

मृणालिनी नानिवडेकर
महाराष्ट्र आज उद्योग, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीच्या नव्या संधींमुळे विकासाच्या निर्णायक वळणावर उभा आहे. या संधींचा वेग कायम ठेवताना सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास आणि सामान्य माणसाच्या जीवनमानाचा समतोल साधणे हेच नव्या महाराष्ट्रासमोरील खरे आव्हान आहे.
ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमीचे स्वप्न पाहणारी अर्थव्यवस्था, प्रचंड मोठा सागरकिनारा, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसारखे औद्योगिकीकरणाला सरावलेले भूप्रदेश आणि गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात निर्माण होत असलेल्या खनिकर्माच्या संधी. आजचा महाराष्ट्र टेकऑफच्या तयारीत आहे. उज्ज्वल उद्यासाठीची ही तयारी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने देशाचा पुढारी करेल. येथे सर्व काही आहे. उत्तम निसर्गसंपत्ती, कुशल मनुष्यबळ, प्रगत विचार आणि व्यावसायिक दृष्टिकोन. येथील शैक्षणिक संस्थांचा पसारा मोठा. परदेशी विद्यापीठे येथे आपले पाडाव शोधून सेवा देण्याच्या विचारात आहेत. मुंबईतला विकास चौथी मुंबई निर्माण करून अधिक भविष्यगामी करण्याच्या दिशेने पावले पडत आहेत. समृद्धीची वाट आली, आता राज्याला गतिशक्ती द्यायची आहे.
खरे तर महाराष्ट्राच्या इतिहासात अशी उड्डाणासाठीची सुवर्णघटिका येणे हा सुवर्णयोग. केंद्रातले सरकार आणि राज्यातले सरकार एकच असल्यामुळे डबल इंजिनचा प्रभाव आहे. येथील नोकरशाहीचा लौकिक पूर्वांपार अत्यंत उत्तम असा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याचे ध्येय या नोकरशाहीने मनापासून स्वीकारावे. देवेंद्र फडणवीस यांच्या जोडीला एकनाथ शिंदे यांच्यासारखा दमदार, लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या प्रागतिकतेला अनुसरून कित्येक वर्षांनंतर उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अशी दोन शक्तिस्थळे आहेत. खरे तर डबल इंजिनचे सरकार महाराष्ट्रात तिप्पटशक्तीने काम करू शकते. वर्तमान असे आश्वासक असताना, महाराष्ट्राने या संधीचा लाभ घेण्याचे वातावरण सर्वत्र पसरण्यासाठी प्रत्येकानेच आपला हातभार लावणे आवश्यक आहे.
गेले काही दिवस सातत्याने विविध परिषदांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही युरोपातल्या काही राष्ट्रांनाही मागे टाकणारी आहे, असे नमूद करत असतात. डेटा सेंटर, सेमीकंडक्टर्स अशा महत्त्वाच्या विषयांमध्ये महाराष्ट्राला रस आहे. आरक्षणाचे प्रश्न असोत की, आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या, प्रश्न मार्गी लावण्याची इच्छा दिसते. अनुकूल वातावरण असताना एखादा प्रदेश मागे पडला तर त्याचे मोठे परिणाम आगामी वाटचालीवर होतात. व्हिएतनाम, सिंगापूर, तैवान अशा देशांमध्ये गुंतवणूकदार आसरा शोधतात. ही गुंतवणूक महाराष्ट्रात यावी यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास वसाहती ही खरे तर भारताला आपल्या राज्याकडून मिळालेली देण. महाराष्ट्रात पहिल्यांदा ही कल्पना प्रत्यक्षात आली आणि त्या धर्तीवर राज्याराज्यांत विकास वसाहतीत कामे सुरू झाली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ज्या उद्योग खात्याच्या कार्यकक्षेत तेथेही उदय सामंत यांच्यासारखे तरुण आणि उत्तमरीतीने निर्णय घेणारे मंत्री आहेत. हा वेग कुठेही मंदावू नये. महसूल खात्यातील विक्रमी निर्णयांची नोंद घेतली जाते आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाच्या वेगाने बडे नेतेही थक्क होतात. या विकासयात्रेला संवेदनशीलतेची जोड दिली तर महाराष्ट्राचे प्रचंड बरे होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात खरे तर नव्या-जुन्यांचा मोठा संगम आहे. या संगमातून पुढची वाटचाल कशी करावी, याचा अदमास ‘पुढारी न्यूज’च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने घेतला जाईल.
गेल्या कित्येक वर्षांनंतर महाराष्ट्रात सत्ताधारी पक्ष मजबूत आहे. अशा बहुमताचा वापर करून प्रशासकीय बदल घडवायचे असतात. सामाजिक न्यायाची हमी द्यायची असते आणि विकासाला चालना देणारी गुंतवणूक राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरवण्याचे प्रयत्न करायचे असतात. हे प्रयत्न प्रत्यक्षात आणणे हेच राज्यकर्त्यांचे यश असते आणि राज्यकर्त्यांचे हे प्रयत्न कुठे कमी पडत आहेत का? ते घरंगळत चालले आहेत का? याकडे लक्ष ठेवणे हे विरोधकांचे काम असते. आज राज्याराज्यांमधील विकासाची स्पर्धा टोकदार होते आहे. महाराष्ट्रातले सत्ताधारी आणि विरोधक महाराष्ट्राला पुढे नेण्याचे भान ठेवून पावले उचलतील, अशी अपेक्षा बाळगणे अस्थानी ठरू नये.
वाढवण येथे नव्याने उभे राहणारे बंदर प्रचंड क्षमतेचे आहे. ‘जेएनपीटी’ला त्यानिमित्ताने मिळणारी जोड अजोड ठरेल. नागपूर परिसरात पसरणारे लॉजिस्टिक हबचे जाळे विदर्भाला प्रगत करेल. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या परिसरापर्यंत तेथील गरजा लक्षात घेत निर्माण होऊ घातलेली उद्योगव्यवस्था ही नव्या महाराष्ट्राचे बलस्थान ठरणार आहे. ही ताकद अधिक वाढवण्यासाठी कामगार कायद्यात होणारे बदलदेखील आता आवश्यक झाले आहेत. ते करताना सामान्य माणसावर अन्याय होऊ नये याची काळजी तर घ्यायला हवीच; परंतु विरोधासाठी राजकारण केवळ वित्तंडवादापर्यंत पोहोचते, त्यातून काहीही निर्माण होत नाही याची जाणीव ठेवली जावी.
‘पुढारी न्यूज’च्या माध्यमातून गेली तीन वर्षे महाराष्ट्राच्या वेगवान विकासाला बळ देण्याचा प्रयत्न सातत्याने होतो आहे. चुकतेय ते लक्षात आणून देत. हे प्रयत्न अर्थातच भगीरथ विकास करण्याचे आहेत. महाराष्ट्र अनेक आघाड्यांवर अग्रेसर आहे; परंतु दक्षिणेतील राज्यांनी सुरू केलेली स्पर्धा, गुजरातकडे खेचली जाणारी गुंतवणूक तसेच ओडिशासारख्या राज्यांमधील निसर्गसंपत्ती लक्षात घेता परकीय गुंतवणूकदारांनी तिकडे वळवलेल्या नजरा याचाही अदमास घेत योग्य ते करायला हवे आहे.
आज महाराष्ट्रात केवळ पक्षफोडीचे राजकारण होते, असे चित्र निर्माण झाले आहे. ते महाराष्ट्राच्या भल्याचे नाही. कोणतीही निवडणूक नसलेली पुढची तीन वर्षे महत्त्वाची आहेत. केंद्रात महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणे, राज्यातील वेगवान विकासाला संवेदनशील करणे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शहर-गावांत-महानगरांत खड्डेमुक्त रस्ते, घरोघरी पाणी तसेच उत्तम आयुष्याची हमी देण्याची गरज आहे. शहरीकरणाचा प्रचंड वेग असलेल्या आपल्या राज्यातील वाहतूक समस्या डोळ्यांत पाणी आणणारी आहे. ‘वॉक टू वर्क’सारख्या संकल्पना देशभरात राबवल्या जात असताना आपण कुठे आहोत? कुठल्याही प्रकारची हेळसांड होणे योग्य नाही. महाराष्ट्रात अनेक गोष्टी जमेच्या आहेत; पण आव्हानेदेखील मोठी झाली आहेत. ही आव्हाने केवळ राजकीय हेतूने समोर येत असतील तर सर्व राजकारण्यांनी एकत्र येऊन विचार करायला हवा. त्यासाठी सत्ताधारी पक्षाने पुढाकार घ्यायला हवा आणि विरोधकांनीही त्यांना सहकार्य द्यायला हवे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र या नव्या आव्हानांचा वेध घेण्यासाठी सुजलाम्-सुफलाम् ठरावा. आत्महत्या थांबव्यात. सौरऊर्जेचा, नदीजोड प्रकल्पाचा तसेच सामाजिक न्यायाला सर्वोच्च प्राधान्य देणारा महाराष्ट्र हा जनतेचा ध्यास आहे. तो प्रत्यक्षात येण्यासाठी समाजमाध्यमांनीही योग्य ती भूमिका निभवावी. टीकेचा अंकुश असावा; पण ही टीका निर्णयांना गती देणारी ठरावी. ‘पुढारी’ त्यासाठीचे व्यासपीठ आहे. ‘पुढारी’ वृत्तसमूहाचा गेल्या ९ दशकांचा प्रवास जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा आहे. त्याची उत्तरे मिळावीत यासाठी हे व्यासपीठ आहे. वर्तमानाच्या कोलाहलातून राज्याच्या विकासाचे नवनीत समोर आणण्याची भूमिका यापुढेही बजावली जाईल.