

सध्या महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे. व्हॉटस्अॅप नावाचे तंत्रज्ञान मोबाईलमध्ये आल्यापासून प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञांची संख्या राज्यात वाढली आहे. जंगलात कधीही पाय न टाकलेले लोकसुद्धा बिबट्यांचा वावर रोखण्यासाठी काय करता येईल, यावर मतप्रदर्शन करत आहेत. शासकीय स्तरावरही याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे.
नुकतेच एका आमदार महोदयांनी बिबट्यांपासून संरक्षण करण्यासाठी गावांभोवती भिंती बांधण्याचा सल्ला दिला. बिबट्यांची उंचावर उडी मारण्याची किंवा झेप घेण्याची क्षमता किती आहे, म्हणजे भिंत नेमकी किती उंचीची बांधावी, याविषयी त्यांनी काही भाष्य केले नाही. तुरळक स्वरूपातील वाड्या आणि तांडे यांच्याभोवती कशा भिंती बांधायच्या, हेही समजण्याचा मार्ग नाही. या संरक्षक भिंती बांधण्यासाठी किती खर्च येईल आणि तेवढा करण्याची शासनाची शक्ती आहे का, याचा काहीही विचार न करता थेट भिंती बांधण्याचा सल्ला देणे म्हणजे अजब प्रकार आहे.
बिबटे नागरी वस्तीत येऊ नयेत म्हणून जंगलामध्ये एक कोटी रुपयांच्या शेळ्या आणि मेंढ्या सोडण्याचा पण विचार झाला. काही भागात हा प्रयोग आधीच केला आहे. या शेळ्यांच्या कानामध्ये जिओ टॅग म्हणजे त्यांना क्रमांक देऊन सोडले आहे आणि गावातील लोकांनी या शेळ्या, मेंढ्यांचे रक्षण करण्याचे पण आवाहन केले आहे. कुणाच्याही मालकीच्या नसलेल्या या शेळ्या पकडून त्यांना आपले खाद्य म्हणून भक्षण करणार्या माणसांची काही कमी नाही.
बिबट्यांसाठी सोडलेल्या शेळ्यांवर माणसे ताव मारतील ही शक्यता निश्चितच आहे. बिबट्यांना रोखण्यासाठी शेळ्या- मेंढ्यांनी आपल्या जीवाचे बलिदान द्यावे, हा प्रकार म्हणजे ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ असाच आहे. ‘शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. मुळात हे बिबटे जंगलातील नसून उसाच्या क्षेत्रातील आहेत. या कारणामुळे शेळ्या आणि मेंढ्या नेमक्या कुठे सोडायच्या, हा एक मोठा प्रश्न आहे.
बिबट्यांची नसबंदी करणे हे अती कठीण काम असणार आहे. डार्ट नावाचे बेशुद्ध करणारे इंजेक्शन देऊन या बिबट्यांवर शस्त्रक्रिया करावी लागेल आणि त्यांची योग्य ती काळजी घेऊन त्यांना पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडावे लागेल. यासाठी किती दिवस लागतील, याचे काहीही अनुमान काढता येणार नाही. काहीतरी उपाय निघून हा प्रश्न लवकर सुटावा, अशी राज्यातील प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. तसा तो सुटतो का, हे पाहायचे!