Monsoon Session | विरोधकांचे अपयश

Monsoon Session |
Monsoon Session | विरोधकांचे अपयश(Pudhari File Photo)
Published on
Updated on

महाराष्ट्र विधिमंडळाचे तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी संस्थगित झाले. विधानसभा आणि विधान परिषदेत सत्ताधारी महायुतीच्या तुलनेने विरोधी पक्ष संख्येने बराच कमी असला, तरी जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यात विरोधक कमी पडले. विरोधी पक्ष विस्कळीत होतेच; पण समन्वय नसल्याने ते दिशाहीन दिसले. जनतेचा आवाज आपण उठवतो, असा भास त्यांनी निर्माण केला, तरी त्यात जोश दिसला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य बनविण्याचे प्रयत्न विरोधकांनी केले; पण फडणवीस यांनी आपल्या राजकीय अनुभवाचे, चातुर्याचे दर्शन घडवत आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलेच, विरोधकांच्या शिडातील हवाही काढून घेतली. त्यांच्या वक्‍तव्यावर सभागृहाबाहेर टीका झाली खरी; पण प्रसंगी कोणता ‘अवतार’ धारण करू शकतो याची त्यांनी जी झलक दाखवली त्याचीच चर्चा अधिक झाली. शेतकऱ्यांना विनाअट दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी सरकारकडून मंजूर करून घेण्यात विरोधी पक्षाला यश मिळाले, हे उल्लेखनीय आणि अधिवेशनाचे फलित म्हणावे लागेल. अधिवेशन काळातच मुंबई, कोकणाला अतिवृष्टीने झोडपून काढले. चार दिवस रोज दोनशे ते अडीचशे मिलिमीटर पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई झाली.

लोणावळा-खंडाळा परिसरात साडेचारशे मिमी.पेक्षा जास्त पावसाने थैमान घातले व वेगवान वादळी वाऱ्याने घाटात दरडी कोसळल्या. निसर्गाने रौद्रावतार धारण केल्यावर काहीच करता येत नाही, याचा अनुभव यापूर्वीही अनेकदा आला आहे. २६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीने मुंबापुरी कित्येक दिवस विस्कळीत होती. मुंबई-पुणे मार्गावर बोर घाटात पावसाळ्यात दरडी कोसळून रस्ता व रेल्वे मार्ग बंद पडल्याची अनेक उदाहरणे आहेत; मात्र यंदाच्या अतिवृष्टीत शंभर टनांची दरड मिसिंग लिंकवर कोसळून मार्ग काही काळ बंद झाला. त्यावर विरोधकांनी सात हजार कोटी पाण्यात गेले म्हणून आक्रोश करत राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वापरून, सात ते आठ देशांतील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उभारलेला मिसिंग लिंक देशाच्या पायाभूत सोयी-सुविधांत मोलाची भर घालणारा ठरला आहे. जगातील सर्वांत मोठा बोगदा या पुलावर आहे. मुंबई-पुणे अंतर अर्ध्या तासाने कमी झालेच, शिवाय वाहतुकीची वारंवार होणारी कोंडी व अपघातही कमी झाले. मिसिंग लिंक हा तंत्रज्ञानाने घडवलेला चमत्कार आहे. या नैसर्गिक दुर्घटनेचे भांडवल केले गेले.

बोगद्याच्या तोंडावर दरड कोसळून साचलेला शंभर टनांचा मलबा, माती, दगड यांचा ढिगारा युद्धपातळीवर काम करून हटविण्यात आला आणि १८ तासांत मिसिंग लिंकवरून वाहतूक पूर्ववत सुरू झाली. रस्ता, बोगदा कशालाच तडा गेला नाही, तरी मिसिंग लिंक कोसळला असा अपप्रचार सोशल मीडियातून केला गेला. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाची चांगलीच खरडपट्टी काढलेली दिसते. सात हजार कोटी पाण्यात, असा खोटा प्रचार करून आपला नाही, महाराष्ट्राचा अपमान झाला, अशा शब्दांत विरोधकांना त्यांनी फटकारले. अगोदरच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी ‘भाडे के टट्टू’ म्हणून विरोधकांना सुनावले होते. त्याचा राग विरोधी पक्षांना आला. सुसंस्कृत भाषेत 'भाटक गदर्भ' म्हणतात, तुम्हाला समजले नसेल तर 'सुपारीबाज' म्हणतात, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

विधिमंडळाच्या अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडण्यापेक्षा किंवा विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यापेक्षा सरकारची आणि विशेषत: मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यातच विरोधी पक्षाला रस आहे, असे दिसले. सभागृहात विजय वडेट्टीवार, नाना पटोले, जयंत पाटील, सतेज पाटील, रोहित पवार, भास्कर जाधव, वरिष्ठ सभागृहात अंबादास दानवे विरोधी बाकांवरून सक्रिय असतात. देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांनी आरोपांवर सडेतोड उत्तर दिले. सभागृहात उत्तम चर्चा घडविण्याऐवजी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर घोषणा द्यायच्या, हे वारंवार घडत आहे. केवळ न्यूज चॅनेलच्या कॅमेऱ्यांपुढे प्रसिद्धीसाठी असे वारंवार करण्याने त्यातले गांभीर्यही कमी होते. विधानसभेचे अध्यक्ष व विधान परिषदेचे सभापती हे उदार मनाने दोन्ही सभागृहांत विरोधी सदस्यांना भरपूर संधी देत असतात; पण त्याचा लाभ घेऊन सरकारकडून जनतेला न्याय मिळवून दिला, असे क्वचितच बघायला मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news