Ganesh festival | चाकरमान्‍यांचा गणेशोत्‍सव

Konkan vartapatra
कोकण वार्तापत्रpudhari file photo
Published on
Updated on

शशिकांत सावंत

दरवर्षी गणरायाच्या आगमनाने गजबजणाऱ्या कोकणात चाकरमान्यांच्या मनातील गावाची ओढ पुन्हा जागी होते; मात्र हा उत्सव संपल्यानंतरही कोकण कायम गजबजलेले राहावे, यासाठी रोजगार आणि विकासाची नवी दारे उघडण्याची गरज आहे.

गणेशोत्‍सवासाठी मुंबईसह जगभरातले कोकणवासीय कोकणात दाखल होतात आणि एरवी निस्‍तेज वाटणारी गावे गजबजून जातात. प्रत्येक घर उत्‍सवासाठी सजते. एकंदरीत कोकणातील गावांच्या भवितव्याची दिशा ही याच उत्‍सवात एकत्र आलेले चाकरमानी देतात. गणेशोत्सव दहा दिवसांवर येऊन ठेपला असताना लाखो चाकरमान्यांना कोकणात जाण्याचे वेध लागले आहेत. या उत्सव काळात कोकणच्या माणसांची स्‍वत्‍वाची झळाळी पुढे येते. वर्षभर बंद असलेली घरे कोकणात गणेशोत्सवाच्या निमित्ताने खुली होतात आणि 'गणपती बाप्पा मोरया...'चे सूर घराघरांत घुमू लागतात. हार्मोनियम, तबला, मृदंग, टाळ आणि घराघरांत घुमणारे भजनाचे सूर याच गणेशोत्सवात कानावर पडतात आणि परंपरा व उत्सवाची आगळीकता जपणारे कोकण मनामनात रुंजी घालते.

इथल्या माणसांपासून निसर्गरम्य भासणारी प्रत्येक गोष्ट या सणाला महत्त्वपूर्ण रूप देते. दुर्वा, केळीच्या पानापासून साग, वडाच्या पानांनाही पूजेत महत्त्वाचे स्थान आहे. एरवी डोंगरात वैभव वाढवणार्‍या रान केळीची पाने या गणेशोत्‍सवातील ११ दिवसांत पंगतीची शोभा वाढवतात. तसेच पावसात फुलणारी फुले, वेलीही गणरायाच्या आगमनात, सजावटीत उपयुक्त ठरतात. कृत्रिम फुलांपेक्षा दारी फुलणारी फुले गणरायाच्या चरणी अर्पण केली जातात. दारी सडे रांगोळ्या पडतात. उत्सव सुरू होण्यापूर्वी चार दिवस आधीपासून दारी तोरण, मंडप सजावटीच्या तयारीला वेग येतो. एक अनोखा उत्साह लहानापासून मोठ्यांपर्यंत संचारतो. साफसफाई ते जय्यत तयारी असा हा उत्साह प्रत्येकाला प्रेरणा देतो. कोकणात जाणारे चाकरमानी स्‍थानिक बाजारपेठांना आर्थिक बळ देतो. छोटे-मोठे व्यावसायिक वर्षभराची उलाढाल या अकरा दिवसांत करतात. मूर्तिकारांना सुगीचे दिवस येतात आणि या सणाबरोबर आर्थिक सुबत्ताही येते. कोकणतला प्रत्येक घरातला एक माणूस तरी मुंबईत आहे. त्याच्या मनीऑर्डरवर सर्व सुखनैव चालायचे. पूर्वी एक भाऊ मुंबईत, तर दुसरा भाऊ गावात राहून घर सांभाळायचा. शेतात पिकलले धान्य ताे मुंबईच्या भावाला पाठवायचा आणि मुंबईचा भाऊ त्याला न चुकता मनीऑर्डरने पैसे पाठवायाचा. आता हे चित्र बदलेले आहे. गावात राहणार्‍या आणि शेतात वावरणार्‍या भावाला लग्‍नाच्या बाजारातही किंमत उरलेली नाही. म्‍हणूनच आता प्रत्‍येक भाऊ मुंबईची वाट धरू लागला आहे. कोकणातील गावे आणि घरे निर्मनुष्य होऊ लागलीत आणि मग गाव जागे होण्यासाठी दरवर्षी गणेशोत्‍सवाची वाट पाहण्याची वेळ आली.

हा बदललेला काेकण शाळांची घसरलेली पटसंख्या आणि रोडावलेले मतदान यामुळे आता राज्यकर्तेही म्‍हणू लागले आहेत,  'या तरुणांनो परत फिरारे'! पण, खरच ते दिवस परत येतील का? काेकण पून्‍हा पूर्वीप्रमाणेच गजबजून जाईल का? हाच प्रश्‍न आज प्रत्येकाच्या मनात आहे. म्‍हणूनच या गणशोत्‍सवात गणपतीसमोर हेच गार्‍हाणे घातले जाईल. कोकणात नव्या राेजगाराच्या संधी उपलब्‍ध झाल्या, तर तेही दिवस पुन्‍हा येतील.

वर्षानुवर्षाची परंपरा असलेला हा गणेशोत्सव कोकणच्या अस्मितेचा, उत्साहाचा आणि परंपेरचा सण आहे. या सणाचा या निमित्ताने कोकणातील नात्यांचे भावबंध, शेजारपणाचे भावबंध आणि गावागावातील नागरिकांचे असलेले एकमेकांशी स्नेहबंध अधिक दृढ होत आहेत. म्हणूनच या सणाची कोकणी माणसाच्या मनातील महती अधिक जागृत आणि संवेदनशील आहे. म्हणूनच हजारो किलोमीटर दूरवरूनही एका आत्मिक ओढीने इथला माणूस गावाकडे ओढला जातो. गावातले जे पूर्वीचे दिवस, त्याची आठवण यात हे आठ दिवस तो रमून जातो. यातून त्याला मिळणारी ऊर्जा ही त्याच्या भावी वाटचालीला प्रेरणा देत असते म्हणूनच हा मनातला भावबंध वर्षानुवर्षे त्याच्या मनात टिकून आहे आणि म्हणून कोकणात रोजगार निर्माण झाले, तर या लाल मातीत काम करण्‍याची तयारीही इथला तरुण दाखवेल.

आज इथल्या पाटबंधारे प्रकल्पांची कथा आणि व्‍यथा अधिक गहिरी आहे. ४४ वर्षे रखडलेले प्रकल्प मार्गी लागले, तर शेतीतून रोजगारनिर्मितीला चालना मिळू शकेल. कोकणमध्‍ये असलेल्या सर्व पायाभूत सुविधा वाढविल्या, तर पर्यटनालाही चालना मिळेल. इथल्या तरुणांना माघारी ये म्हणताना त्यांच्यासाठी रोजगार, उद्योगांचे दालन खुले झाले, तर केवळ गणेशोत्सवात मोठ्या ओढीने येणारा हा चाकरमानी कोकणच आपली कर्मभूमी मानेल, हे नक्की!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news