

दरभंगा राजघराण्यातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व आणि माणुसकीचा अखंड झरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराणी कामसुंदरी देवी यांचे दि. 12 जानेवारी रोजी निधन झाले. 96 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्यानंतर या राणीच्या जीवनकार्याची माहिती माध्यमांनी प्रसारित करताच त्या जगभरात पुन्हा चर्चेत आल्या. त्यांचे जीवन म्हणजे त्याग, भक्ती आणि समाजसेवेचा एक आदर्श वस्तुपाठ होता. दानशूरतेसाठी प्रसिद्ध असलेल्या या राणीचा जन्म दि. 22 ऑक्टोबर 1932 रोजी उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात एका प्रतिष्ठित राजघराण्यात झाला. महाराणी कामसुंदरी देवी यांचा विवाह 1945 मध्ये दरभंगा संस्थानचे तत्कालीन महाराज सर कामेश्वर सिंह यांच्याशी झाला. महाराजांचा हा तिसरा विवाह होता.
महाराज कामेश्वर सिंह यांच्या निधनानंतर 64 वर्षे त्यांनी अत्यंत धैर्याने आणि संयमाने दरभंगा राज्याची परंपरा आणि वारसा जतन करण्याची जबाबदारी सांभाळली. त्यांना अपत्य नव्हते; पण त्यांनी दरभंग्याच्या अवघ्या प्रजेवर अपत्यवत प्रेम केले. आपले अवघे जीवन त्यांनी प्रजेच्या हितासाठी अर्पण केले. त्यांच्या जीवनातील सर्वात अभिमानास्पद आणि ऐतिहासिक प्रसंग 1962 च्या भारत-चीन युद्धादरम्यानचा आहे. जेव्हा देशाला संरक्षणासाठी आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती, तेव्हा त्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देत तब्बल 600 किलो सोने (सुमारे 15 मण) भारत सरकारला दान केले होते. हे केवळ संपत्तीचे दान नव्हते, तर देशाच्या सार्वभौमत्वासाठी दिलेला तो एक मोठा आधार होता.
यासोबतच दरभंगा राजघराण्याने हवाई दलाच्या मदतीसाठी आपली तीन खासगी विमानेदेखील सरकारला सोपवली होती. इतकेच नव्हे, तर आज जे ‘दरभंगा विमानतळ’ म्हणून ओळखले जाते, त्या विमानतळासाठीची सुमारे 90 एकर जमीन आणि धावपट्टीदेखील याच राजघराण्याने देशाला दान दिली. या दानामुळेच त्या काळात भारतीय हवाई दलाला सामरिकदृष्ट्या मोठी मदत मिळाली होती. त्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य देखील तितकेच अफाट होते. त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांना उदार हस्ते देणग्या दिल्या आणि गरिबांच्या शिक्षणासाठी कायम मदतीचा हात पुढे केला. कामेश्वर सिंह दरभंगा संस्कृत विद्यापीठ आणि ललित नारायण मिथिला विद्यापीठ यांसारख्या संस्थांच्या उभारणीत आणि विकासात त्यांनी भूमिका मोलाची बजावली. संस्कृत भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले, अनेक मंदिरे, धर्मशाळा आणि रुग्णालयांच्या उभारणीसाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आणि जमीन दान केली.
महाराणी कामसुंदरी देवी यांनी केवळ भौतिक विकासच केला नाही, तर त्यांनी सामाजिक एकता आणि स्त्रियांच्या उत्थानासाठीही कार्य केले. स्त्रियांनी शिक्षित होऊन स्वावलंबी बनावे, अशी त्यांची कायम धारणा होती. त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे त्यांना समाजात अत्यंत आदराचे स्थान प्राप्त झाले होते. त्यांच्या निधनाने मिथिलांचल आणि संपूर्ण बिहारमधील एका दानशूर पर्वाचा अंत झाला. त्यांची देशाप्रती असलेली निष्ठा प्रेरणादायी आहे. एका महाराणीने देशासाठी आणि प्रजेसाठी दिलेले हे योगदान इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे, असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही.