

एका तळ्याकाठी मोठी बाग आणि पर्यटकांची ही गर्दी नदीपेक्षा ओसंडत होती. भेळ-पाणीपुरीच्या गाड्या, आईस्क्रीम, मेरी गो राऊंड, झुले, लाईटवरचे पाळणे, सगळं गर्दीला आकर्षून घेण्यासाठी मांडलेला खटाटोप. काहीजण लाईटच्या पाळण्याकडे फेरी मारून ‘पैसा कितना लगाये भय्या’ असं नुसतं विचारून ‘अरे इतना पैसा लेते हो एक राऊंड का? रहने दो’ म्हणत पुन्हा फुकटच्या बाकड्यावर बैठक टाकून तासन्तास भेळचा कोन संपवत, शेवटचा चुरमुरा तळाशी दिसतो का पाहत शेवटी कोन उलटा करून भेळ संपल्याची शहानिशा करत कागदाच्या पुरचुंडीची बोट करून ती पाण्यात जाईपर्यंतचे उपद्व्याप पाहायला मिळतात. लॅपटॉप उघडला जातो.
‘भय्या जरा एक भेळ देना.’
भय्याने भेळेचा कोन आणत, ‘ये लो. पचास रुपये हो गये’असं बिल फाडलं.
‘इतना?’
‘हा जी भय्या. महंगाई बढ गई क्या करे.’
हे वाक्य पूर्ण होईपर्यंत पन्नास त्याच्या खिशात टाकले. ‘ठीक है कोई बात नही.’
असो. एक ध्यानात आले सगळे विक्रेते, गर्दीतून पैसे उकळणारे अमराठी आणि हिंदी भाषिकच का? आपलं मराठी यांच्यासाठी गर्दी करतं का? एक माणूस माझ्याकडे येत, ‘ओ भय्या किधर जाना है क्या? आपका काम हो गया तो आवाज देना. मेरी रिक्षा उधर पान के ठेले के पास ही है.’
‘क्यूँ भाई, कस्टमर नहीं मिल रहे क्या?’ मिलते तो है लेकीन हिंदी भासा बोली तो अब मराठी मे बात करो ऐसा कहके उतर जाते है. और मंत्री लोग ने तो अगले माह से रिकसेवालोको मराठी थोडाबहुत सिखने के लिये मजबूर किया है.’
‘हां तो?’ मी मराठीत जागा होण्यापूर्वीच्या हिंदींतून खवळलो.
‘तो क्या, आप शायद हिंदी ही बोलते है ऐसन लगा. आप बोल रहे थे ना हिंदी मे. तो मुझे दिक्कत नही होगी.’
‘अरे ये. मी मराठीच आहे. ते तुमच्या लोकांमुळे सगळीकडे हिंदी आणि अमराठीचे केंदाळ साचलं मराठी माणसाभोवती. थांब तुला मराठी शिकवतो आणि मगच रिक्षात बसतो. चालेल?’
‘साब, ऐसा कैसे चलेगा? धंदे का टाईम है. किधर फस गये?’
‘चल. आता तर मी तुझ्या रिक्षातूनच घरी जाणार. चलो. सीखते है मराठी.’ असं हिंदीला राम राम करत, चांगल्या दोन चार बालकवींच्या कविता त्याच्या कानात फुंकल्या आणि मगच साधी सोपी मराठी भाषा त्याला समजली.