

शशिकांत सावंत
दुष्काळ स्थितीवर मात करण्यासाठी कोकणात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही चळवळ सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोकणातील या चळवळीला नागरिकांनी स्वप्रेरणेतून प्रतिसाद दिल्याने मोठ्या प्रमाणावर कच्चे बंधारे बांधून पाणी अडवण्याची सकारात्मक चळवळ सुरू झाली. त्यामुळे १२ हजारांपेक्षा जास्त कच्चे बंधारे बांधले गेले. याचा प्रमुख फायदा फेब्रुवारीनंतर होणाऱ्या पाणीटंचाई निवारणासाठी होणार आहे.
खरं तर, अल निनोच्या स्थितीमुळे कमी झालेला पाऊस आणि भात शेतीला बसलेला फटका यामुळे उन्हाळी शेती निम्म्याने कमी झाली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी शेती केली जाते. त्यामध्ये तूर, वाल, पांढरा कांदा आणि काही प्रमाणात भात शेतीही होते. उन्हाळी पिकांमध्ये मानांकित (जीआय टॅग मिळालेल्या) फळांचा मोठा समावेश आहे. त्यामध्ये दक्षिण कोकणातील हापूस, अलिबागचा पांढरा कांदा, घोलवडचा चिकू, बहाडोली-बदलापूरची जांभळे यांचा समावेश आहे. मात्र, या पिकांवरही सध्याच्या हवामान बदलाचा विपरीत परिणाम झाला आहे. हे उत्पादन निम्म्यावर येण्याची भीती तज्ज्ञ मंडळी व्यक्त करत असतानाच यावर उपाय म्हणून पाणी अडवण्याची मोहीम लोकचळवळीतून सुरू झाली. याचा फायदा पांढरा कांदा, चिकू या पिकांना होणार आहे. या पाणी चळवळीला अडसर ठरतेय ते रासायनिक कारखान्यांचे दूषित पाणी. हे पाणी नद्या व खाड्यांमध्ये सोडले जात असल्याने शुद्ध पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. उल्हास, पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री, जगबुडी यांसह जवळपास २० नद्यांमध्ये प्रदूषित पाणी जात असल्याचा प्रदूषण नियंत्रण मंडळाचाच अहवाल आहे. यावर उपाय काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
कोकणात महामुंबईचा होणारा विस्तार आणि वाढते औद्योगिकीकरण यामुळे पाणी प्रदूषणाचा प्रश्न दिवसागणिक वाढत आहे. अपुऱ्या पाटबंधारे प्रकल्पांची संख्या ही ५० पेक्षा जास्त आहे. गेल्या २५ वर्षांपासून हे प्रकल्प रखडलेले आहेत. कोकणचे नेते नारायण राणे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी स्वतंत्र कोकण पाटबंधारे महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. मात्र, १९९९ मध्ये स्थापन झालेले हे महामंडळ पुढील १० वर्षांतच भ्रष्टाचाराचे आरोप होऊन गुंडाळण्यात आले. कोंढाणे, हेटवणे यांसह पाच धरणांची कामे या भ्रष्टाचाराच्या तक्रारींमुळे बंद झाली. ती आजही त्याच स्थितीत आहेत.
आज लोकचळवळीतून पाणी अडवण्याची भूमिका तिथल्या जनतेने घेतली आहे; मात्र आता शासनानेही कारखान्यांच्या रासायनिक पाण्यापासून होणारे प्रदूषण रोखून आणि रखडलेले ५० पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करून या पाणी चळवळीला पाठबळ देण्याची गरज आहे. कोकणचा सिंचनाचा २००० कोटींचा अनुशेष वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. हा अनुशेष शासनाने दिला, तर हे पाटबंधारे प्रकल्प पूर्ण होणे शक्य आहे. कारण, बऱ्याच पाटबंधारे प्रकल्पांची कामे ही ७० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहेत; मात्र गेल्या १० वर्षांत काहीच निधी न मिळाल्याने ती अपूर्ण आहेत. कोकणची पाणीदार चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी या प्रकल्पांना पूर्णत्वाची संजीवनी देणे गरजेचे आहे.