

मुरलीधर कुलकर्णी
महाराणा प्रताप सत्ता आणि साम्राज्याच्या मोहाला न जुमानता स्वातंत्र्य व स्वाभिमानासाठी अखेरपर्यंत लढले. मूल्यांना श्रेष्ठ मानणार्या या महान योद्ध्याचे जीवन प्रेरणादायी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा दीप त्यांनी उजळत ठेवला.
महाराणा प्रताप यांची आज पुण्यतिथी. सत्ता, साम्राज्य आणि वैभव यापेक्षा स्वातंत्र्य आणि स्वाभिमान श्रेष्ठ असतात, हे आपल्या संपूर्ण जीवनातून सिद्ध करणारे महाराणा प्रताप हे इतिहासातील विरळ योद्ध्यांपैकी एक होते. प्रतिकूल परिस्थितीतही तत्त्वांशी तडजोड न करता जगण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी कुंभलगड येथे सिसोदिया वंशातल्या राजघराण्यात झाला. मेवाडचे महाराणा उदयसिंह द्वितीय हे त्यांचे वडील तर महाराणी जयवंताबाई या त्यांच्या मातोश्री. राजपूत परंपरेतील शौर्य, निष्ठा, पराक्रम आणि आत्मसन्मानाचे संस्कार त्यांच्यावर बालपणापासूनच झाले. शस्त्रविद्या, घोडेस्वारी आणि युद्धकौशल्य यांचे कठोर प्रशिक्षण त्यांनी लहानपणीच घेतले. 1572 मध्ये मेवाडच्या गादीवर आरूढ झाल्यानंतर त्यांच्या समोर मुघल सम्राट अकबराचे मोठे आव्हान उभे राहिले.
त्या काळात अनेक राजांनी राजकीय सुरक्षितता, सन्मान आणि सत्तेसाठी मुघल अधीनता स्वीकारली होती. अकबराच्या दरबारात महाराणा प्रताप यांनाही सन्मानपूर्वक आमंत्रण देण्यात आले; मात्र त्यासाठी स्वातंत्र्याचा त्याग अपेक्षित होता. महाराणा प्रताप यांनी हा व्यवहार ठामपणे नाकारला. स्वाभिमानाशी तडजोड न करण्याचा हा निर्णय त्यांच्या आयुष्याला संघर्षाचे वळण देणारा ठरला. याच संघर्षातून 1576 साली हल्दीघाटीचे ऐतिहासिक युद्ध घडले. संख्येने आणि साधनसामग्रीने कमी असूनही महाराणा प्रताप यांनी अपूर्व शौर्याने मुघल सैन्याला तोंड दिले. युद्धात त्यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने विलक्षण पराक्रम केला. चेतक या त्यांच्या निष्ठावान घोड्याने दाखवलेली शूरता आजही इतिहासात अजरामर मानली जाते. जखमी अवस्थेतही चेतकने आपल्या स्वामीचे प्राण वाचवले, ही घटना निष्ठा आणि बलिदानाचे प्रतीक ठरली. या युद्धानंतर महाराणा प्रताप यांना जंगलात आश्रय घ्यावा लागला. वनवासात हालअपेष्टा, उपासमार आणि सततचा संघर्ष त्यांच्या वाट्याला आला. कधी कोंड्याची भाकरी तर कधी उपास अशा स्थितीतही त्यांनी मुघल सत्तेची अधीनता स्वीकारली नाही. संपूर्ण राज्यासह स्वतःचे कुटुंब अडचणीत असतानाही स्वातंत्र्याचा विचार त्यांनी सोडला नाही.
कोणतीही चूक नसताना नशिबी आलेल्या या वनवासातही महाराणा प्रताप कधी खचले नाहीत. मुघल सत्तेशी संघर्ष सुरूच ठेवत पुढील काळात त्यांनी अनेक लढाया केल्या. हळूहळू मेवाडमधील अनेक किल्ले त्यांनी पुन्हा जिंकले. चावंड येथे राजधानी स्थापन करून त्यांनी आपले राज्य पुन्हा उभे केले. हा केवळ राजकीय नव्हे, तर मानसिक विजयही होता. आयुष्याच्या अखेरच्या काळात, जंगलात शिकार करत असताना धनुष्याची प्रत्यंचा तुटून झालेल्या अपघातात त्यांच्या कानाजवळ डोक्याला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीनंतर अनेक उपाय करण्यात आले; मात्र सततच्या संघर्षामुळे आधीच खालावलेली प्रकृती अधिक बिघडत गेली. अखेर 19 जानेवारी 1597 रोजी तत्कालीन मेवाडची राजधानी चावंड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महाराणा प्रताप यांचे जीवन आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहे. सत्ता मिळवण्यासाठी मूल्यांशी तडजोड करणे, हे यशाचे लक्षण नाही; तर स्वाभिमान जपणे हेच खरे यश आहे, असा स्पष्ट संदेश त्यांच्या जीवनसंघर्षातून मिळतो. राष्ट्रप्रेम, आत्मसन्मान आणि निष्ठा या मूल्यांची आजही समाजाला तितकीच गरज आहे. महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी म्हणजे इतिहासातील एका योद्ध्याची आठवण नव्हे; तर स्वातंत्र्याशी तडजोड न करण्याच्या ध्येयाला नमन करण्याचा दिवस आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!