Dolly Parton | डॉली पार्टन

Dolly Parton |
Dolly Parton | डॉली पार्टन
Published on
Updated on

मुरलीधर कुलकर्णी

जागतिक संगीतसृष्टीला आपल्या अद्वितीय आवाजाने व भावपूर्ण शब्दरचनेने समृद्ध करणाऱ्या अमेरिकन कंट्री संगीतातील प्रसिद्ध गायिका, गीतकार व अभिनेत्री डॉली पार्टन यांचे नुकतेच निधन झाले. डॉली यांचा जन्म १९ जानेवारी १९४६ रोजी अमेरिकेतील टेनेसी राज्यातील सेव्‍हियर काऊंटी या ग्रामीण भागात गरीब कुटुंबात झाला. आई-वडील आणि १२ मुलांच्या विस्तीर्ण कुटुंबात वाढलेल्या डॉली यांचे बालपण लहानशा लाकडी झोपडीत अत्यंत गरिबीत आणि संघर्षात गेले.

लहानपणी त्यांच्याकडे कपडे घेण्यास पैसे नसल्याने आईने जुन्या कपड्यांच्या चिंध्या एकत्र शिवून एक सुती कोट तयार करून दिला होता. त्यांनी पुढे जाऊन लिहिलेले ‘कोट ऑफ मेनी कलर्स’ हे अजरामर गाणे त्यांच्या याच बालपणीच्या संघर्षाची अमूल्य साक्ष बनले. अवघ्या दहाव्या वर्षापासून स्थानिक रेडिओ आणि टीव्ही कार्यक्रमांमधून गाण्यास सुरुवात करत त्यांनी संगीत प्रवासाचा पाया रचला आणि हायस्कूलचे शिक्षण पूर्ण होताच १९६४ मध्ये घर सोडून त्या नेशव्हिल या अमेरिकन संगीताच्या मुख्य केंद्रात पोहोचल्या.

एक स्त्री गायिका आणि गीतकार म्हणून मुख्य प्रवाहातील ‘कंट्री म्युझिक’ क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी त्यांना टोकाचा संघर्ष करावा लागला. पुरुषप्रधान संगीत व्यवसायात त्यांनी अद्वितीय शब्दरचनेच्या आणि आवाजाच्या जोरावर स्वतःची छाप पाडली. सात दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत तब्बल ३ हजारांहून अधिक गाणी स्वतः लिहिली. त्यापैकी शेकडो गाणी स्वतः गायिली. अनेक गाणी नामवंत कलाकारांकडून गाऊन घेतली. ‘जोलीन’ , ‘नाईन टू फाईव्ह’ आणि ‘आय विल ऑलवेज लव्ह यू’ या गीतांनी त्यांना जागतिक प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले. त्यांनी १०० दशलक्षाहून अधिक अल्बम्सच्या विक्रीचा अभूतपूर्व विक्रम केला. त्यांना संगीत क्षेत्रातील मानाचे ११ ग्रॅमी पुरस्कार मिळाले असून ५० हून अधिक वेळा ग्रॅमीचे नामांकन लाभले. याशिवाय, प्रतिष्ठित ‘कंट्री म्युझिक हॉल ऑफ फेम’ आणि ‘रॉक अँड रोल हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. त्यांना अमेरिकेचा सर्वोच्च सांस्कृतिक सन्मान ‘नॅशनल मेडल ऑफ आर्टस्‌’ मिळाला तसेच ‘हॉलीवूड वॉक ऑफ फेम’वर दोन स्टार्स मिळवणाऱ्या त्या मोजक्या कलाकारांपैकी एक ठरल्या.

डॉली पार्टन अत्यंत संवेदनशील, दानशूर आणि परोपकारी व्यक्तिमत्त्व होत्या. लहान मुलांमधील बालसाक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी १९९५ मध्ये त्यांनी ‘इमॅजिनेशन लायब्ररी’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत जगभरातील लहान मुलांना जन्मल्यापासून ते शाळेत जाईपर्यंत दरमहा एक पुस्तक मोफत दिले जाते, ज्याद्वारे आतापर्यंत कोट्यवधी पुस्तकांचे वाटप केले आहे. आरोग्य क्षेत्रातही त्यांचे योगदान ऐतिहासिक राहिले; कोरोना महामारीच्या काळात ‘मॉडर्ना’ लस संशोधनासाठी त्यांनी १ दशलक्ष डॉलर्सची दिलेली वैयक्तिक आर्थिक मदत संपूर्ण जगासाठी संजीवनी ठरली होती. जन्मभूमीच्या आर्थिक आणि पर्यटन विकासासाठी त्यांनी टेनेसीमध्ये ‘डॉलीवूड’ हे भव्य थीम पार्क उभारले, ज्यातून हजारो लोकांना रोजगार मिळाला. विनम्र स्वभाव, सदैव हसरा चेहरा आणि गाण्यांमधील आत्मीयता यामुळे त्या कोट्यवधी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनल्या. त्यांनी निर्माण केलेले अद्वितीय संगीत आणि सामाजिक कार्य यातून त्या अमर राहतील, यात कोणतीच शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news