

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे. निवडणुकांचा कार्यक्रम विशिष्ट कालावधीमध्ये घेतला जातो. सध्या अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या काळात वर्तमानपत्रांमध्ये येणार्या बातम्या काळजीपूर्वक पाहिल्या, तर तुमचे भरपूर मनोरंजन होईल. नगरपरिषदेचे उदाहरण घेऊयात. प्रत्येक गावामध्ये पन्नासेक लोक असे असतात जे प्रत्येक निवडणुकीमध्ये अर्ज दाखल करत असतात आणि अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी अर्ज परत घेत असतात. तुमच्या मनात प्रश्न येईल की, हा सगळा उपद्व्याप कशासाठी केला जातो? सोपे आहे. अर्ज दाखल केल्याच्या बातम्या येतात तसेच अर्ज वापस घेतल्याच्या बातम्यापण येत असतात आणि तेवढेच चर्चेत राहता येते. राजकारणामध्ये टिकून राहण्यासाठी चर्चेत राहणे महत्त्वाचे असते. यासाठी आली निवडणूक की, भर अर्ज आणि लगेच घे वापस, हा प्रकार सदैव सुरू असतो.
प्रत्येक वार्डामध्ये निवडून येण्याची शक्यता असलेले किमान तीन-चार उमेदवार असतात. या उमेदवारांनी गेली पाच वर्षे निवडणुकीची तयारी केलेली असते. आपल्या जातीच्या लोकांची विशेष काळजी घेतलेली असते. अशावेळी आपल्या जातीच्या एखाद्या फुटकळ उमेदवाराने अर्ज केला, तर आघाडीवर असणारा उमेदवार त्याच्याकडे जाऊन अर्ज परत घेण्याची विनंती करतो. त्याच्यावर दबाव आणला जातो. याचे कारण म्हणजे, या उमेदवाराने अगदीच जेमतेम पंधरा-वीस मते मिळवली, तरी कोणाचातरी पराभव होऊ शकतो. हे टाळण्यासाठी असे अर्ज दाखल करणार्या लोकांना बरेचदा बक्षिसाची लालूच दाखवली जाते. हे बक्षीस थेट कॅशमध्ये असते. या रकमा दहा हजारापासून लाखांपर्यंत असतात. हे अर्ज दाखल करणार्याची पण तेवढीच अपेक्षा असते. तो लगेच अर्ज वापस घेतो आणि आघाडीवरील उमेदवाराच्या प्रचाराला लागतो.
मंडळी, राजकारण हे तुमच्या- आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या आकलनाच्या पलीकडचे असते. हा विशिष्ट लोकांचा खेळ असतो आणि इथे आपण मतदार राजे असलो, तरी निव्वळ प्रेक्षक असतो. प्रत्येक गावात, प्रत्येक वार्डात असे खेळ सुरू असतात. तुम्ही घराबाहेर पडल्याबरोबर हात जोडून वारंवार नमस्कार करणारा आणि तुमची विचारपूस करणारा कोणी व्यक्ती भेटला, तर निश्चित समजून चला की, तो येणार्या निवडणुकीसाठी उमेदवार आहे. वीस-पंचवीस दिवस वाकून नमस्कार करणारा उमेदवार एकदा का नगरसेवक झाला की, पुन्हा तुम्हाला ओळखपण दाखवत नाही. हे पण आपल्याला नित्याचे झाले आहे. नगरपरिषदांना इंग्रजीत ‘म्युनिसिपालटी’ असे म्हणतात. तसे पाहायला गेले, तर आपण मतदारांचे आयुष्य म्हणजे एक प्रकारची म्युनिसिपालटी झालेलेच आहे.