

देशातील कुणाही राज्याचे मुख्यमंत्री दररोज शांततेने झोपत असतील अशी शक्यता अजिबात वाटत नाही. तुम्हास वाटेल की, कामाचा व्याप आणि दैनंदिन कार्यक्रम करण्यामध्ये झोपायला पण वेळ मिळत नसेल, असे आमचे म्हणणे आहे. अजिबात तसे काही नाही.
आज कोणत्या मंत्र्याचा काय गैरव्यवहार बाहेर निघेल किंवा कोणता मंत्री काय चमत्कारिक विधान किंवा कृती करेल, यामुळे मुख्यमंत्री महोदयांना झोप येत नसावी. सरकार चालवायचे म्हणजे मंत्री नेमावेच लागतात आणि ते नेमके काही ना काही तरी घोटाळा करत असतात. प्रत्येक मंत्र्यावर दररोज शेकडो कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप होत असतात. अशी सगळी कसरत करत मुख्यमंत्र्यांना आपले सरकार चालवावे लागते.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा आज सर्वत्र बोलबाला आहे आणि ते वेगवेगळ्या क्षेत्राबरोबरच राजकारणातही सक्रिय होताना पाहायला मिळत आहे. युरोपमधील छोटासा देश असलेल्या अल्बानियाने असाच एक धक्का जगाला दिलेला आहे. तेथील पंतप्रधानांनी आपल्या मंत्रिमंडळात अशा एका मंत्र्याचा समावेश केला आहे की, जो माणूस नाही तर पूर्णपणे डिजिटल आहे. या एआय आधारित स्त्री रूपातील मंत्र्याचे नाव डीयाला असे आहे. याचा अल्बेनियन भाषेत सूर्य असा उल्लेख होतो. डीयाला सरकारी ऑनलाईन पोर्टलवर नागरिकांना मदत करत असते.
सरकारी सेवांची प्रक्रिया सोपी करण्यासाठी ती मार्गदर्शन करते. लोक व्हाईस कमांड देऊन कागदपत्रे, अर्ज आणि इतर सरकारी कामांसाठी डीयालाची मदत घेत असतात. पंतप्रधान महोदयांनी घोषित केले की, सार्वजनिक खरेदी म्हणजेच सरकारी निविदा आणि कंत्राटे वाटप हाताळणार्या खात्याचे मंत्रिपदच डीयालाला देण्यात आले आहे. याचा मुख्य उद्देश भ्रष्टाचार संपवणे आणि कामांमध्ये पूर्णपणे पारदर्शकता आणणे हा आहे. सरकारी निविदा म्हटले की, भ्रष्टाचार ठरलेलाच असतो. आपल्याकडील निविदा निवड प्रक्रिया सुरू असताना अनेक कंत्राटदार चक्क रिव्हॉल्व्हर घेऊन तिथे आलेले असतात. याचा अर्थ सरकारी कंत्राट आपल्यालाच मिळावे यासाठी दुसर्यांचा जीव घेण्याची पण तयारी असते. अल्बानियामध्येही असेच झाले होते.
सरकारमधील कंत्राट वाटपाचा मंत्रीच प्रत्यक्ष माणसाऐवजी एआय असेल तर किमान त्यात पारदर्शकता राहील हा पंतप्रधानांचा उद्देश आहे. कोणत्या कंपनीला कंत्राट द्यायचे याचा निर्णय डीयाला घेईल आणि हा निर्णय पूर्णपणे योग्यतेने उपलब्ध माहितीच्या आधारावर असेल. कोणत्याही राजकीय दबावावर नाही. डीयाला ही मंत्रिमंडळातील अशी पहिली सदस्य आहे, जी प्रत्यक्ष नाही, परंतु सर्वत्र आहे. स्क्रीनवर डीयाला पूर्ण अल्बेनियन पोशाख घातलेली दिसते. भ्रष्टाचार संपवण्यासाठी हे पाऊल यशस्वी ठरले तर इतर देशही त्याचे अनुकरण करायला मागे-पुढे पाहणार नाहीत असे वाटते. आपल्या देशातील प्रत्येक राज्यात माणसांना मंत्रिपद देण्यापेक्षा संपूर्ण मंत्रिमंडळच डिजिटल स्वरूपाचे केले तर बरे राहील, असा विचार तुमच्याही मनात आलेला असणार यात काही शंका नाही.