

स. न. वि. वि.
कमलचा तात्यास नमस्कार!
पत्र लिहिण्यास कारण की, तुमचे कुत्रे आवरा. तेलात उडी मारत होतं. उगाच उड्या मारत आहे. पायात येऊन लुडबुडत आहे. तेलात बुडवून त्याला हद्दपार करण्यात येईल. त्याला परतीचा रस्ता दाखवू. इथे माझ्या प्रांतात तुमची भलतीच कुडबुड चालली आहे. तुम्ही शहाणे असाल; पण आम्ही दीडशहाणे नाही भुंकायला. भीक नको पण कुत्रे आवरा. आवारा कुठला तात्या.
आम्ही चार पावलं चाललो की शेपूट आडवी येते, ती तेवढी सांभाळा. नाही तर रबर गुंडाळून सोडून देऊ पोलिस कुत्र्यांच्या घोळक्यात. तात्या, या आमच्या तेलाच्या गोष्टीत पडू नका. तुमचे खायचे वांदे होतील म्हणून आमच्या चुलीवर पाणी ओतून पळून गेलात, तर भाकर्या थापायला बसवू. नको त्या कुरापती करताय. सैरावैरा धावत सुटलाय कुत्रा तुमचा. फटाके फोडल्यासारखे मिसाईल काय उडवतो, अहो त्या पिंगूला नडला ना! नकाशावरून गायब व्हाल कुत्र्यासकट. आता पुन्हा काय बोलला ना, तुमचे कुत्रे तुम्हाला फेकून मारण्यात येईल. शेपटीला फटाके लावण्यात येतील.
मिसाईलपेक्षा जास्त धूर काढतात आमचे फटाके. तात्या हे पत्र मी खूप दिलगिरीने लिहित आहे. कारण, तुमची श्वानगिरी आवडलेली नाही. मध्ये शेपूट घातलेली इथे कोणालाही आवडत नाही. मी समजून घेऊ शकतो म्हणून पत्र लिहीत आहे. आमचा एक दोस्त मध्ये पडला, तर तुमचे तेलही गेले आणि चेलेही गेले असं होईल. कुठनं कुठं गायब करंल समजायचं नाही. बंदुकीशिवाय गोळ्या उडवतंय ते. तुझी मिसाईल उडायची राहील तशीच फेकून मारंल. उडवायची भानगडच नाही. डायरेक्ट फिरून तुमच्या मायदेशी परत.
काय समजतं का अजून विस्तारानं सांगू? ते मिसाईलला डान्स करायला लावल बघा आमचा दोस्त. बघा काय ते! समजावत नाही मी; पण समजून घ्या. तात्या, अहो, मिसाईल उडवून केसांचा म्हैसूरपाक झालाय. पाक वाट लावत सुटलेत तुमचे कुत्रे आणि तुम्ही. सगळ्यांची डोकी एका बाजूला तुमचे डोकं पाक तीसमारखानासारखं उलटं पळतंय. उडवू का एक? तसं माझं हे पत्र मिसाईलपेक्षा कामचलाऊ आहे. ते तुमचे फुसके बार ईमानदार होते; पण पाक नेस्तनाबूत झाले. तुम्ही पण गायब व्हा तुमच्या श्वानाला घेऊन. इरसाल कार्यात आम्ही साथ देणारे नाही. आम्ही ऐकून घेणार नाही. गो!