

एकंदरीतच समाजामध्ये शिस्त नावाचा प्रकार उरलेला नाही, असे दिसून येत आहे. आपण रस्त्याने सावकाशपणे जात असतो कुणाचे तरी ‘आरे-कारे’ करीत भांडण सुरू असते. ते भांडण तत्काळ प्रत्यक्ष मारामारीमध्ये बदलते. हे भांडण बघायला बघ्यांची गर्दी झालेली असते. या भांडणाकडे बघतानाही अपघात होत असतात. प्रत्येक ठिकाणी शिस्त पाळली गेली नाही, तर काय होते, याचे भयावह चित्र समोर येत आहे. रस्त्यावर शिस्त हरवली की, बळी पडतात ते निष्पाप जीवांचे. वाहतुकीचे नियम हे खरे तर सुरक्षिततेचे कवच आहे; पण आजकाल कोणालाच कोणतेच बंधन नको वाटत आहे. कितीही कारवाई केली, तरी अपघात आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.
महाराष्ट्रातील सर्व शहरांची परिस्थिती अशीच असली, तरी प्रातिनिधिक स्वरूपात पुणे शहराचे उदाहरण घेऊयात. शहरात 2023 या एका वर्षामध्ये 941 प्राणांतिक अपघात झाले होते. यात 351 जणांचा मृत्यू झाला, तर 695 जण गंभीर जखमी झाले होते. 2024 मध्ये अपघातांची संख्या 993 वर पोहोचली म्हणजेच अपघातांमध्ये पाच टक्के वाढ झाली. मृतांची संख्या 345 झाली असली, तरी गंभीर जखमींची संख्या साडेसातशे पर्यंत गेली. अपघाताचे कारण पाहता मद्य सेवन करून वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, दुचाकी गाडीवर तिघांनी बसणे, राँग साईडने गाडी चालवणे हे नित्याचे आहे. हा केवळ दंडात्मक कारवाईचा विषय नाही, तर अनेकांच्या आयुष्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे.
लोक स्वतःहून शिस्त पाळत नाहीत तोपर्यंत काही होऊ शकत नाही. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ‘नो एन्ट्री’चे उल्लंघन आणि ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणांमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. सिग्नल तोडणार्या वाहनचालकांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. कितीही दंड लागला, तरी त्याची पर्वा न करता चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणार्यांची संख्या वाढत आहे आणि खरे तर हीच काळजीची बाब आहे. वाहतुकीचे नियम न पाळणार्यांना आपल्यासारख्या सामान्य लोकांकडून विनंती आहे की, बाबांनो, तुमच्या आयुष्याची तुम्हाला पर्वा नसेल; परंतु आमच्या आयुष्यासाठी तरी किमान सगळ्या नियमांचे पालन करा. स्टंट तुम्ही कराल, दारू पिऊन तुम्ही गाडी चालवाल; पण जीव आमचा जाण्याची शक्यता आहे, याची तुम्ही दखल घेणार आहात की नाही? सिग्नल लालचा हिरवा होण्याच्या काही सेकंद आधीच आपली गाडी दामटणार्या लोकांनी अनेक अपघात केलेले आहेत.
आम्हाला प्रश्न असा पडतो की, या लोकांना इतक्या स्पीडने पुढे जाऊन नेमके काय करावयाचे असते? बरेचदा आपण पाहतो की, आपल्याला ओव्हरटेक करून एखादे वाहन तुफान स्पीडने आपल्या पुढे जाते आणि जेमतेम दोनशे मीटर अंतरावर जाऊन उभे राहते. अवघ्या काही मिनिटांत थांबायचे असेल, तर तू पुढे जाऊन काय दिवे लावणार आहेस, असा प्रश्न विचारावासा वाटतो.