Konkan Tourism | किनारी पर्यटनावर नवे प्रश्‍नचिन्ह

Konkan Tourism |
Konkan Tourism | किनारी पर्यटनावर नवे प्रश्‍नचिन्ह
Published on: 
Updated on: 

शशिकांत सावंत

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांकडे पर्यटक आणि शालेय सहलींचा वाढता ओघ पर्यटनाला नवी उंची देत आहे; मात्र त्याचवेळी समुद्रातील अपघात आणि बुडून होणाऱ्या मृत्यूंच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत.

कोकणला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्यावरील विलोभनीय निसर्ग आणि पांढऱ्या शुभ्र वाळूच्या वेगवेगळ्या बेटांमुळे आणि किनाऱ्यांमुळे गेल्या दहा वर्षांत सागरी पर्यटनाला मोठी उंची प्राप्त झाली आहे. संख्‍यात्मक दृष्‍टीने पाहिले तर पूर्वी दोन-तीन लाखांच्या मर्यादित येणारे पर्यटन आता २५ लाखांपर्यंत वाढले आहे. ज्या भागांना समुद्र नाही, अशा भागातील विद्यार्थ्‍यांच्या सहली मोठ्या प्रमाणात सागर किनाऱ्यांकडे नेत आहेत. गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार ५ हजारपेक्षा जास्त शाळांच्या सहली किनाऱ्याच्या आकर्षणाने पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्‍ये आल्या आहेत. मात्र, या सहलींमधील विद्यार्थ्‍यांचे बुडून झालेले मृत्यू या किनारी पर्यटनाला पुन्हा एकदा अंधार कोठडीत नेऊ लागले आहेत. नेमक्या दुर्घटना का होतात, त्यावर उपाय काय, असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित होऊ लागले आहेत.

सहलीतील विद्यार्थ्‍यांना झालेला अपघातांचा आलेख हा सिंधुदुर्गातील वेंगुर्ले-मालवणपासून गणपतीपुळे, मुरूड, काशीद, श्रीवर्धन ते पालघरपर्यंत सर्वच भागात पाहायला मिळत आहेत. समुद्र न पाहिलेली मुले जेव्‍हा या विलोभनीय किनाऱ्यांवर पोहोचतात, तेव्‍हा अथांग समुद्र लाटांच्या आकर्षणाने ते समुद्रात बेभान होऊन जाऊ लागतात आणि मग किनाऱ्यावरील लाटा नैसर्गिक भोवरे आणि समुद्रातील खडकाळ प्रदेशातील खोल डोह यात सापडून त्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना पुढे येतात. अशीच दुर्घटना श्रीवर्धन, दिवेआगर येथील समुद्रकिनाऱ्यावर १ ऑक्टोबरला घडली. यात अकरावी-बारावीतील आठ विद्यार्थी बुडाले. पुणे-आळंदीहून आलेले हे विद्यार्थी सूर्य मावळत असताना भरती-ओहोटीची तमा न बाळगता खोल समुद्रात गेल्याने ही दुर्घटना घडली. अशाच पद्धतीच्या दुर्घटना काशीद, मुरूड येथील किनाऱ्यांवरही घडल्या होत्या. एका दुर्घटनेतून शिकून आपण नव्‍या सुधारणा करत नसल्याने तीच वेळ पुन्हा येऊन उभी राहते. शासनाने जाहीर केलेले जीवरक्षक या दुर्घटनांच्या वेळी नेमके असतात कुठे, याचा कधीच थांगपत्ता लागत नाही. खरे तर राज्य सरकारने किनारी पर्यटन वाढत असताना प्रत्येक किनाऱ्यावर पर्यटकांसाठी सुविधा देणे, कुणाचा जीव जाऊ नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचे असताना केवळ दिखाऊ प्रयत्न केले जातात आणि त्यामुळे त्याचा रिझल्ट हा नकारात्मक येतो.

कोकण म्हणजे पर्यटन आणि पर्यटन म्हणजे कोकण असे समीकरण आहे. पूर्वी सण-समारंभ धरून कोकणात येणारे पर्यटक आता वर्षाच्या बाराही महिने येऊ लागले आहेत. पुरातन मंदिरे, समुद्रकिनारे आणि गडकिल्ले याचा आनंद घेताना या पर्यटकांना सकारात्मकतेची ऊर्जा मिळत आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या आपल्या कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात पर्यटकांसाठी समुद्रकिनारे एक मांदियाळीच आहेत. म्हणून गेल्या दहा वर्षांत पर्यटनाचा आलेख उंचावला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराचे केंद्र, किल्ले जलदुर्ग, कुलाबा, विजयदुर्ग यांनाही पर्यटकांची पसंती मिळत आहे. मात्र, वाढत्या पर्यटनाला जी अपघातांची दु:खद किनार लागलेली दिसते, त्यावर ठोस उपाययोजनांची गरज आहे.

कोकण हा सांस्कृतिक वैभव जपणारा लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा अंगीकारणारा प्रदेश आहे. इथली माणसं आदरातिथ्‍यासाठी प्रसिद्ध आहेत. कोकणात माणसाच्या चुकीमुळे होणारे अपघात वाढत्या पर्यटनाला शापित करणारे आहेत. त्यामुळे पर्यटकांना सोयी देताना सुरक्षा पुरवणेही तेवढेच गरजेचे आहे. यासाठी आता राज्य सरकार, जिल्हा प्रशासनाने स्थानिक स्वराज्यासाठी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. धोक्याच्या ठिकाणांची योग्य ती माहिती पर्यटकांना मिळणे गरजेचे आहे. स्थानिक गाईड पर्यटकांना देण्‍याची व्‍यवस्था राज्य सरकारकडून झाली पाहिजे. शाळेच्या सहली कुठल्याही भागात येतात तेव्‍हा स्थानिक गाईडशिवाय त्यांना समुद्रात प्रवेश देणे थांबवले पाहिजे. नाहीतर यात हकनाक जाणारे बळी वाचू शकणार नाहीत.

कोकणातील बहुतांश जणांचे नाते हे सागराशी आहे. गणपती सणाला बहुतांश ठिकाणी गणपती विसर्जन हे सागरी किनाऱ्यावर होते. याशिवाय नारळी पौर्णिमा सणाला हजारो कोकणवासीय समुद्रात जात असतात. त्यावेळी कुठलाच अपघात होत नाही. याचे मुख्‍य कारण त्यांना स्थानिक समुद्राची पूर्ण माहिती असते. कुठे समुद्रात जावे, कुठे जाऊ नये, या सीमारेषा त्यांनी अवगत केलेल्या असतात. नवीन येणाऱ्या पर्यटकाला याची कोणतीच माहिती नसल्याने अपघात घडतात. हे अनेकदा स्पष्‍ट झाले आहे. म्हणूनच उपाययोजना अधिक सक्षम करणे, पर्यटकांसाठी स्थानिक गाईड तयार करणे याचीच अनिवार्यता आता अधिक गडद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news