

भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या काळातसुद्धा कधी डगमगली नव्हती. आता तर काय जीएसटीचे नवीन पर्व आल्यापासून सर्वत्र बाजार गरम झाला आहे, असे दिसत आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात कार आणि मोटारसायकलची विक्री झाली आहे. दिवाळीचा किराणा भरण्यासाठी तत्सम मॉल्स व दुकाने ओसंडून वाहत आहेत. एकंदरीत काय आहे, तर मजा आहे बाबा तुमची. जीएसटी कमी झाल्यामुळे थोडीशी स्वस्ताई काय आली, खिशात आहे नाही ते पैसे घेऊन तुम्ही बाजारावर तुटून पडलात.
खरेदीसाठी गर्दी तशी आपल्याला नवीन नाही; परंतु सध्या चक्क ज्वेलर्सच्या दुकानांतसुद्धा रांगा लावून सोने आणि चांदी खरेदी केली जात आहे. याला काय म्हणावे हे समजत नाही. कधीकाळी या देशातून सोन्याचा धूर निघत होता, असे म्हणतात. बहुतेक येणार्या वीस-पंचवीस वर्षांत सोन्याचा आणि चांदीचा धूरच धूर निर्माण होईल की काय, असे दिसते आहे. शेअर मार्केट नेहमी खाली-वर होत असते. एखादा शेअर चढला किंवा एखादा शेअर एकदम गडगडला, तर गुंतवणूकदारांच्या काळजामध्ये कळ उमटत असते. हे टाळण्यासाठी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीकडे लोक वळत असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आम्ही सोने बाजारात थोडी चौकशी करता असे समजले की, चांदी ही सोन्यापेक्षा पुढील काळात जास्त भाव देऊन जाणार आहे. चांदी जास्त भाव देण्याच्या शक्यतेचे कारण असे सांगितले जाते की, औद्योगिक उपकरणांमध्ये विशेषतः सेमीकंडक्टरसारख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर ज्याचे आता उत्पन्न केले जाणार आहे, तिथे चांदी भरपूर लागते.
चांदी प्रतिकिलो 1 लाख 15 हजारांपासून वाढत चक्क आता दीड लाखाच्या पुढे जाऊन पोहोचली आहे. ज्याने चांदी खरेदी केली त्याची चांदी झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने एक लाख 25 हजार रुपये प्रतिकिलो या दराने समजा एक किलो चांदी घेतली आणि पुढील महिन्याभरात त्याच एक किलो चांदीची किंमत दीड लाख झाली, तर बसल्या जागेवर त्या व्यक्तीने 25,000 कमावले, असे म्हणता येईल. एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीकडे जेव्हा लोक पाहायला लागतात, तेव्हा ते दागिने घेण्यापेक्षा बिस्किटे, तुकडे, विटा, वेढण्या इत्यादी घेण्याकडे वळत असतात. दागिने केले की, त्याची घट निघते आणि शिवाय ते 24 कॅरेट नसते म्हणून शुद्ध चांदी किंवा सोने खरेदी केले जाते, जे तुम्हाला काळाच्या ओघात चांगला परतावा देऊ शकते.
थोडक्यात सांगायचे, तर सर्वत्र बाजार गरम आहे आणि दिवाळी अजून तब्बल 17 दिवसांवर आहे. जसजशी दिवाळी जवळ येते तसतसे घरगुती फराळाचे मार्केट, किराणा सामान, फटाके, रोषणाईच्या माळा, दिवे, शिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबरच वाहन खरेदी यात पुन्हा वाढ होणार आहे, हे निश्चित.