

युवराज इंगवले
लॉर्ड स्वराज पॉल हे भारतीय वंशाचे एक प्रमुख ब्रिटिश उद्योजक, परोपकारी आणि ब्रिटिश संसदेचे आजीवन सदस्य होते. ते कॅपारो ग्रुपचे संस्थापक होते, जी ब्रिटनमधील सर्वात मोठ्या पोलाद कंपन्यांपैकी एक आहे. त्यांनी भारत आणि ब्रिटनमध्ये उद्योग, शिक्षण आणि सार्वजनिक जीवनात प्रमुख पदे भूषवली. उद्योजकीय वृत्ती आणि परोपकारी कार्यासाठी प्रसिद्ध असलेले लॉर्ड पॉल यांनी नुकतेच वयाच्या 94 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. स्वराज पॉल यांचा जन्म 1931 मध्ये जालंधर, (पंजाब) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जालंदर येथील लब्बू राम दोआबा स्कूलमध्ये, तर पदवीचे शिक्षण दोआबा कॉलेज, जालंधर आणि फॉरमन ख्रिश्चन कॉलेज (लाहोर).
पंजाब विद्यापीठातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली. त्यांनी अमेरिकेच्या मॅसॅच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे उच्च शिक्षण घेतले आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग व मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
स्वराज पॉल यांनी 1968 मध्ये ब्रिटनमध्ये कॅपारो ग्रुपची स्थापना केली. पोलाद व्यापारापासून सुरुवात करून, त्यांनी या व्यवसायाला एका वैविध्यपूर्ण समूहात रूपांतरित केले, जो ब्रिटनमधील सर्वात मोठ्या खासगी मालकीच्या व्यवसायांपैकी एक बनला. पोलाद, ऑटोमोटिव्ह पार्टस् डिझाईन, इंजिनिअरिंग, ऊर्जा, लॉजिस्टिक्स, वित्तीय सेवा, हॉस्पिटॅलिटी आणि प्रायव्हेट इक्विटी यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये या समूहाचा विस्तार झाला. कॅपारोची ब्रिटन, भारत, अमेरिका, कॅनडा आणि यूएईमध्ये 40 हून अधिक ठिकाणी कार्यालये आहेत आणि जगभरातील मोक्याच्या ठिकाणी 8,500 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
कॅपारो मारुती लिमिटेड (सीएमएल) हा भारतातील मारुती सुझुकीसोबतचा संयुक्त उपक्रम आहे. याची स्थापना 1994 मध्ये झाली. हा उपक्रम ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी शीट मेटल आणि वेल्ड असेंब्ली पुरवतो. कॅपारो इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेडची (सीईआयएल) अन्य भारतीय वाहन उत्पादकांना सेवा देण्यासाठी 2000 मध्ये स्थापना केली. 1980 च्या दशकात एस्कॉर्ट्स आणि श्रीराम इंडस्ट्रीजसारख्या प्रमुख भारतीय कंपन्या ताब्यात घेण्याच्या पॉल यांच्या प्रयत्नांमुळे भारतात मोठे व्यावसायिक आणि राजकीय बदल झाले, विशेषतः बॉम्बे क्लबची स्थापना झाली. विविध कंपन्यांच्या संचालक मंडळांवर त्यांनी काम केले.
भारत-ब्रिटिश संबंधांना प्रोत्साहन दिले आणि इंडो-ब्रिटिश असोसिएशनसारख्या संस्थांचे नेतृत्व केले. पॉल यांच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली आणि त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि पदे प्रदान करण्यात आली. पॉल हे एक उत्साही परोपकारी होते आणि त्यांनी बाल आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या कार्यासाठी योगदान दिले. त्यांचे जीवनकार्य भारत आणि ब्रिटनमधील उद्योग आणि सेवाभावी क्षेत्रांतील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहिले.