

मोहन एस. मते, मुक्त पत्रकार
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ‘प्रतिसरकार’द्वारे ग्रामीण भागातील ब्रिटिश सत्तेला कणाकणाने खिळखिळे करत पर्यायी राज्यव्यवस्था उभारली. आज त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त...
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा संपूर्ण जगासाठी उद्बोधक ठरणारा होता. महाराष्ट्रामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी दिलेला संघर्षमय लढा हा त्यापैकीच एक होता. त्यांचे जीवन म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील धगधगते यज्ञकुंडच आहे. येडेमच्छिंद्र या खेड्यात जन्मलेल्या नाना पाटील यांच्या ठसठशीत व्यक्तिमत्त्वाने आणि नैसर्गिक कणखरतेने त्यांना लहान वयातच जनसामान्यांमध्ये विशेष ओळख मिळवून दिली. शिक्षण पूर्ण करून त्यांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली; परंतु सामाजिक तळमळ आणि लोकांप्रति बांधिलकी यामुळे त्यांनी नोकरी सोडली आणि 1930 च्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात सहभाग घेतला. सांगली आणि सातारा या परिसरातील जनतेला संघटित करून ब्रिटिशराजवटीविरुद्ध संघर्षाची पायाभरणी त्यांनी केली.
स्वातंत्र्यलढ्यामधील एक झुंझार नेते म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या निर्णायक टप्प्याची सुरुवात ‘प्रतिसरकार’च्या स्थापनेतून झाली. ते हिंसेचे समर्थक नव्हते; पण ब्रिटिशशासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. ग्रामीण भागातील ब्रिटिशसत्तेला कणाकणाने खिळखिळे करत पर्यायी राज्यव्यवस्थेची उभारणी हे त्यांच्या नेतृत्वाचे अभूतपूर्व यश ठरले. न्यायनिवाडा ते धान्य वितरण व्यवस्था, कर संग्रहण ते प्रशासन या सर्व गोष्टी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चालवल्या जाऊ लागल्या आणि ‘प्रतिसरकार’ हे घराघरांत पोहोचले. नाना पाटील यांचे वक्तृत्व प्रभावशाली होते. ते शेतकर्यांच्या भाषेत बोलत. शेतकर्यांमधली उदाहरणे देत. त्यांचे प्रश्न मांडत. त्यामुळे खेड्यापाड्यातील जनतेला ते आपलेसे वाटायचे.
‘प्रतिसरकार’ या आंदोलनाचा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे ‘तुफान दल’. रेल्वे मार्गांवरील ब्रिटिशवाहतूक, पोस्ट प्रणाली, शासकीय कोठारे आणि दफ्तरांवर धडक देणार्या त्यांच्या गनिमी कारवायांनी ब्रिटिशप्रशासनाला धास्तावून सोडले. सामाजिक तणाव मिटवण्यासाठी लोकन्यायालये, धान्य व आवश्यक वस्तूंची साखळी, कर्जमुक्तीचे निर्णय हे सर्व काही त्यांनी जनतेच्या हितासाठी उभे केले. नाना पाटील ब्रिटिशअधिकार्यांच्या तळपायाला पत्रा ठोकत असत, अशा चर्चा त्याकाळात समाजामध्ये होत्या. त्यातूनच त्यांच्या प्रतिसरकारला ‘पत्री सरकार’ असेही म्हटले जात असे.
1942 ते 1946 ही वर्षे नाना पाटील यांच्या भूमिगत संघर्षाची होती. ब्रिटिशांनी त्यांच्या नावावर बक्षीस जाहीर केले, छावण्या उभारल्या, गुप्तहेर पेरले, तरीही नाना पाटील यांना पकडण्यात त्यांना यश आले नाही. भारत स्वतंत्र होणार हे निश्चित झाल्यावरच त्यांनी 1946 मध्ये भूमिगत अवस्था संपवली; परंतु स्वातंत्र्यानंतरही त्यांची आंदोलनशीलता आणि सामाजिक जबाबदारी थांबली नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, शेकाप, कम्युनिस्ट पक्षातील संघटनबांधणी हे सर्व ते जोमाने करत राहिले. 1957 मध्ये उत्तर सातारा आणि 1967 मध्ये बीडमधून ते लोकसभेत निवडून आले. संसदेत मराठीत भाषण करणारे पहिले खासदार म्हणून त्यांची नोंद झाली.
वाळवा येथे 6 डिसेंबर 1976 रोजी त्यांचे निधन झाले आणि शेतकर्यांचा, कष्टकर्यांचा, गोरगरीब जनतेचा, उपेक्षितांचा कैवारी किंवा मसीहा हरपला. अखेरच्या इच्छेनुसार त्यांचे अंतिम संस्कारही वाळव्यातच करण्यात आले. पण नाना पाटील यांचा वारसा, त्यांची क्रांतिकारक विचारसरणी, सामाजिक समता आणि शोषित-वंचितांच्या हक्कांसाठीचा अखंड संघर्ष आजही तितकाच जिवंत आहे. त्यांच्या कार्याने अनेक पिढ्यांना सामूहिक शक्तीची जाणीव करून दिली, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे बळ दिले.