

डिजिटल शिक्षणाने ज्ञानाच्या नव्या वाटा खुल्या केल्या असल्या, तरी पुस्तक, हस्ताक्षर आणि प्रत्यक्ष शिक्षक-विद्यार्थी संवाद यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होऊ लागले आहे. तंत्रज्ञानाचा समतोल वापर आणि पारंपरिक शिक्षणमूल्यांचा संगम हाच भविष्यातील शिक्षणाचा खरा मार्ग ठरणार आहे.
एक काळ असा होता की, शिक्षणात संगणक, टॅबलेट, स्मार्ट फोन आणि डिजिटल फळे यांचाच बोलबाला होता. ‘पेपरलेस वर्गखोली’ ही आधुनिक शिक्षणाची ओळख बनली होती. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकाऐवजी पडदा दिसू लागला आणि हस्ताक्षराऐवजी की-बोर्डवर बोटे धावू लागली. तंत्रज्ञानामुळे शिक्षण अधिक आकर्षक, वेगवान आणि सुलभ होईल, अशी अपेक्षा जगभर व्यक्त झाली होती; मात्र गेल्या काही वर्षांतील अनुभव वेगळे चित्र दाखवू लागले आहेत. स्वीडन, फिनलंड, नॉर्वे, फ्रान्स, इटली आणि डेन्मार्क यांसारख्या अनेक युरोपीय देशांनी शिक्षणातील अतिरेकी डिजिटल वापराचा फेरविचार सुरू केला आहे.
काही ठिकाणी वर्गखोल्यांमध्ये पुन्हा छापील पुस्तके, वही, पेन्सिल आणि हस्ताक्षर यांना प्राधान्य दिले जात आहे. कारण, विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर डिजिटल माध्यमांचे काही अनपेक्षित दुष्परिणाम दिसून आले आहेत. अनेक अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की, कागदावर वाचताना विद्यार्थ्यांचे लक्ष अधिक काळ केंद्रित राहते. छापील पुस्तकातील मजकूर अधिक चांगल्या प्रकारे समजतो आणि दीर्घकाळ स्मरणात राहतो. याउलट पडद्यावर वाचन करताना विद्यार्थी अनेकदा वरवर वाचतात, पटकन पुढे जातात आणि विषयाचा सखोल विचार करण्याची प्रवृत्ती कमी होते. त्यामुळे आकलनशक्ती आणि चिकित्सक विचार क्षमता यांवर परिणाम होऊ शकतो. हस्ताक्षराचाही शिक्षणात महत्त्वाचा वाटा आहे. हाताने लिहिताना मेंदूतील अनेक भाग सक्रिय होतात. अक्षरे तयार करताना होणारी हालचाल, विचार आणि स्मरण यांचा परस्पर संबंध अधिक मजबूत होतो. म्हणूनच अनेक संशोधकांचे मत आहे की, हस्ताक्षरामुळे भाषा, स्मरणशक्ती आणि सर्जनशीलता विकसित होण्यास मदत होते. केवळ टंकलेखनावर अवलंबून राहिल्यास हा अनुभव विद्यार्थ्यांना मिळत नाही.
युरोपमधील काही देशांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडेही लक्ष वेधले आहे. सतत पडद्याकडे पाहणे, समाजमाध्यमांचा प्रभाव, सतत येणाऱ्या सूचना आणि माहितीचा प्रचंड मारा यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होते. अभ्यासातील एकाग्रता कमी होते, झोपेच्या समस्या वाढतात आणि ताणही जाणवू लागतो. याचा अर्थ तंत्रज्ञान चुकीचे आहे, असा अजिबात नाही. उलट कृत्रिम बुद्धिमत्ता, आभासी प्रयोगशाळा, संवादात्मक शिक्षण, दूरस्थ शिक्षण आणि वैयक्तिक शिकण्याची सुविधा या सर्व बाबींमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कोव्हिड काळात डिजिटल शिक्षणाने लाखो विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंड ठेवले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्यातही त्याचा मोठा वाटा आहे. प्रश्न तंत्रज्ञानाचा नसून त्याच्या अतिरेकाचा आहे. शिक्षणातील प्रत्येक समस्या डिजिटल साधनांनीच सुटेल, हा समज आता बदलत आहे. पुस्तकाचे स्थान पुस्तकच घेऊ शकते आणि शिक्षकाची भूमिका कोणतेही यंत्र पूर्णपणे निभावू शकत नाही. तंत्रज्ञान हे सहायक असावे, पर्याय नव्हे.
भारतातही या अनुभवातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. आपल्या देशात डिजिटल शिक्षणाचा विस्तार आवश्यक आहे. ग्रामीण भाग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान ही मोठी संधी आहे; परंतु त्याचवेळी वाचन संस्कृती, ग्रंथालये, हस्ताक्षर, निबंध लेखन, चर्चासत्रे आणि प्रत्यक्ष शिक्षक-विद्यार्थी संवाद यांनाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. आज अनेक विद्यार्थ्यांना मोठा लेख वाचण्याची सवय कमी होत आहे. काही मिनिटांचे व्हिडीओ, लहान संदेश आणि झटपट माहिती यामुळे सखोल वाचनाची क्षमता कमी होत असल्याची चिंता शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करतात. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात यशस्वी होण्यासाठी माहिती पाठ करणे पुरेसे ठरणार नाही, तर विचार करण्याची, विश्लेषण करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि कल्पनाशक्ती वापरण्याची क्षमता अधिक महत्त्वाची असेल. या क्षमता विकसित करण्यासाठी दर्जेदार पुस्तके आणि नियमित वाचन यांना पर्याय नाही.
बारा वर्षांपर्यंत एआयच्या वापरावर मर्यादा
जगभरात शिक्षणतज्ज्ञ आणि बालमानसशास्त्रज्ञ एका महत्त्वाच्या विषयावर भर देत आहेत. बारा वर्षांखालील मुलांच्या शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अत्यंत मर्यादित असावा, अशी भूमिका अनेक तज्ज्ञ मांडत आहेत. या वयात मुलांचा मेंदू वेगाने विकसित होत असतो. भाषा, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, समस्या सोडविण्याची क्षमता, सामाजिक संवाद आणि स्वतंत्र विचार करण्याची सवय या सर्वांचा पाया याच काळात घातला जातो. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कृत्रिम बुद्धिमत्ता लगेच देऊ लागली, तर मुलांची स्वतः विचार करण्याची, चुका करून शिकण्याची आणि कल्पनाशक्ती वापरण्याची प्रक्रिया कमी होऊ शकते. म्हणून या वयात गोष्टींची पुस्तके, चित्रकथा, हस्ताक्षर, गणिताची स्वतः उदाहरणे सोडविणे, प्रत्यक्ष प्रयोग, खेळ, शिक्षक व पालकांशी संवाद आणि मैदानी उपक्रम यांनाच प्राधान्य दिले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही शिकविणाऱ्या शिक्षकाची किंवा पालकांची जागा घेणारी नसून, योग्य वयानंतर जबाबदारीने वापरायचे एक सहायक साधन आहे. बारा वर्षांपर्यंत ‘स्क्रीनपेक्षा पुस्तक’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा मानवी मार्गदर्शन’ हेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक उपयुक्त ठरेल.
सुरक्षा आणि गोपनीयतेची वाढती आव्हाने
लहान वयात डिजिटल साधनांचा वाढता वापर हा केवळ आरोग्याचा किंवा शिक्षणाचा विषय नाही, तर तो सायबर सुरक्षा आणि गोपनीयतेचाही गंभीर प्रश्न आहे. अनेक मुले खेळ, व्हिडीओ, समाजमाध्यमे किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेवरील संवाद साधने वापरताना नकळत वैयक्तिक माहिती, छायाचित्रे, स्थानाची माहिती किंवा इतर संवेदनशील माहिती सामायिक करतात. यामुळे ओळखचोरी, सायबर फसवणूक, दिशाभूल करणारी माहिती, ऑनलाईन छळ, अयोग्य आशयाचा संपर्क आणि डिजिटल व्यसन यांसारखे धोके वाढू शकतात. शिवाय अनेक वेबसाईटस् आणि ॲप्स वापरकर्त्यांच्या वापराचा डेटा संकलित करून त्याचे विश्लेषण करतात. लहान मुलांना या धोक्यांची जाणीव नसल्याने ते अधिक असुरक्षित ठरतात. त्यामुळे बारा वर्षांखालील मुलांनी डिजिटल साधने वापरताना पालक किंवा शिक्षकांचे मार्गदर्शन, मर्यादित स्क्रीन वेळ, सुरक्षितता व्यवस्था, मजबूत पासवर्ड, आवश्यक तेवढीच माहिती देण्याची सवय आणि नियमित सायबर सुरक्षा शिक्षण यांना अत्यंत महत्त्व आहे. डिजिटल साक्षरतेबरोबरच सायबर सजगताही आजच्या शिक्षणाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे, कारण, सुरक्षित डिजिटल नागरिक घडविणे ही काळाची गरज आहे.
भविष्यातील आदर्श शिक्षणपद्धती ही ‘पुस्तक विरुद्ध तंत्रज्ञान’ अशी नसून ‘पुस्तक आणि तंत्रज्ञान’ अशी असेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दोन्हींचा समतोल वापर आवश्यक आहे. जिथे डिजिटल साधने शिक्षण अधिक प्रभावी बनवतील, तिथे त्यांचा अवश्य वापर करावा; पण जिथे पुस्तक, लेखन आणि प्रत्यक्ष संवाद अधिक परिणामकारक ठरतात, तिथे त्यांनाच प्राधान्य द्यावे. ज्ञान मिळविण्याची साधने बदलली असली, तरी शिकण्याचे मूलभूत तत्त्व बदललेले नाही. विचार, चिंतन, कल्पनाशक्ती आणि वाचन हीच खरी शिक्षणाची पायाभरणी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची ताकद आणि पारंपरिक शिक्षणाची खोली यांचा सुंदर संगम घडविणे, हीच आजच्या शिक्षणव्यवस्थेसमोरील सर्वात मोठी गरज आहे. अशा संतुलित दृष्टिकोनातूनच आपण डिजिटलदृष्ट्या सक्षम, विचारांनी समृद्ध आणि संस्कारांनी परिपूर्ण अशी नवी पिढी घडवू शकतो.