

मयुरेश वाटवे
एक साधे रील बनवण्यासाठी लोक एवढे वेडे का होतात? सोशल मीडियावर येणारे लाईक्स, कॉमेंटस् आणि त्यातून मिळणारे व्हॅलिडेशन आपल्या जीवापेक्षा मोठे झाले आहे का?
रील बनवणे आज जीवापेक्षा महत्त्वाचे काम झाले आहे. मोबाईल वापरल्याबद्दल दम दिला म्हणून कुणी आत्महत्या करते, तर कुणी गेम खेळू देत नाही म्हणून घर सोडून जाते. गेल्या आठवड्यात गोव्यातील बागा समुद्रकिनारी एक तरुण रील बनवण्यासाठी एका खडकावर चढून बसला. त्याला असे न करण्याबद्दल सूचना करूनही त्याने ऐकले नाही. एका अक्राळविक्राळ लाटेने त्याला पोटात घेतले आणि त्याचा मृतदेहच किनाऱ्यावर पाठवून दिला. ही केवळ सुट्टी घटना नाही. अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत.
गेल्यावर्षी रील बनवण्याच्या नादात एका महिलेने रिव्हर्समध्ये घातलेली गाडी थेट खाईत कोसळली होती. नवीन लग्न झालेले, हनिमूनसाठी गेलेले हे जोडपे. काही चांगल्या आठवणी त्यांना भविष्यासाठी निर्माण करायच्या होत्या. त्यांनी एकमेकांबरोबर वेळ घालवण्यापेक्षा त्यासाठी रीलचा पर्याय निवडला. पत्नीच्या हातात स्टेअरिंग देऊन पती रील बनवायला आला; पण हँडब्रेक न ओढल्याने गाडी मागे मागे थेट खाईत कोसळली. या निरूपद्रवी आणि निरर्थक खेळात एका जीवाचा बळी गेला. आपल्याला यातील गांभीर्य न समजण्याएवढे आपण कोडगे झालो आहोत का? पण, अशा घटनांपासून कुणीच धडा घेताना दिसत नाही. आपला विवेक संपत चाललेला आहे की काय, अशी शंका येते. आहे तो समोरचा क्षण एन्जॉय करायचे सोडून लोक त्याच्या आठवणी निर्माण करण्यात अधिक दंग झाले आहेत. फेसबुक किंवा इतर समाजमाध्यम व्यासपीठांवर आढळणारा कंटेंट पाहता लोकांना आपले वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर मांडण्याची अशिष्ट घाई झालेली दिसते. काय आणि कशाला, हे सर्व लोकांना आपल्याला दाखवायचे आहे? आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये कोण लोक, कोणत्या उद्देशाने असतात हे आपल्याला माहीत नसते. एकाने फोटोवर दाखवलेला थम्स अप त्याचे बँक खाते साफ करून गेला होता. चोराला त्याने सोशल मीडियावरून आयते फिंगर प्रिंट पुरवले. कुटुंबासमवेत चित्रपट एन्जॉय करतोय, असे सांगणाऱ्या एका कुटुंबाला परतल्यावर त्यांचे घर लुटले गेल्याचे समजले. या घटनांपासून आपण कोणताही बोध घेत नाही.
१५ सेकंदांची व्हिडीओ क्लिप आज आपल्या जीवावर भारी ठरत आहे. समुद्रकिनाऱ्यावरील सूर्यास्त, मुलाचे पहिले पाऊल, आजीच्या हातचा चहा… हे जगण्याऐवजी कॅमेऱ्यात कसे दिसेल, याचा विचार आपण आधी करतोय. ते एकदा सोशल मीडियावर टाकले की, आपल्याला भारी वाटते. मानसोपचारतज्ज्ञ याला ‘डिजिटल व्हॅलिडेशन ॲडिक्शन’ म्हणतात. लाईक्स, व्ह्यूज, कमेंटस्मधून डोपामिन मिळते आणि मेंदू त्याच्या मागे धावतो; पण त्याची किती जबर किंमत आपण मोजणार आहोत? नेमके काय आहे याच्या मुळाशी? तर ‘FOMO’ फीयर ऑफ मिसिंग आऊट. सगळे जग रील टाकते. मी नाही टाकले, तर मागे पडेन ही भीती. या स्पर्धेत मग काहीच खासगी राहत नाही.
साधे साधे रील बनवून त्याला लाईक्स, कमेंट येऊ लागले की, आपणच आपल्याला ‘पुश’ करू लागतो. अधिक कठीण रील करण्यासाठी. रील करताना तुम्ही वाहून गेलात, अपघातात मरण पावलात, रेल्वेत चेंगरून गेलात, तर दुसऱ्या दिवशी जगाला काही फरक पडणार आहे का? या कॅमेरा, रीलच्या व्यसनातून आपण लवकरात लवकर बाहेर पडले पाहिजे. आपल्या वेडापायी उद्या आपले कुटुंबीय, आपल्यावर अवलंबून असणारे लोक उघड्यावर पडतील याचा विचार केला पाहिजे. पूर्वी आठवणी लिहिण्यासाठी लोक डायरी वापरत. आज सगळे डिजिटल झाले आहे.
पण, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, एकवेळ इन्स्टाग्रामवर आपला प्रोफाईल डिलिट झाला तरी चालेल; पण आपण स्वत:च डिलिट होता कामा नये. प्रत्येक गोष्ट जगाला कळलीच पाहिजे, हा अट्टहास आपण सोडला पाहिजे. काही गोष्टी फक्त आपल्या स्वत:साठीच ठेवाव्यात. रील, रिस्क आणि धोक्याला आपण विवेकानेच उत्तर देऊ शकतो.