाजूला आणि सत्ता स्थापनेची चावी मिळविण्‍याची रणनीती दुसऱ्या बाजूला अशीच गोळाबेरीज पाहायला मिळत आहे. भविष्‍यात शिवसेना बहुजन विकास आघाडीला सोबत घेण्‍यासाठी अधिक आग्रही राहील, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे बच्चू कडूंच्या पक्षानंतर शिवसेनेला आता बहुजन विकास आघाडी या नव्‍या मित्राची प्रतीक्षा लागून राहिली आहे. ११ जुलैला ठाणे, पालघर जिल्हा मध्‍यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना कुणाबरोबर जाणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news