

मुरलीधर कुलकर्णी
आफ्रिकेच्या आग्नेय किनार्यावरील बेट मादागास्कर सध्या प्रचंड राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेत सापडलेय. तीव्र वीजटंचाई व पाणीटंचाईसह प्रचंड महागाई आणि वाढत्या बेरोजगारीमुळे त्रस्त झालेल्या तेथील जनतेने, विशेषतः तरुणांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून सुरू केलेल्या आंदोलनाने आता उग्र रूप धारण केले असून या असंतोषामुळे राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांना सरकार विसर्जित करावे लागले. राजधानी अँटाननारिव्होसह अन्य शहरांत हे आंदोलन मोठ्या प्रमाणात पेटले असून सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात 22 हून अधिक लोकांचा बळी गेला; तर 100 हून अधिक लोक जखमी झाले. लोकांचा रोष मुख्यतः दैनंदिन जीवनातील गरजांवर आहे. बेरोजगारीमुळे सुमारे 75 टक्के लोक दारिद्य्ररेषेखाली जीवन जगत असल्याने त्यांनी वर्षानुवर्षांच्या त्यांच्या आर्थिक अडचणींसाठी थेट सरकारलाच जबाबदार धरले आहे.
या आंदोलनाचे वेगळेपण म्हणजे याचे नेतृत्व या देशातील तरुणांकडे आहे. केनिया आणि नेपाळमधील युवा चळवळींनी प्रेरित होऊन मादागास्करच्या तरुणांनी ‘आम्हाला सन्मानाने चांगले जीवन जगायचे आहे’, अशा घोषणा देत रस्त्यावर उतरून असंतोष व्यक्त केला. राष्ट्राध्यक्ष राजोएलिना हे प्रथम 2009 मध्ये सत्तापालट होऊन सत्तेत आले होते. 2023 मध्ये ते वादग्रस्त निवडणुकीतून पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले. मात्र या आंदोलनानंतर त्यांनी सरकार विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लोकांच्या दुःखाची कबुली देत काही मंत्र्यांनी काम नीट न केल्याबद्दल देशातील जनतेची माफीही मागितली. आता त्यांनी लवकरच नवीन पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ नेमण्याचे आश्वासन दिले असून तरुण आंदोलकांशी संवाद सुरू करण्याची तयारी दाखवलीय.
तरीही केवळ नवीन सरकार स्थापन करून समस्या सुटणार नाहीत. राजकीय स्थिरता टिकवण्यासाठी पाणी, वीज आणि आर्थिक सुधारणा तातडीने हाती घेणे आवश्यक आहे, असे या तरुण आंदोलकांचे म्हणणे आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार विभागाने आंदोलकांविरुद्ध वापरल्या गेलेल्या ‘अनावश्यक बळा’चा तीव्र निषेध केला असून आंतरराष्ट्रीय समुदायही या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. कारण मादागास्करची अस्थिरता ही त्या देशातील विदेशी गुंतवणुकीवरही परिणाम करू शकते. त्यामुळे या आफ्रिकन राष्ट्रातील आंदोलन हे फक्त त्या एका देशाची समस्या नाही, तर संपूर्ण आशिया आणि आफ्रिकेत पसरत असलेल्या असंतुष्ट तरुण वर्गाच्या चळवळींचे द्योतक आहे. आफ्रिकन राष्ट्रातील तरुण आता मूलभूत समस्यांसाठी सत्ताधार्यांवर दबाव आणत असून हा बदल जगभरातील सामाजिक प्रवाहाला नवी दिशा देत आहे हे मात्र नक्की!