

अक्षय निर्मळे
स्टील किंग म्हणून ओळखले जाणारे भारतीय मुळाचे ब्रिटनस्थित उद्योगपती लक्ष्मी मित्तल हे ब्रिटन सोडून दुबई किंवा स्वित्झर्लंडमध्ये कायमस्वरूपी मुक्कामाला जाणार असल्याच्या बातम्यांनी उद्योगविश्वात खळबळ उडाली आहे. मित्तल हे केवळ स्टील उद्योगातील अग्रगण्य नाव नाही, तर ब्रिटनमधील धनाढ्य व प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांचे स्थलांतर केवळ वैयक्तिक घटना राहत नाही, तर ब्रिटनच्या बदलत्या आर्थिक-कर धोरणांवरची प्रतिक्रिया म्हणूनही त्याकडे पाहिले जात आहे.
75 वर्षांचे मित्तल अनेक दशकांपासून ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहेत.ब्रिटन सरकारने अलीकडेच पारंपरिक नॉन डॉम कर सवलत रद्द करण्याचे आणि वारसा कर तसेच संपत्तीवर आधारित करांबाबत कठोर करण्याचे पाऊल उचललेे. ज्यामुळे श्रीमंत-अतिश्रीमंत व्यक्तींवर कर भार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. याचा थेट परिणाम मित्तल यांच्या जागतिक मालमत्ता व संपत्ती वारसा नियोजनावर होऊ शकतो. ‘नॉन-डॉम’ म्हणजे नॉन डॉमिसाईल टॅक्स स्टेटस ही ब्रिटनमधील एक विशेष कर व्यवस्था होती, जी ब्रिटनचे मूळ नागरिक नसलेल्यांसाठी होती. यात एखाद्या व्यक्तीचे परदेशातील व्यवसाय, गुंतवणुकीतून येणारे उत्पन्न हे करमुक्त राहत असे.
तसेच वारसा करापासूनही (इनहेरिटन्स टॅक्स) मोठी सवलत मिळत असे. वारसा कर यूकेमध्ये 40 टक्के आहे. मित्तल यांचे साम्राज्य जगातील 60 देशांत पसरले आहे. त्यामुळे त्यांच्या सर्वच संपत्तीवर हा कर लागू शकतो. आंतरराष्ट्रीय उद्योगपती, मोठे गुंतवणूकदार, परदेशातून आलेले श्रीमंत क्रीडापटू, कलाकार या सवलतीचा लाभ घेत होते; पण सत्ताधारी मजूर पक्षाला वाटले की, या सवलतीमुळे श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात कर चुकवत आहेत. त्यामुळे 2024-25 मध्ये ही सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला. मित्तल यांच्या निर्णयामागे ही पार्श्वभूमी आहे.
ब्रिटनमध्ये आधीच वेल्थ एक्सॉडस् म्हणजे संपन्न वर्गाचे आर्थिक पलायन वाढत असल्याच्या चर्चा आहेत. मित्तल यांचे पाऊल त्याला बळकटी देऊ शकते. दुबईच्या चमकत्या क्षितिजाकडे निघालेली ‘लक्ष्मी’ ब्रिटनसाठी इशारा असू शकते आणि जगासाठी नव्या आर्थिक प्रवाहाची खूण!
आर्थिक धोरणातील स्थिरता आणि करव्यवस्थेत स्पष्टता नसली, तर कितीही समृद्ध देश असला, तरी ‘लक्ष्मी’ त्याच्या हातात राहत नाही. ज्या देशाने वर्षानुवर्षे जागतिक धनाढ्यांना आकर्षित केले, त्याच देशातून आता संपत्ती का वाहू लागली आहे? श्रीमंतांना देश आकर्षित करत नाहीत, तर धोरणे आकर्षित करतात, हे स्पष्ट आहे.