ज्ञानतपस्वी : गौतम बुद्ध

gautam-buddha
ज्ञानतपस्वी : गौतम बुद्धPudhari File Photo
Published on
Updated on
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

उभ्या भारतवर्षात ज्ञानक्रांती घडवून आणणारा ऋषितुल्य तपस्वी म्हणून भगवान गौतम बुद्धांचे जीवनकार्य अजरामर ठरले आहे. पौर्णिमेच्या दिवशी जन्म, महानिर्वाण आणि केवलज्ञान प्राप्ती हा अद्भुत योग या महामानवाच्या जीवनात घडून आला. भगवान बुद्धांनी दिव्य ज्ञानाने सबंध जगाला प्रकाशमान करून टाकले आणि भारतमातेचा हा सुपुत्र सामाजिक न्याय आणि समाजक्रांतीचा उद्गाता ठरला. जगाला आज विनाशाकडे नव्हे तर विकासाकडे घेऊन जायचे असेल तर ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ हा 21 व्या शतकाचा संदेश होय.

इ.स.पूर्व सहावे शतक हे प्रस्थापित व्यवस्थेला हादरे देणारे शतक होते. त्यामुळे या शतकाला प्रबोधन युग म्हटले जाते. वैदिक संस्कृतीने निर्माण केलेल्या सामाजिक असमतोल व विषमतेविरुद्ध बंड पुकारून सामाजिक न्यायाचा झेंडा महात्मा गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांनी या शतकात फडकविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत, भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये आपण फ्रेंच राज्य क्रांतीकडून घेतलेली नसून ती भगवान गौतम बुद्धाच्या जीवन चरित्रातून घेतली आहेत. यावरून महात्मा गौतम बुद्धाच्या क्रांतदर्शी विचारांचे पुरोगामित्व सिद्ध होते. बुद्धाचे विचार कार्ल मार्क्सपेक्षाही श्रेष्ठ होते. कारण मार्क्सने केवळ माणसाचा आर्थिक विचार केला तर बुद्धाने माणसाचा आध्यात्मिक व सांस्कृतिक विचार केला. आशा हे दु:खाचे मूळ कारण आहे. मानवी जीवन क्षणभंगूर असून मानवाने आपल्या आशा-आकांक्षा मर्यादित ठेवून ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ काम करावे, असा मोलाचा संदेश भगवान गौतम बुद्धाने उभ्या जगाला दिला.

बुद्धांचे सारे जीवन जन्मापासून महानिर्वाणापर्यंत एका ज्ञानयात्रेने संपन्न झाले. ही ज्ञानयात्रा सत्याचा शोध घेणारी होती. त्यांनी केवल ज्ञान प्राप्त केले आणि उभ्या जगाला सत्याचा प्रकाश दाखविला. तत्त्वज्ञाने जग कसे आहे हे केवळ सांगायचे नसते ते बदलून दाखवायचे असते, हा विचार महात्मा गौतम बुद्धांच्या बाबतीत तंतोतत खरा ठरतो.

महात्मा गौतम बुद्धांचे जीवन एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे तेज:पुंज होते. मागील 10 हजार वर्षांत ज्यांनी बुद्धिमत्ता वापरून मानवजातीच्या उत्थानासाठी महान कार्य केले, अशा जगातील श्रेष्ठ 100 विश्वमानवांची यादी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केली. त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जगातील पहिल्या 100 महान विश्वमानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी आहेत. आचार्य रजनीश बुद्धांबद्दल म्हणतात की, “बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही.”

केवल ज्ञान प्राप्त झाल्यानंतर महात्मा गौतम बुद्धांनी सारनाथ येथील मृगया वनात पहिले प्रवचन दिले. त्या ठिकाणी सम—ाट अशोकाने उभारलेला भव्य स्तंभ महात्मा गौतम बुद्धांच्या विचारांची तेजस्वी पताका आजही फडकत आहे. शाक्यमुनी हे गौतमाचेच दुसरे नाव हा बौद्ध धर्माचा मुख्य स्तंभ. त्यांची जीवनकहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मानल्या जाणार्‍या शिकवणुकी एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news