‘लिव्ह इन’चे फॅड..!

live-in-relationship-fad-trend-in-modern-society
‘लिव्ह इन’चे फॅड..!Pudhari File Photo
Published on
Updated on

आजकाल सर्वत्र पाहावे ते नवल वाटावे, अशी परिस्थिती आहे. तरुण मुले- मुली सहजासहजी लग्न करायला तयार होत नाहीत. शहरी भागांमध्ये मुलींचे लग्नाचे वय 28 ते 30 झाले असून, मुलांचे वय 32 ते 35 झाले आहे. अवघ्या पंधरा-वीस वर्षांपूर्वी मुलगा 23 वर्षे वयाचा झाला की, त्याचे लग्न होत असे आणि मुलींचे तर विचारूच नका. 18 ते 20 वय झाले की, मुली उजवून टाकल्या जात असत. आपले लग्न होणार आहे किंवा व्हावे, असे वाटणार्‍या तरुणांची संख्या कमी होत जाणे, ही सामाजिकद़ृष्ट्या गंभीर बाब आहे. मुलगी किंवा मुलगा लग्नाचा असेल, तर त्यांच्या आई-बापाला डोळ्याला डोळा लागत नाही. आधी लग्न ठरणे अवघड. ठरल्यानंतर ते पार पडणे त्यापेक्षा जास्त अवघड आणि लग्न पार पडल्यानंतर ते टिकणे त्याच्याहीपेक्षा अवघड, अशी काहीशी अनाकलनीय परिस्थिती समाजामध्ये निर्माण झाली आहे.

पाश्चिमात्य देशांमध्ये असलेले आणखी एक फॅड आपल्या देशात येऊ घातले आहे, ते म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहणे. लग्नाचे बंधन नको, म्हणून कुठल्याही बंधनाशिवाय वाटेल तितका काळ तरुण आणि तरुणी एकत्र राहतात आणि ज्या दिवशी नकोसे वाटेल, त्या दिवशी एकमेकांपासून दूर म्हणजेच ‘सेपरेट’ होतात.

पूर्वीच्या काळी एखाद्याचा किंवा एखादीचा प्रेमभंग झाला, तर ती व्यक्ती महिना-दोन महिने अत्यंत उदास आणि अस्ताव्यस्त राहत असे. आजकाल तरुण-तरुणी माझे दोन ब्रेकअप झालेत किंवा चार ब्रेकअप झालेत, असे सहजरीत्या आणि निर्विकारपणे सांगतात, हे समाजातील ज्येष्ठ पिढीला धक्कादायकच आहे. लग्न या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमाकडे गाजराची पुंगी, ‘वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाली,’ अशा पद्धतीने पाहण्याचा द़ृष्टिकोन झाला आहे.

आणखी एक नवीन संकल्पना देशामध्ये उदयास आली आहे, ती म्हणजे मुलेबाळे न होऊ देणे. जबाबदारी कुणालाच नको आहे. नवर्‍याला बायकोची नको आहे, तर बायकोला नवर्‍याची नको आहे आणि दोघांना मिळून मुलाबाळांची नको आहे. पुढे कसे होणार याचा विचार केला, तर तुमच्याही डोळ्याला डोळा लागणार नाही. पूर्वी घरामध्ये एकत्र कुटुंबात तरुण जोडप्याच्या डोक्यावर आशीर्वाद देणारे त्यांचे आई-वडील आणि त्यांच्या डोक्यावर आशीर्वाद देणारे त्यांचेही आई-वडील म्हणजे आजी-आजोबा घरात असत. नवीन जोडप्याचे लग्न झाले की, साधारण वर्षभरात ते ‘एकदा याला मुलगा किंवा मुलगी झाली की, आम्ही डोळे मिटायला मोकळे झालो,’असे म्हणत असत. आजकाल आजी-आजोबांचे डोळे पांढरे व्हायची वेळ येते; पण तरुण जोडपे मुले होऊ देत नाहीत. ‘डबल इन्कम, नो किडस्’ असेही नवीन फॅड आले आहे. जुन्या जाणत्या पिढीला हे सर्व धक्के पचण्यासारखे नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news