मानव-प्राणी संघर्ष रोखता येईल?

Elephant Attacks
Elephant AttacksAdministrator
Published on: 
Updated on: 

शशिकांत सावंत

कोकणात मानव आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, हत्ती आणि बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी व नागरिकांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

मागच्या वर्षी केरळमध्‍ये गर्भवती हत्तिणीचा फटाके असलेले अननस खाऊन मृत्यू झाला होता, तेव्‍हा माणूस आणि प्राणी संघर्षाच्या तीव्र वेदनांचा आलेख समोर आला. अशाच पद्धतीचे थोडे सौम्य वर्तन तिलारीच्या खोऱ्यात ओंकार हत्तीच्या बाबत झाल्याचे सांगितले जात आहे. कोकणात मानव आणि प्राणी संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात माणसांचा मृत्यू होतो आहे. हत्ती-मानव संघर्ष वाढत आहे. जंगलतोडीमुळे हत्ती पारंपरिक भूप्रदेश सोडून इतर भागांत जातात. हेच या संघर्षाचे मूळ कारण आहे. हत्तींच्या मूळ प्रदेशाबाबत शास्त्रीय दृष्टिकोनातून जे अभ्‍यास झाले आणि त्यांच्या स्थलांतराचे निरीक्षण नोंदवले गेले, त्यामध्‍ये गेल्या दहा ते पंधरा वर्षांत हत्ती मूळ अधिवास सोडून मानव वस्तीनजीकच्या शेताकडे आकर्षित झाल्याचे दिसत आहे.

महाराष्‍ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यामध्‍ये आलेले हत्ती कर्नाटकातील दांडेली या मूळ अधिवासातून स्थलांतरित झाले आहेत. पश्‍चिम घाटामध्‍ये खाणकाम आणि जलविद्युत प्रकल्पांमुळे जंगली प्राणी अन्नाच्या शोधार्थ स्थलांतरित होताना दिसत आहेत. हत्तीप्रवण तिलारी क्षेत्रात अलीकडेच वाघिणीने तीन पिल्लांना जन्म दिला. पट्टेरी वाघाव्‍यतिरिक्त बिबटे, ब्लॅक पँथर, रान कुत्री, रानमांजर, कोल्हा हे मांसभक्षी प्राणी असल्याने त्यांचे मुख्‍य अन्न सांबर, भेकर, गवे, रानडुक्कर, शेकरू, लोरीस, वानर, भेकरे हे असते. तिलारीच्या जंगलात हे प्राणी मोठ्या प्रमाणावर आहेत. हा भाग संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित व्‍हावा म्हणून पर्यावरणवाद्यांची चळवळ आहे. पिण्‍याच्या पाण्‍याचे विपुल स्रोत, जलविद्युत प्रकल्प औषधी वनस्पती आणि दुर्मीळ जंगली वृक्ष येथे आहेत. हत्ती या भागाकडे आकर्षित झाले. आता या स्थलांतरित झालेल्या पाहुण्‍यांचा त्रास शेतकऱ्यांना होऊ लागल्याने हा संघर्ष वाढत आहे.

हत्तीग्रामसारखी संकल्पना राबवून हा संघर्ष काही प्रमाणात थांबवणे शक्य आहे. जंगलांमध्‍ये घाणेरी आणि रानमोडी या वनस्पतींच्या बेसुमार वाढीमुळे तृणभक्षी प्राण्‍यांचे नैसर्गिक अन्न कमी झाले आहे. त्यामुळे हत्ती हे मूळ जंगलातून मानवी वस्तीकडे स्थलांतरित झाले आहेत. जंगलांमध्‍ये चर मारणे, सौरऊर्जा कुंपण घालणे आणि हत्तींना पळवून लावण्‍यासाठी फटाके लावणे, असे प्रयत्न शासनस्तरावर झाले; पण या प्रयोगांचा फायदा मात्र काही झाला नाही.

हत्तींचे स्थलांतराचे मार्ग ठरलेले असतात. हत्ती हा बिनधास्त प्राणी असल्याने कुठच्या अडथळ्यांना न जुमानता तो पुढे जातो. मग, रस्त्यावर आलेल्या केळी बागायती, झाडे याची तो नासधूस करतो. त्यांच्या पारिवारिक जीवनाचा अभ्‍यास करून त्यांचे संवर्धन करणे शक्य आहे. अनेक देशांमध्‍ये हत्तीग्रामसारखी संकल्पना प्रत्ययरूपामध्‍ये आली आहे. याचा विचार आपल्या सरकारने मात्र केलेला नाही. म्हणूनच हा प्रश्‍न अधिक गंभीर रूप धारण करू लागला आहे.

पश्‍चिम घाटात २५ वर्षांपूर्वी पामतेल, रबर, नीलगिरी, मांजीयम, ऑस्ट्रेलियन बाभूळ असे वृक्ष लावले गेले. यामुळे मूळ वृक्षांचा ऱ्हास झाला. कोकण पट्ट्यात रबर, पामतेल वनस्पतींची लागवड आजही मोठ्या प्रमाणात होत आहे. हे परदेशी वृक्ष आणले गेले, हाही वन्यप्राण्‍यांच्या स्थलांतराचे एक कारण आहे. आपल्या जंगलांचे मूळ स्वरूप पुन्हा स्थापित करण्‍यासाठी दीर्घकालीन उपाययोजना हाती घ्‍याव्‍या लागणार आहेत. त्यासाठी धोरणकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांचा योग्य समन्वय आवश्‍यक आहे. हत्तींच्या अभ्‍यासासाठी दक्षिण कोकणात आता पर्यावरणवादी मंडळीनी पावले उचलली आहेत. हत्तींना योग्य प्रशिक्षण दिले, तर त्याचा सकारात्मक उपयोगही होऊ शकतो, याची उदाहरणे राजेरजवाड्यांच्या कालखंडापासून आहेत. हत्तींचे भटकंतींचे पट्टे असतात. एका भागातून हत्ती गेल्यानंतर दुसरा कळप येईपर्यंत वनसंपदा निसर्गचक्राने परत निर्माण होते; मात्र असे पट्टे परदेशी झाडांनी व्‍यापल्याने हे चक्रच बदलून गेले आहे. याबाबत आता योग्य पुनर्विचार करायला हवा आणि जंगलांचे मूळ स्वरूप पुन्हा आणण्‍यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. आजच्या संघर्षावर हा एक उपाय ठरू शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news