

कोकणातील वाढवण हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशातील सर्वात अधिकतम क्षमता असलेले बंदर पालघर जिल्ह्यात विकसित होत आहे. त्याचा एकूण खर्च 73 हजार कोटी एवढा येणार आहे, तर याला जोडूनच समुद्रात बेट तयार करून आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधले जाणार आहे. दुसर्या बाजूला रायगड जिल्ह्यातील जेएनपीए बंदराचा विस्तार आणि दिघी हे नवे बंदर विकसित केले जाणार आहे. त्यामुळे महामुंबईचा विस्तार हा पालघरपासून रायगडपर्यंत म्हणजे सुमारे 250 चौरस कि.मी. क्षेत्रात होणार आहे.
कोकणात पालघर ,ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांना जोडून तिसर्या आणि चौथ्या मुंबईचा होणारा विकास हा सागरी किनार्याशी निगडीत असा आहे. वाढवण ते दिघी हा सागरी किनारा सुमारे 250 कि.मी.चा आहे. या टप्प्यामध्ये चार महत्त्वाची बंदरे आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट हे सर्वात जुने ब्रिटिशकालीन बंदर आहे; मात्र या बंदरावर येणार अधिभार कमी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथोरिटी (जेएनपीए) हे बंदर तयार झाले. त्यालाही आता 25 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. आता देशाची जलवाहतूक क्षमता वाढवण्यासाठी जी पाच बंदरे विकसित होत आहेत, त्यातील वाढवण हे सर्वात मोठे बंदर असणार आहे. याला जोडूनच रायगड जिल्ह्यातील दिघी हे बंदर विकसित केले जात आहे. या दोन्ही बंदरांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील 15 वर्षांत कोकणचा हा किनारा विकासाचा मुख्य केंद्रबिंदू असणार आहे. याबरोबरच हापूस आंब्याचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्या रत्नागिरीतील जयगड आणि सिंधुदुर्गातील विजयदुर्ग या बंदरांचाही टप्प्याटप्प्याने विकास होणार आहे.
कोकणला एकूण 720 कि.मी.ची सागरी किनारपट्टी लाभली आहे. यापूर्वी कोकण हा विकासाच्या टप्प्यावर मागे राहिलेला प्रदेश अशी ओळख होती. आता कोकणची ओळख पूर्णतः बाजूला जाऊन विकासाचा केंद्रबिंदू म्हणून या प्रदेशाकडे पाहिले जात आहे. त्याचे मुख्य कारण विस्तारणारी मुंबई हे आहे. या प्रदेशामध्ये रायगड जिल्ह्यात पनवेल ते रोहा या सुमारे 100 कि.मी.च्या टप्प्यात तिसरी मुंबई आकारास येत आहे, तर ठाणे जिल्ह्यातील कल्याण, मिराभाईंदर, वसई, वाढवण ते पालघर या 95 कि.मी.च्या प्रदेशात चौथी मुंबई आकाराला येत आहे. तिसर्या मुंबईचा केंद्रबिंदू नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प आणी रेवस-रेड्डी सागरी महामार्ग पनवेल-रोहा रेल्वे हे मुख्य केंद्रित प्रकल्प आहेत. उरणपर्यंत मुंबईची लोकल रेल्वे सुरू झाल्यानंतर आता ही लोकल रोह्यापर्यंत विस्तारित होणार आहे. जेथे उपनगरीय रेल्वे पोहोचते तेथे आपोआपच मुंबई विस्तारते. आतापर्यंत डहाणू, कसारा, कर्जत, खोपोली ही याचीच उदाहरणे आहेत. आता हा विस्तार रोहा, उरण, अलिबाग इथपर्यंत होणार आहे. एकूण या सर्व प्रकल्पांमुळे कोकणचा सागरी किनारा विकासाचा केंद्रबिंदू होत आहे, ही सकारात्मक बाब आहे.
वाढवण बंदर संपूर्ण देशासाठी गेमचेंजर ठरेल असे मानले जात आहे. सध्या देशात असलेल्या बंदरांमध्ये या बंदराची क्षमता सर्वात जास्त होणार आहे. तेथे चार बहुउद्देशीय बर्थ असतील. तसेच चार लिक्विड बल्क बर्थ, एक आरओ-आरओ बर्थ, स्मॉल क्राफ्ट, कोस्ट गार्ड बर्थ आणि रेल्वे टर्मिनलचा समावेश आहे. वाढवण बंदरामध्ये 10.4 किलोमीटर लाँग ब्रेक वॉटर, ड्रेजिंग, रिक्लेमेशन, शोर प्रोटेक्शन, बंड, टग बर्थ, अॅप्रोच ट्रेस्टल्स अँड अनपेव्हड डेव्हलपड लँड आणि रेल्वे आणि रोड लिंकेज निर्माण केले जाईल. तसेच ऑफ डॉक रेल्वे यार्ड, रेल्वे एक्स्चेंज यार्ड, पॉवर अँड वॉटर आणि अंतर्गत रस्त्यांसह कोर अँड कॉमन इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती केली जाईल. देशाची वाढत्या अर्थव्यवस्थेचा विचार करून डीप ड्रॉफ्ट पोर्टची निर्मिती केली जात आहे.