‌Kunal Shah WhatsApp CEO | ’व्हॉटस्‌ॲप‌’चा सुकाणूही भारताकडे

‌Kunal Shah WhatsApp CEO |
‌Kunal Shah WhatsApp CEO | ’व्हॉटस्‌ॲप‌’चा सुकाणूही भारताकडे
Published on
Updated on

गणेश काळे, संगणक अभियंता

भारतीय फिनटेक क्षेत्रातील उद्योजक कुणाल शाह यांची व्हॉटस्‌ॲपच्या जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती हा भारतीय स्टार्टअप विश्वासाठी ऐतिहासिक क्षण आहे. या नियुक्तीसोबतच मेटाने क्रेडमध्ये मोठी गुंतवणूक करत व्हॉटस्‌ॲपला ‘सुपरॲप’ बनवण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेची दिशा स्पष्ट केली आहे.

भारतीय फिनटेक क्षेत्रातील अग्रगण्य उद्योजक आणि 'क्रेड‌'चे संस्थापक कुणाल शाह यांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांची फेसबुकची मातृसंस्था असलेल्या ‌'मेटा‌'च्या व्हॉटस्ॲ‌प या आघाडीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती करण्यात आली आहे. या महाकराराचा भाग म्हणून मेटाने क्रेडमध्ये ९० कोटी डॉलर्सची (सुमारे ८५५० कोटी रुपये) गुंतवणूक केली. क्रेडचे मूल्यांकन आता सुमारे ४.५ अब्ज डॉलर्सवर (सुमारे ४३,२३९ कोटी रुपये) पोहोचले आहे. गेल्या सात वर्षांपासून व्हॉटस्ॲ‌पला एक अब्ज वापरकर्त्यांवरून तीन अब्ज वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवणारे विल कॅथकार्ट आता या पदावरून बाजूला होत आहेत.

४७ वर्षीय कुणाल यांचा जन्म मुंबईतील गुजराती व्यावसायिक कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचा औषध निर्मिती क्षेत्रातील घाऊक व्यापार होता. कुणाल यांच्या पत्नी भावना ग्राफिक डिझायनर आहेत. सुंदर पिचाई किंवा सत्या नडेला यांसारखे सिलिकॉन व्हॅलीमध्ये कार्यरत असलेल्या इतर भारतीय वंशाच्या दिग्गज सीईओंनी नामांकित अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन पदव्यांच्या जोरावर कॉर्पोरेट शिडी चढत स्वतःचे स्थान मिळवले आहे. याउलट कुणाल शाह हे पूर्णपणे भारतातच शिकलेले आणि फिलाॅसॉफी या विषयाचे विद्यार्थी राहिलेले एक अस्सल ‌‘होमग्रोन‌’ उद्योजक आहेत. त्यांनी एमबीएचे अर्ध्यावरच सोडून दिले होते. बंगळूरमधून काम सुरू ठेवत शाह जागतिक स्तरावर व्हॉटस्ॲ‌पचे नेतृत्व करणार असल्याने भारत आता जागतिक स्तरावर व्यावसायिक रणनीती, फिनटेकची सूत्रे आणि नेतृत्व पुरवणारा देश बनला आहे.

कुणाल यांच्या रूपाने भारतीय फिनटेक तज्ज्ञाकडे सूत्रे सोपवून मेटाने व्हॉटस्ॲ‌पला केवळ एक संभाषणाचे माध्यम न ठेवता त्याचे रूपांतर एका ‌'सुपरॲप‌'मध्ये करण्याचे संकेत दिले आहेत. आगामी काळात व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातून ‌'कॉन्व्हर्सेशनल कॉमर्स', डिजिटल पेमेंट, विमा, कर्ज आणि एआय आधारित बिझनेस मेसेजिंगचा जागतिक स्तरावर विस्तार करणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असेल. कुणाल यांची निवड ही भारतासाठी आणि विशेषतः भारतीय स्टार्टअप क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक कामगिरी आहे.

करारानुसार मेटाला क्रेडच्या वापरकर्त्यांचा कोणताही आर्थिक किंवा वैयक्तिक डेटा मिळणार नाही, तरीही मेटाने केवळ कुणाल यांना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी ९०० दशलक्ष डॉलर्सचा मोठा डाव का खेळला, असा प्रश्न चर्चिला जात आहे. याचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रथम क्रेड या कंपनीची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. २०२२ मध्ये क्रेडचे मूल्यांकन ६.४ अब्ज डॉलर्सच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. त्यानंतर मंदीमुळे पुढील तीन वर्षे क्रेडला बाजारातून एकही डॉलरचा निधी उभारता आला नाही. अखेरच्या टप्प्यात त्यांनी ७२ दशलक्ष डॉलर्सची एक लहान फेरी पूर्ण केली; परंतु त्यासाठी त्यांना मूल्यांकन निम्म्याने घटवून ३.५ अब्ज डॉलर्सवर आणावे लागले होते, तरी क्रेड ही अपयशी कंपनी नक्कीच नव्हती. या प्लॅटफॉर्मवर दरमहा १ कोटी ७० लाख सक्रिय वापरकर्ते आहेत. भारतातील क्रेडिट कार्ड बिलांपैकी तब्बल ४० टक्के व्यवहार क्रेडवरून होतात आणि कंपनीने नुकताच पहिल्यांदाच निव्वळ नफाही नोंदवला. मेटाच्या मोठ्या गुंतवणुकीमुळे क्रेडचा आयपीओ आणण्याचा मार्ग सुकर झाला असून कंपनीचे भविष्य सुरक्षित झाले आहे.

आज जगभरात व्हॉटस्ॲ‌पचे सुमारे ३ अब्ज वापरकर्ते आहेत. इतका अथांग वापरकर्तावर्ग असूनही मेटाच्या एकूण महसुलात व्हॉटस्ॲ‌पचा वाटा अवघा १ टक्का आहे. २०१४ मध्ये मेटाने व्हॉटस्ॲ‌प खरेदी करण्यासाठी १९ अब्ज डॉलर्स मोजले होते; मात्र एका दशकानंतरही या प्लॅटफॉर्मवरून झुकरबर्ग यांना अपेक्षेप्रमाणे कमाई करता आलेली नाही. व्हॉटस्ॲ‌पच्या एकूण वापरकर्त्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक लोक भारत, ब्राझील आणि इंडोनेशियामध्ये राहतात. या बाजारपेठांमध्ये ग्राहकांकडून पैसे मिळवणे अत्यंत कठीण मानले जाते. २०१८ मध्ये व्हॉटस्ॲ‌पने कंपन्यांसाठी बिझनेस ॲप सुरू केले. याद्वारे संदेश पाठवण्यासाठी कंपन्यांकडून शुल्क आकारले जाते; मात्र मार्क झुकरबर्ग यांना व्हॉटस्‌ॲपचे रूपांतर एका महाकाय कॉनव्हर्सेशनल कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये करायचे आहे. यामध्ये ग्राहक चॅटिंग करता करताच खरेदी, बँकिंग, कर्ज आणि विमा या सर्व गोष्टी करू शकतील. बिझनेस मेसेजिंगचा बाजार २०२७ पर्यंत १० ते १५ अब्ज डॉलर्सवर जाण्याचा अंदाज आहे; परंतु भारतातील ग्राहक मोफत सेवांचे शौकीन असल्याने त्यांच्याकडून डिजिटल व्यवहारांसाठी पैसे खर्च करून घेणे हे फार मोठे आव्हान आहे. व्हॉटस्‌‍ॲप पे ला गेल्या ८ वर्षांत १ टक्का बाजार हिस्सा मिळवूनही फार मोठी झेप घेता आलेली नाही.

नेमकी हीच कोंडी फोडण्यासाठी मेटाला कुणाल शाह यांच्यासारख्या व्यक्तीची गरज होती. कुणाल यांनी भारतीय ग्राहकांची मानसिकता अचूक ओळखत दोन यशस्वी फिनटेक कंपन्या उभारल्या आहेत. २०१० मध्ये त्यांनी ‌'फ्री चार्ज‌'ची स्थापना केली होती. त्या काळात भारतात पेटीएम किंवा यूपीआय अस्तित्वात नव्हते. अशा वेळी भारतीय ग्राहकांना डिजिटल वॉलेटमध्ये पैसे ठेवण्यास राजी करणे ही अशक्यप्राय गोष्ट त्यांनी करून दाखवली आणि पुढे ती कंपनी ४०० दशलक्ष डॉलर्सना स्नॅपडीलला विकली. २०१८ मध्ये त्यांनी ‌'क्रेड‌'द्वारे क्रेडिट कार्डचे बिल भरणे या प्रक्रियेला त्यांनी ‘स्टेटस सिम्बॉल‌’मध्ये बदलून टाकले. ७५० पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांसाठीच हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत त्यांनी एका आर्थिक सुविधेला विशेषाधिकाराचे रूप दिले. विकसनशील देशांमधील ग्राहकांच्या खिशातून पैसे कसे काढायचे आणि नवीन श्रेणी कशी निर्माण करायची, याचे उत्तम कसब कुणाल शाह यांच्याकडे आहे. कुणाल यांच्याकडे असणारी ग्राहकांच्या आर्थिक वर्तनाची समज आणि डेटा-ड्रिव्हन व्यवसाय मॉडेलची पकड, ‌'व्हॉटसॲप‌'ला एका मोठ्या महसूल इंजिनमध्ये बदलण्यासाठी उपयुक्त ठरेल, या विश्वासाने मार्क झुकरबर्ग यांनी ही निवड केली आहे.

या व्यवहारामागे नॅशनल पेमेंटस्‌‍ कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आगामी काळात लागू करत असलेला ३० टक्क्यांचा बाजारातील मर्यादेचा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या फोन पे आणि गुगल पे या कंपन्यांकडे ३० टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा आहे. हा नियम लागू झाल्यानंतर या कंपन्यांना आपले व्यवहार मर्यादित करावे लागतील आणि तो वळणारा ग्राहकवर्ग सामावून घेण्यासाठी व्हॉटस्‌ॲपकडे ५० कोटी वापरकर्त्यांचे मोठे जाळे उपलब्ध आहे. क्रेडच्या प्रीमियम जोडणीमुळे हा बदल अधिक वेगाने होऊ शकतो.

आतापर्यंत जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या भारतीयांमध्ये सुंदर पिचाई (गुगल) किंवा सत्या नाडेला (मायक्रोसॉफ्ट) यांचा समावेश होता. हे सर्व नेते ‌'कॉर्पोरेट लिफर‌' होते. म्हणजेच त्यांनी एकाच कंपनीत अनेक दशके काम करून सर्वोच्च पद मिळवले होते; मात्र कुणाल शाह यांच्या रूपाने पहिल्यांदाच एका अस्सल भारतीय स्टार्टअप संस्थापकाला थेट जागतिक पातळीवरील एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. भारतीय उद्योजकांच्या जोखीम घेण्याच्या आणि शून्यातून विश्वासनिर्मिती करण्याच्या क्षमतेवर जागतिक तंत्रज्ञानजगताचा वाढता विश्वास म्हणून याकडे पाहावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news