

स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे धूमशान सुरू झाले आहे. आता नगरपरिषद, नंतर महापालिका, जिल्हा परिषदा अशा निवडणुका होणार आहेत. म्हणजे आगामी तीन एक महिने ही रणधुमाळी सुरू राहणार आहे. आता निवडणुका म्हणजे सरकारी यंत्रणांवर खूप ताण असतो. लोकशाहीतील ही महत्त्वाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रचंड खर्चही होत असतो. शेकडो कर्मचारी, अनेक मतदान केंद्रे, मतदार याद्या, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीची लगबग त्यानंतर अवघ्या काही दिवसांत येणारी मतमोजणी हे सर्व शासन यंत्रणेवर ताण निर्माण करणारे असते, यात शंका नाही; पण काही पक्ष यंत्रणेवरील हा ताण कमी करण्यासाठी कार्य करतात. आश्चर्य वाटेल; पण हे खरेच आहे.
उदाहरणार्थ, सोलापूर जिल्ह्यातील एका नगरपंचायतीमध्ये एकूण 17 नगरसेवक निवडून येणार होते. एरव्ही कोणत्याही निवडणुकीसाठी 17 जागांसाठी किमान 100 उमेदवारांचे अर्ज आले असते. निवडणुकीची धामधूम, बॅनरवर होणारा खर्च, प्रचार आणि एकंदरीतच शासकीय यंत्रणेवरील ताण असा सगळा तामझाम झाला असता; पण तो ताण कमी करण्यासाठी (?) एका स्थानिक नेत्याने हे सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून आणले.
खरे तर राज्य सरकारने तसेच नोकरशाहीने अशा नेत्यांप्रति कृतज्ञच असले पाहिजे. बिनविरोध नगरसेवक निवडून आणणे ही काही खाण्याची गोष्ट नव्हे, हे निश्चित! आपल्याच सतरा लोकांचे अर्ज दाखल करणे आणि अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत डोळ्यात तेल घालून दुसर्या कोणाचे अर्ज येत असतील, तर त्यांचे मन परिवर्तन करणे, हे या नगरपंचायतीतील नेत्यांनी करून दाखवले आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. येथील सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून आले असले, तरी नगराध्यक्षपदासाठी मात्र निवडणूक होत आहे. त्यासाठी जो काय खर्च लागेल तो लागेल; परंतु तो संपूर्ण निवडणुकीपेक्षा कमीच लागेल असे दिसते.
काही ठिकाणी मात्र आपला पक्ष नगरपालिकेत निवडून आला, तर पुढील उपक्रम राबविणे सोपे जावे, यासाठी अनेक फंडे वापरले जात आहेत. उदाहरणार्थ, राज्यातील एका नगरपालिकेत एकाच कुटुंबातील सहा लोकांना पक्षाने तिकीट दिले आहे. असे समजा की, हे सहा जण निवडून आले, तर प्रत्यक्ष नगरपरिषद चालविताना यांना आमसभा घेण्यासाठी कुठल्या सभागृहात जाण्याची गरज नाही. हे सहा घरीच एकत्र आले की, झाला कोरम पूर्ण आणि सभा संपन्न! एकंदरीत असेही प्रकार राज्यात होत आहेत. अजुन निवडणुका व्हायच्या आहेत. त्यामुळे अजून काही नवीनच प्रकारही समोर येतील. जे जे दिसेल ते पाहत राहावे, एव्हढेच आपल्या हाती आहे.