

अनिल दिवसे
आज कार्तिकी एकादशी. हा केवळ धार्मिक उत्सव नसून संत विचारांचा आणि वारकरी संस्कृतीचा जागर करणारा महत्त्वपूर्ण सोहळा आहे.
आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी एकादशीलाही वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रबोधिनी एकादशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसापासून चातुर्मासाची सांगता होते आणि धार्मिकदृष्ट्या नव्या पर्वाची सुरुवात मानली जाते. पंढरपुरात या निमित्ताने भरणारी कार्तिकी वारी हा महाराष्ट्राच्या भक्तिपरंपरेतील महत्त्वाचा सोहळा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होतात. चंद्रभागेचे स्नान, विठ्ठलनामाचा गजर, भजन-कीर्तन आणि संतांच्या विचारांचे स्मरण यामुळे अवघी पंढरी भक्तिरसात न्हाऊन निघते. आषाढी वारीनंतर कार्तिकी वारीतूनही वारकरी भक्ती, समर्पण, समता आणि बंधुभावाची परंपरा अधिक दृढ करतात. त्यामुळे कार्तिकी एकादशी हा केवळ धार्मिक उत्सव नसून संत विचारांचा आणि वारकरी संस्कृतीचा जागर करणारा महत्त्वपूर्ण सोहळा आहे.
“जातां पंढरीसी सुख वाटे जीवा ।
आनंदे केशवा भेटतांचि ॥
या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं ।
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥’’
संत सेना महाराज यांच्या या अभंगातील वर्णनाप्रमाणे लाखो वारकरी मनी भक्तीचा निर्मळ भाव ठेवून अत्यंत श्रद्धापूर्वक विठ्ठलाच्या चरणी आपली वारी समर्पित करण्यासाठी दरवर्षी पंढरपूरला येतात. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथेही विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे आढळतात. साधी वेशभूषा, गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर टिळा आणि मुखी ’राम कृष्ण हरी’, ’ज्ञानोबा तुकाराम’ या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतात. संत चोखामेळा, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आदींच्या विचार परंपरेशी वारी घट्ट जोडलेली आहे. ‘हे विश्वचि माझे घर’ ही संतांची शिकवण वारकरी आपल्या दैनंदिन जगण्यातच नव्हे, तर वारीच्या प्रवासात अधिक ठळकपणे आचरणात आणतो. वारी मानसिक व आत्मिकदृष्ट्याही अत्यंत समृद्ध करणारी असते.
वारी केवळ भक्तीपुरती मर्यादित न राहता समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरली आहे. अभंग, कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून संतांनी समता, बंधुता, दया, प्रेम आणि परोपकार यांचे महत्त्व समाजमनावर कोरले. सेवाभाव हा वारीचा आत्मा आहे. धकाधकीच्या, भौतिक सुखांनी व्यापलेल्या आधुनिक जीवनातून काही काळ दूर जाऊन विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन होण्याची संधी वारी देते. वारीत केवळ पारंपरिक वारकरीच नव्हे; तर उच्चशिक्षित, आयटी तज्ज्ञ आणि समाजमाध्यमांद्वारे जोडलेले तरुणही सहभागी होत आहेत. त्यामुळे वारी ही अधिक व्यापक, आधुनिक संदर्भांना सामावून घेणारी आणि जागतिक पातळीवर अभ्यासली जाणारी परंपरा बनत आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या या वारीकडे देश-विदेशातील अभ्यासकांचेही लक्ष वेधले गेले आहे.
समतेचे, एकात्मतेचे आणि मानवतावादी जीवनमूल्यांचे जे तत्त्वज्ञान वारीतून प्रकट होते, ते वारकऱ्यांच्या निरागस वर्तनातून सहज दिसून येते. लहान-थोर कोणीही असो सर्वांना ‘माऊली माऊली’ असेच संबोधण्याची प्रथा ही मानवी समानतेची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे. वारी अध्यात्माचा एक अलौकिक असा प्रवास आणि अनुभव आहे. वारी ही संत परंपरेतील विचारधारेतून मिळालेला समतेचा अमूल्य ठेवाच आहे. वारी माणसाकडे माणूस म्हणून पाहायला शिकवते. वारकऱ्याचे मन समतेच्या आणि करुणेच्या आकाशात विहार करत असते. संत विचारांनी घडलेली ही परंपरा काळालाच अधिक मानवी बनवत जात आहे. वारी हे केवळ विठ्ठलाचे दर्शन नाही, तर माणुसकीचे आत्मदर्शन घडवणारे चालते-बोलते विद्यापीठ आहे.
कार्तिकी एकादशीच्या वारीत कर्नाटकातील विठ्ठल भक्तांचा सहभाग विशेष लक्षणीय असतो. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांतील भक्ती परंपरेचा अनुबंध या निमित्ताने प्रकर्षाने जाणवतो. सीमाभागासह कर्नाटकातील विविध जिल्ह्यांतून भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल होतात. भाषेच्या आणि प्रादेशिक सीमा ओलांडून विठ्ठलभक्तीने जोडलेली ही श्रद्धेची वीण पंढरीच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक माहात्म्याची साक्ष देते.