

मृणालिनी नानिवडेकर
महाराष्ट्राचे राजकारण पुढच्या निवडणुकांची प्रतीक्षा करीत आहे. पहिला लोकसभेतला सामना ‘मविआ’ विजयाचा, दुसरा विधानसभेचा महायुतीचा आणि आता पुढचा तिसरा कोणाचा? तिन्ही सरकारे एकाच विचाराची असावीत, ही लोकभावना असू शकते. सत्ताधार्यांकडे यंत्रणा असते, या समजामुळे विरोधक लढण्यापूर्वीच हरण्याच्या मानसिकतेत गेलेले नाहीत, हे उद्धव ठाकरे यांची दिल्लीवारी सूचित करत आहे. स्थानिक निवडणुकांचा कठीण पेपर सोडवण्यासाठी ‘मविआ’ एकत्र तरी असेल का, हा प्रश्न चर्चेत आहे. एकीचे बळ लोकसभेत कळले आणि बेकीचे फळ विधानसभेत मिळाले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगळे शब्द वापरत हे सत्य त्यांचे सहकारी खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत मांडले. ‘मविआ’चा खेळ संपला का? अशी शंका त्या वक्तव्यामुळे निर्माण झाली असतानाच उद्धव हे दिल्लीकडे निघाले आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण राहुल गांधी यांनी स्वत: दूरध्वनी करीत उद्धव यांना दिले आणि त्यांनी ते स्वीकारले. खरे तर ते फार कुठे जात नाहीत, असे त्यांचे विरोधक सोडा, सहकारीही सांगतात; पण आताशा उद्धव हे सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले आहेत. ‘मातोश्री’तून वारंवार वाहनांचा ताफा बाहेर पडतो आणि कधी पक्ष शाखेत, कधी विधान भवनात पोहोचतो. आता तर दिल्लीकडे कूच केली आहे. सेनापतीने मैदानात उतरून नेतृत्व करण्याचेच दिवस आहेत हे! देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, राज्याचे तिघेही कारभारी कायम माणसात असतात. शरद पवार हे राज्यातील भाजपेतर आघाडीचे प्रमुख की उद्धव? याचे उत्तर आजच्या स्थितीत तरी 20 आमदार आणि 8 खासदार असणारे उद्धव हे आहे. शरद पवारांचे अर्ध्याहून अधिक सैन्य अजित पवार यांच्याकडे दाखल झाले आहे, उरलेले कधी एकदा तिकडे जाऊ, अशा मानसिकतेत आहे.
सुप्रिया सुळे, नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, नवे सरचिटणीस रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे नेते महायुतीला कडाडून विरोध करतात, बाकी बहुतांश आमदार मनानेही अजित पवार यांच्याकडे आहेत. यातील रोहित पवार यांना भविष्यातील महत्त्वाचा राजकारणी व्हायचे आहे, आजोबांचा कित्ता गिरवायचा आहे; पण ते घाई करताहेत, असेही त्यांचे हितशत्रू खासगीत सांगतात; पण महायुतीच्या मंत्र्यांची आगळीक दाखवणार्या चित्रफिती समोर आणत त्यांनी आपली जागा निर्माण करण्यास प्रारंभ केला आहे. अर्थात, त्यांना तयार होण्यास बराच वेळ असल्याने सध्या विरोधाची मदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि निर्णयावर अवलंबून आहे. ते दिल्लीला तीन दिवस राहणार आहेत. प्रादेशिक पक्षांचे भाजपविरोधी राजकारण हा देशातील महत्त्वाचा विषय आहे. तेलगू देसम, जनता दल संयुक्त भाजपकडे वळले, तरी तृणमूल काँग्रेस, द्रमुक हे सत्तेतील प्रादेशिक पक्ष मोठे. महाराष्ट्रातले ठाकरे-पवार शिल्लक राहिलेल्या पक्षासह विरोधात राहतील, असे दिसत आहे. तशीही ठाकरेंच्या नेतृत्वाची सत्त्वपरीक्षा पाहणार्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका समोर आहेत. त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यावेळी त्यांच्यासमवेत येऊ शकतीलही! पदाधिकारी मेळाव्यात ‘आम्ही दोघे भाऊ झाले गेले विसरून भेटतो, तर तुम्ही का नाही,’ असा प्रश्न राज यांनी कार्यकर्त्यांना केला म्हणतात, तो पुरेसा बोलका असू शकेल. राज यांनाही स्वत:चे राजकीय भवितव्य सुधारायचे आहे. ते समवेत आले तर उद्धव ठाकरेंचा तो मोठा विजय असेल. दोघांच्या एकत्र येण्याची शक्यताही सत्ताविरोधी राजकीय छावणीतील वातावरणात तल्लखी आणते अशी स्थिती, तिथे एकत्र येणे ठरेल दसरा-दिवाळी! एकूण विधानसभेतल्या प्रचंड पराभवाने गलितगात्र झालेल्या महाविकास आघाडीत काही हालचाली सुरू झालेल्या दिसतात. मिठी नदीचा गाळ उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर शिंतोडे उडवण्यासाठी उपसला जातो आहे का? ते काहीसे माघारून फडणवीस यांना भेटताहेत का, या प्रश्नांची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. त्यांच्या दिल्ली भेटीमुळे ही चर्चा संपेल. ‘मविआ’तील पक्ष निवडणुका एकत्र लढतील की स्वबळावर ते सांगणे कठीण; पण ‘मविआ’चे गठबंधन इतिहासजमा झाले, या निष्कर्षाकडे नव्याने पाहता येईल.
उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत आहेत. राहुल गांधी त्यांच्या संपर्कात असतात. दोघे कुटुंबातल्या सत्तेचे वारसदार, दोघांचा एकमेकांशी उत्तम संवाद. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अजून सूर पकडण्याच्या प्रयत्नात आहेत. वाईट दिवसात एकेकाळी हिंदुत्ववादामुळे दूर ठेवलेल्या ठाकरे घराण्याचा काँग्रेसला आधार वाटतो. मुद्दे हाताळण्यात अपयश येते आहे. काँग्रेस किंवा अन्य विरोधी सदस्यांनी जनसुरक्षा विधेयकातील तरतुदींना संयुक्त समितीत मान्यता दिली. सरकारनेही त्यांच्या सूचना मान्य करत एकतृतीयांश कायदा बदलला. नंतर जाहीर विरोध, राहुल गांधी यांच्या निरोपानंतर सुरू झाला, असेे म्हणतात. आपापली भौगोलिक क्षेत्रे राजकीय बांधबंदिस्ती करून सुधारण्याची हीच वेळ आहे, हे काँग्रेस नेते जाणतात. सतेज पाटील त्यामुळे शक्तिपीठ महामार्गापासून तर माधुरी हत्तिणीच्या ‘वनतारा’तील स्थलांतरापर्यंतच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय झालेले दिसतात. शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला राज ठाकरे हजर राहिले आणि उद्धव ठाकरेंचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या संजय राऊतांच्या मांडीला मांडी लावून बसले. अशी एकत्रीकरणे विरोधी ऐक्याचे प्रतीक असतात.
भाजपने सत्ता नसतानाही असेच केले. मेळावे घेतले, बेरजा केल्या. विरोधकांना ते कळते आहे. लोकसभेतले निकाल विधानसभेत पार बदलले. महायुती लोकसभेच्या निकालानंतर डगमगली नाही. उलट लाडक्या बहिणींची मोट बांधण्यापासून तर नरेटिव्हच्या लढाईचे उत्तर देण्यापर्यंत शक्य ते सगळे केले गेले. नशीब पालटले. फासे उलटवण्यासाठी स्थानिक निवडणुकांत अशी उलटफेराची संधी आहे का, याचा शोध विरोधी पक्षांनी घेतला पाहिजे. छोट्या पातळीवर तसेही इच्छुक जास्त. संधी साधण्याची तडफड मोठी. त्यामुळे महायुतीला परास्त करणार्या फटी शोधल्या तर सापडू शकतील. दिल्लीत इंडिया आघाडी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांचा, बिहारच्या परिस्थितीचा खल करेल; पण एकत्र आलेल्या नेत्यांची छायाचित्रे ‘मविआ’लाही बळ देतील. पुढच्या निवडणुका या आपापल्या शक्तीचे स्थानिय प्रदर्शन आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा लंबक महायुतीवर स्थिरावलेला नाही, हे दाखवायची संधी ‘मविआ’ला मिळणार आहे. ती साधता येते का ते बघायचे. महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या नव्या लोकनियुक्त कारभार्यांच्या प्रतीक्षेत आहेत. संधींच्या स्पर्धेत न लढता हरणे परवडणारे नसते. बघू या काय काय होतेय!