

देशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या तेव्हा ‘झाल्या निवडणुका’ असे म्हणून तुम्ही सुस्कारा सोडला असेल तर थांबा! भारत-पाकिस्तान युद्ध जेमतेम पाच दिवस चालले आणि त्यानंतर युद्धविराम झाला. पाकिस्तानला धडा शिकवून आपण समाधानी झालो. आता काही लगबग किंवा गडबड नाही, असे तुम्हाला वाटत असेल, तर तसे नाही. अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. तुम्ही शांत असाल; परंतु तुमचे भावी नगरसेवक मात्र कामाला लागले आहेत, हे निश्चित!
नगरसेवक होण्यासाठी एका वॉर्डमध्ये किमान 30 ते 40 जण इच्छुक असतात. त्यांनी वर्षभरापूर्वीपासूनच तयारी करून ठेवली होती; परंतु सुप्रीम कोर्टाच्या काही एक निर्णयामुळे या निवडणुका लांबल्या होत्या. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आता मैदानात उडी टाकतील आणि एकच रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळेल. निवडणूक जिंकण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, त्या सर्वाची या लोकांची तयारी आहे. सर्वात प्रथम म्हणजे पैसे लागतात ते या इच्छुक उमेदवारांनी आधीच तरतूद करून जमा करून ठेवलेले आहेत. वेळप्रसंग आला तर दोन-चार तुकडे जमीन पण विकून टाकू; पण कधी ना कधी नगरसेवक होऊन दाखवणार, असा काही जणांचा बाणा असतो.
संपूर्ण प्रॉपर्टी विकून निवडणुका लढवणारे लोक आहेत. याचे कारण म्हणजे, राजकारण हे एक व्यसन असते, हे सर्वांनीच मान्य केले आहे. एखादा व्यक्ती एखाद्या वार्डातून उभा राहिला, तर तो हमखास पडणार, हे तुम्हाला-आम्हाला माहीत असते; परंतु त्या व्यक्तीचे स्वतःचे एक समीकरण असते आणि त्यामुळे त्याला आत्मविश्वास असतो. वार्डातून उभे राहताना स्थानिक पातळीवर आपल्या जातीचे मतदान किती आहे, याची माहिती प्रत्येकाला असते. आपण उभे राहिलो, तर आपल्या जातीची मते आपल्याला हमखास मिळणार, या खात्रीमुळेच अनेक उमेदवारांची माती होत असते.
एखाद्या उमेदवाराच्या जातीचे मतदार जास्त असतील, तर त्यात फूट पाडण्यासाठी त्याच्याच जातीचे असंख्य उमेदवार उभे केले जातात आणि मतदारसुद्धा भांबावून जातो. जातीप्रमाणे मतदान होतेच याची प्रत्येकाला खात्री असते; परंतु आता जनमानस बदलत चालले आहे.जातीपातीच्या पलीकडे पाहणारे मतदान होत आहे. त्यामुळे हमखास विजयाची खात्री असलेले उमेदवारसुद्धा सपाटून मार खाताना दिसत आहेत. निवडणूक लढवण्यासाठी दुसरी गोष्ट लागते ती म्हणजे कार्यकर्ते. निवडणुकांच्या आधी साधारण सहा महिन्यांपासून कार्यकर्त्यांना सांभाळावे लागते, तर ते प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये काम करतात. कार्यकर्त्यांना सांभाळणे म्हणजे आपला खिसा आणि हात मोकळा ठेवणे होय.