Konkan industrial hub | कोकण होणार उद्योगनगरी

Konkan vartapatra
कोकण वार्तापत्रpudhari file photo
Published on
Updated on

शशिकांत सावंत

मुंबईच्या विस्तारासोबत कोकणात ‘तिसरी’ आणि ‘चौथी’ मुंबई आकार घेत असून, या भागात दोन लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक होत आहे. पायाभूत सुविधा, बंदरे, विमानतळ आणि औद्योगिक कॉरिडॉरमुळे रायगड व पालघर जिल्हे नव्या औद्योगिक केंद्रांमध्ये परिवर्तित होत आहेत. मोठ्या प्रकल्पांमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळत असून कोकण महाराष्ट्राच्या विकासाचा नवा केंद्रबिंदू बनत आहे.

मुंबईला जोडून कोकणात तिसर्‍या आणि चौथ्या मुंबईची होत असलेली नवरचना आणि या भागामध्ये दोन लाख कोटींपेक्षा होत असलेली गुंतवणूक यामुळे कोकण आता महाराष्ट्रातील नवी उद्योगनगरी म्हणून उदयाला येत आहे. तिसर्‍या मुंबईमध्ये पनवेल, उरण, पेण, खोपोली, अलिबाग, रोहा, सुधागड आणि चौथ्या मुंबईमध्ये पालघर, डहाणू, तलासरी, कल्याण, वसई, विरार या भागांमध्ये उद्योगांचे नवे जाळे निर्माण होणार आहे. तिसर्‍या मुंबईचे मुख्य आकर्षण आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीए बंदर आणि रेवस-रेड्डी सागरी महामार्ग, तर चौथ्या मुंबईचे आकर्षण आहे 76 हजार कोटींचे वाढवण आंतरराष्ट्रीय बंदर, सी फेज आंतरराष्ट्रीय विमानतळ.

कोकणातील रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून, तर रत्नागिरी फलोद्यान, सिंधुदुर्ग पर्यटन हे जिल्हे आपापल्या वैशिष्ट्यांनी आणि समृद्धतेने विकसित करण्याच्या धोरणामध्ये नवी ओळख देण्यासाठी शासनाने काही धोरणात्मक निर्णय घेतले आणि विकासाचे आराखडे तयार झाले आणि आता त्याच दिशेने ते विकसित होत आहेत. महाराष्ट्रात विकासाचा केंद्रबिंदू आता यामुळे कोकण होऊ लागला आहे. महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी 2 लाख 56 हजार कोटींच्या 18 मोठ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याकरिता राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामध्ये कोकणात येणारे उद्योग अधिक आहेत. साहजिकच तिसर्‍या मुंबईतील रायगड आणि चौथ्या मुंबईतील पालघर जिल्ह्याच्या विकासास मोठे बळ प्राप्त होणार आहे.

या एकूण गुंतवणुकीपैकी सर्वाधिक 1 लाख 23 हजार 131 कोटी रुपयांची गुंतवणूक रायगड आणि पालघर जिल्ह्यात होत असून, त्यातून या उभय जिल्ह्यांमध्ये तब्बल 35 हजार 200 नवे रोजगार उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत राज्यातील एकूण 18 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. त्यातील चार अतिविशाल प्रकल्प रायगड व पालघर जिल्ह्यात आहेत. या नव्या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. त्याचबरोबर राज्यात एकूण सुमारे एक लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे.

राज्याच्या नव्या औद्योगिक धोरणामुळे कोकणात एस्सार एक्स्प्लोरेशन, बालासोरे अलॉयज, अ‍ॅक्मे क्लिनटेक सोल्युशन या कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे 1 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार आहेत. कोकणात बोईसर, तारापूर, महापे, रोहा, महाड, रत्नागिरी, कुडाळ येथे एमआयडीसी आहेत. येथील उद्योगांनाही यामुळे चालना मिळेल. जेएनपीए वाढवण बरोबरच दिघी येथेही दिघी मुंबई-दिल्ली औद्योगिक कॉरिडॉर विकसित होत आहे. याचबरोबर दुसरा औद्योगिक कॉरिडॉर अलिबाग, विरार विकसित होत आहे. या दोन्ही औद्योगिक कॉरिडॉरचा फायदा कोकणातील गुंतवणूकवाढीसाठी होणार आहे.

पाताळगंगा या औद्योगिक वसाहतीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रकल्पांना चालना मिळत आहे. तिसर्‍या मुंबईत होणारा एज्युकेशन हब हाही येथील विकासरेषांमधील महत्त्वाचा प्रकल्प आहे. मुंबई ते वीरपर्यंत कोकण रेल्वे मार्गाचे झालेले दुहेरीकरण आणि मुंबई-विरार ते डहाणू रेल्वे महामार्गाचे झालेले चौपदरीकरण यामुळेही येथील औद्योगिक प्रकल्प वाढणार आहेत. त्यामुळे कोकण हे भविष्यातील महाराष्ट्राची उद्योगनगरी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news