कुंभमेळ्याचा सांगावा

कुंभमेळ्याबद्दल नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक
kumbh-mela-planning-meeting-nashik-cm-devendra-fadnavis
कुंभमेळ्याचा सांगावाPudhari File Photo
Published on
Updated on

केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदू धर्मीयांच्या द़ृष्टीने कुंभमेळ्याचे महत्त्व अनन्यसाधारण असते. गोदावरीच्या काठावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2026-28 मध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यातील मुख्य तीन पर्वणींच्या तारखा जाहीर झाल्याने त्याबद्दलची प्रतीक्षा संपली आहे. पुढील वर्षी 31 ऑक्टोबरला ध्वजारोहणाने मेळ्याची सुरुवात होईल. गोदाकाठी भरणारा हा कुंभमेळा जास्त काळ म्हणजे बावीस महिने चालेल. साधू, महंत आणि पुरोहित संघाने जाहीर केल्यानुसार, स्नानासाठी जास्त मुहूर्त आहेत. त्यामुळे गर्दीचे योग्य नियोजन करता येणार आहे. ऐन पावसाळ्यात असलेल्या तीन पर्वणींपैकी दोन मुहूर्त एकाच दिवशी असल्याने अमृतस्नानासाठी येणार्‍या भाविकांची गर्दी विभागली जाईल. मुख्य पर्वणीसोबत सिंहस्थकाळात त्र्यंबकेश्वर येथे तीर्थ स्नानाचे 29 आणि नाशिकमध्ये 45 विशेष मुहूर्त आहेत. मुख्य तीन पर्वणींच्या दिवशी दोन्ही ठिकाणी साधू महाराजांची अमृत मिरवणूक निघते. प्रत्येक आखाड्याची क्रमवारी व स्नानाचा कालावधी निश्चित असतो. त्यानुसार साधुमहंतांचे स्नान झाल्यानंतरच सामान्य भाविकांना गोदावरीत डुबकी मारता येईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये झालेल्या नियोजन बैठकीत कुंभमेळ्याबद्दल विचारविनिमय होऊन, प्रमुख निर्णय घेण्यात आले. कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात साजरा होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची उपलब्धता करून दिली जाईल. कुंभमेळा भारतीय संस्कृतीचे प्रतीक असल्याने, संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने जग बघत राहील, असे भव्य आणि संस्मरणीय आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कुंभमेळ्याबाबत साधुमहंतांचे मार्गदर्शनही उपयुक्त ठरणार आहे. यंदा पूर्वतयारीला अधिक कालावधी असल्यामुळे, कोणतीही कमतरता राहणार नाही, अशी अपेक्षा आहे. त्र्यंबकेश्वर व नाशिकचा कुंभमेळा पावसाळ्यात होतो. त्र्यंबकेश्वर येथे चारही बाजूने पर्वतरांगा असून, तेथे जमीन कमी आहे. ज्या जमिनी त्यांचे भाव वाढल्यामुळे, त्या देण्यास जमीनमालक तयार नाहीत. अशावेळी आखाड्यांच्या मोकळ्या जागा व गायरान जमिनी आणि शासकीय भूखंड हे कुंभमेळा कालावधीसाठी भाडेतत्त्वावर घ्यावेत, अशी सूचना केली जात आहे.

आखाडे, तसेच साधुमहंत आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी सर्व पायाभूत व्यवस्था करावी लागेल. रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्यव्यवस्था, सुरक्षा, वीजपुरवठा अशी सर्व कामे करावी लागतील. मागच्या कुंभमेळ्याच्या कालावधीत पर्वाच्या आदल्या दिवशी सिमेंट रस्ते बनवण्यात आले होते. अशी घाईगडबड यावेळी होता कामा नये. 21 व्या शतकातील पहिली 24 वर्षे लोटली असून, आता नियोजनासाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या काळात कुंभमेळा पार पडला. उत्तर प्रदेशात भाविकांची सुरक्षा आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी जीपीएस, एआय, ड्रोन आदी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. तेथे 2,700 सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. त्यापैकी अनेक कॅमेरे एआय एनेबल्ड होते. त्यामुळे एखाद्या ठिकाणी गर्दी झाली, तर तत्काळ त्याबद्दलची अधिकार्‍यांना माहिती मिळत होती आणि त्यानुसार ती नियंत्रित करता येत होती.

‘डिजिटल लॉस्ट अँड फाऊंड सिस्टीम’चा उपयोग करून घेण्यात आला होता. ‘कुंभ सहायक अ‍ॅप’ डिझाईन करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकारही नियोजन, गर्दीच्या नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करेल, हे स्पष्ट आहे. प्रचंड गर्दीची शक्यता गृहीत धरून, 2,270 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना गती दिली जात आहे, ही चांगली बाब आहे. नाशिक-त्र्यंबक रस्त्याच्या काँक्रीटीकरणासह सहापदरीकरण केले जात असून, पालखी मार्गासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नाशिक-दिंडोरी-वणी-नांदुरी रस्ता रुंदीकरण आणि सुधारणा करण्याकरिता 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, नाशिक रोड रेल्वेस्थानकाला पर्यायी रेल्वेस्थानके निर्माण करणे आणि गर्दीचे विभाजन करून नियोजन, याद़ृष्टीने रेल्वे आढावा घेत आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे.

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर हे देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक जागृत देवस्थान असून, दक्षिण भारतातील पवित्र स्थळांपैकी एक आहे. दर 12 वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा, गंगा-गोदावरी उत्सव, संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रा, श्रावण महिना प्रदक्षिणा यासारख्या अनेक धार्मिक कार्यक्रमांमुळे भाविकांचा त्र्यंबकेश्वरला ओघ असतो. आता ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे सुविधानिर्मिती सहजशक्य होणार आहे. कुंभमेळ्याची कामे त्वरेने सुरू करण्यासाठी उत्तर प्रदेशने केला तसा प्राधिकरण कायदा तयार करण्यात येणार असून, या प्राधिकरणात केवळ प्रशासकीय अधिकार्‍यांनाच स्थान देण्यात येणार आहे. मात्र, उत्तर प्रदेशात कुंभमेळ्याच्या वेळी चेंगराचेंगरी, आग लागणे, रेल्वे गाड्यांमध्ये तुफान गर्दी होऊन रेल्वेस्थानकांवर गोंधळ उडणे अशा घटना घडल्या होत्या. त्यापासून योग्य ते धडे घेऊन, सावधगिरी बाळगली पाहिजे.

गोदावरीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी मलनिःसारण केंद्राचे काम सुरू करण्यात येत आहे. कुशावर्ताच्या पाण्याबद्दल खुद्द फडणवीस यांनीच नाराजी व्यक्त करत, तेथील पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी काही सूचना केल्या आहेत. कुंभमेळ्यासाठी प्रशासन अनधिकृत व्यक्तींशी चर्चा करत असल्याचा आरोप महंत राजेंद्र दास यांनी केला होता. साधुमहंतांचे मतभेद आणि रागलोभ सांभाळणे, ही मोठी जबाबदारी असते. आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनास प्रोत्साहन मिळणार आहे. देशाच्या आणि जगाच्या विविध भागांतून येणार्‍या लोकांना महाराष्ट्राच्या विकासाचे दर्शन घडवण्याची हीच संधी आहे. केवळ नाशिकच नव्हे, तर राज्यातील सर्वच धार्मिकस्थळांची स्वच्छता आणि सुरक्षा, याकडे राज्य सरकारने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. गोदावरी स्वच्छ, निर्मळ आणि वाहती ठेवण्याचा निर्धार करताना त्यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कुंभमेळ्यातून सामाजिक व धार्मिक ऐक्याचा नवा संदेशही दिला जाईल, ही आशा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news