Tamil Cinema Legend | भारतीराजा

Tamil Cinema Legend |
Tamil Cinema Legend | भारतीराजा
Published on
Updated on

मुरलीधर कुलकर्णी

दाक्षिणात्य सिनेसृष्टीला, विशेषतः तमिळ चित्रपटसृष्टीला स्टुडिओच्या बंद चौकटीतून बाहेर काढून ग्रामीण भागातील मातीशी आणि वास्तववादी जीवनाशी जोडणारे दिग्दर्शक व अभिनेते भारतीराजा यांचे नुकतेच वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एक प्रयोगशील व्यक्तिमत्त्व गमावले आहे. चित्रपट दिग्दर्शनात स्वतःचा एक वेगळा ‘ब्रँड’ निर्माण करणाऱ्या भारतीराजा यांनी अभिनयातही वेगळी ओळख निर्माण केली होती.

​भारतीराजा यांचा जन्म १७ जुलै १९४१ रोजी तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यातील अल्‍लिनगरम या एका छोट्याशा गावात झाला. त्यांचे मूळ नाव पेरियामायतेवर असे होते. त्यांचे कुटुंब एका सामान्य शेतकरी पार्श्वभूमीचे होते. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते. गावातील निसर्गरम्य वातावरण, तिथली संस्कृती आणि ग्रामीण जीवन त्यांनी जवळून अनुभवले होते, ज्याची गडद छाप पुढे त्यांच्या चित्रपटांवर उमटलेली पाहायला मिळाली.

​चित्रपटसृष्टीत येण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. लहानपणापासूनच त्यांना नाटक आणि साहित्याची प्रचंड आवड होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी आरोग्य विभागात इन्स्पेक्टर म्हणून नोकरी केली; पण त्यांचे मन तिथे रमले नाही. चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी त्यांनी ती नोकरी सोडली आणि चेन्‍नई गाठली. सुरुवातीला कन्‍नड चित्रपट दिग्दर्शक पुट्टण्णा कनागल यांच्याकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यानंतर १९७७ मध्ये दिग्दर्शक म्हणून ‘१६ वयाथिनिले’ या तमिळ चित्रपटाद्वारे पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तमिळ सिनेमाचा चेहरामोहरा बदलून टाकला. कमल हासन, रजनीकांत आणि श्रीदेवी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने व्यावसायिक आणि कलात्मक क्षेत्रात नवा इतिहास रचला.

​त्यानंतर भारतीराजा यांनी एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले. ‘किझाक्के पोगुम रेल’, ‘सिगप्पू रोजाक्कल’, ‘टिक टिक टिक’, ‘अलाईगल ओईवाथिल्लाई’, ‘मुधल मरियाथई’ आणि ‘करुथम्मा’ हे त्यांचे अत्यंत गाजलेले चित्रपट आहेत. त्यांच्या चित्रपटांमध्ये ग्रामीण संस्कृती, मानवी नातेसंबंध आणि सामाजिक विषयांचे उत्कृष्ट सादरीकरण असायचे. दिग्दर्शनासोबतच त्यांनी अभिनयातही आपली छाप पाडली. ‘आयुथा ईझुथू’, ‘थिरुचित्रम्बलम’ आणि अगदी अलीकडच्या ‘महाराजा’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.

​भारतीराजा यांच्या या अद्वितीय योगदानासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना तब्बल ६ वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या बहुमूल्य योगदानासाठी भारत सरकारने २०१० मध्ये त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. याव्यतिरिक्त तामिळनाडू सरकारचे अनेक राज्य पुरस्कार आणि प्रतिष्ठित ‘कलैमामणी’ पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले होते.

त्यांच्या पत्नीचे नाव चंद्रावती असून त्यांना मनोज आणि जननी ही दोन मुले आहेत. त्यांचा मुलगा मनोज भारतीराजा यानेही चित्रपटसृष्टीत अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. कौटुंबिक पाठबळ आणि कलेवरील अथांग प्रेम याच्या जोरावर त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवले. आज भारतीराजा आपल्यात नसले, तरी त्यांनी निर्माण केलेला सिनेमा आणि सिनेमॅटिक वारसा पिढ्यान्‌पिढ्या नवोदित दिग्दर्शकांना प्रेरणा देत राहील. एका साध्या गावातून येऊन भारतीय सिनेसृष्टीचा चेहरा बदलणारा हा अलौकिक प्रतिभेचा दिग्दर्शक नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहील यात शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news