

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये याच वर्षात होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका होत. साधारणत:, दिवाळीनंतर आचारसंहिता लागेल आणि टप्प्याटप्प्याने या निवडणुका होतील, अशी सूत्रांनी दिलेली माहिती आहे. हे सूत्र कोण असतात आणि कुठे असतात, याविषयी कोणालाही माहिती नसते. या सूत्रांना कुणी पाहिलेले नसते; पण ते असतात हे निश्चित. तर सांगायचा मुद्दा असा की, लवकरच राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. आपल्या पक्षाची प्रत्येक जिल्ह्यातील तयारी पाहण्यासाठी आणि संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी नेते मंडळींचे राज्यभर दौरे सुरू आहेत. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या दौर्यांना भरघोस प्रतिसाद असतो, त्यामानाने विरोधी पक्षांच्या नेत्यांना कमी प्रतिसाद असतो.
राज्य पातळीवरील नेते आपल्या जिल्ह्यात येणार म्हटल्यानंतर सर्वात प्रथम बॅनर लावण्याची स्पर्धा सुरू होते. भरधाव वेगाने येणार्या नेत्याला गाडीमध्ये बसून बॅनर पाहायला मिळेल की नाही, याची शंकाच वाटते; परंतु आवर्जून बॅनर लावले जातात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक नेत्याची काही खास माणसे असतात. ही खास माणसे आपल्या नेत्याचा चेहरा आणि आपणही मोठ्या आकारात दिसावे, असे बॅनर लावतात. राज्य पातळीवरील नेत्यांना राज्यभरात पक्ष चालवायचा असतो, त्यामुळे त्यांनाही अशा कार्यकर्त्यांना सांभाळायला लागते. सर्वप्रकारच्या पक्षाच्या नेत्यांना साहेब म्हटले जाते.
साहेब आल्यानंतर साहेबांशी आपली किती जवळीक आहे हे दाखवण्यासाठी व्यासपीठावर साहेबांच्या पाठीमागून जाऊन कानात काहीतरी कुजबूज करणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा वेळेला एक फोटोग्राफर तयार ठेवला जातो आणि खास माणूस आणि साहेब एकमेकांशी हितगुज करतानाचे फोटो घेतले जातात. हेच फोटो पुढे एनलार्ज करून कार्यकर्त्यांच्या बैठकीत लावले जातात. तुम्ही एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याच्या घरी गेलात की दिवाणखान्यामधील फोटो पाहूनच तुम्हाला हा कार्यकर्ता कुणाचा माणूस आहे, हे समजत असते. अशी खास माणसे पक्षाने जागोजागी पेरलेली असतात. ही खास माणसे पक्ष चालवत असतात.
दुसरी तयारी म्हणजे, पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्याचे आगमन झाल्यानंतर त्यांना घालण्यासाठी भला मोठा हार आणला जातो. हा हार किमान पाच ते सहा किलो वजनाचा असतो आणि अर्थातच नेत्याची मान तो हार झेपण्याइतकी सक्षम नसते. वरिष्ठ पातळीवरील नेते कधीच एकटे येत नाहीत. त्यांच्यासोबत आणखी वरिष्ठ पातळीवरील दोन-तीन नेते येऊन स्वागत स्वीकारत असतात; मग अशा सर्व मोठ्या नेत्यांना एकत्रित करून त्यांना एकच भला मोठा हार घातला जातो. हार घालताना जी अहमहमिका चालते ती आपण साहेबांच्या जवळचे आहोत हे सिद्ध करण्यासाठी असते.